Navratri festival 2019 : मूळ पाकिस्तानच्या हिंगलाज देवीची रंजक आख्यायिका....

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

निफाड तालुक्यातील खेडे (उगांव) येथील हिंगलाज देवीमातेचा नवरात्रोत्सव उत्साह व भक्तिमय वातावरणात सुरु झाला आहे. मातेचे मुळ पीठ पाकिस्तान व बलुचिस्थान सीमेवर असून हिंगलाज देवीचा निफाडमध्ये जयजयकार करत घटस्थापना करण्यात आली. मंदिर परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी हिंगलाज मातेच्या नवसपुर्ती व सेवेसाठी अनेक महिला‌ पुरुष नवरात्रीनिमित्त घटी बसले आहेत. दररोज पहाटेपासुन पंचक्रोशितील भाविकांची मातेच्या दर्शनासाठी रिघ लागत आहे. परंपरेनुसार  बुधवार (ता.२) ऑक्टोबरला हिंगलाज देवीचा मोठा यात्रोत्सव  होणार आहे

 

नाशिक : निफाड तालुक्यातील खेडे (उगांव) येथील हिंगलाज देवीमातेचा नवरात्रोत्सव उत्साह व भक्तिमय वातावरणात सुरु झाला आहे. मातेचे मुळ पीठ पाकिस्तान व बलुचिस्थान सीमेवर असून हिंगलाज देवीचा निफाडमध्ये जयजयकार करत घटस्थापना करण्यात आली. मंदिर परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी हिंगलाज मातेच्या नवसपुर्ती व सेवेसाठी अनेक महिला‌ पुरुष नवरात्रीनिमित्त घटी बसले आहेत. दररोज पहाटेपासुन पंचक्रोशितील भाविकांची मातेच्या दर्शनासाठी रिघ लागत आहे. परंपरेनुसार  बुधवार (ता.२) ऑक्टोबरला हिंगलाज देवीचा मोठा यात्रोत्सव  होणार आहे  

देवीच्या आगमनाबाबत आख्यायिका मोठी रंजक  
 नवसाला पावणा-या हिंगलाज देवीच्या खेडे येथील आगमनाबाबत आख्यायिका मोठी रंजक आहे. मातेचे मुळ पीठ पाकिस्तान व बलुचिस्थान सीमेवरील हिंगला नदीकाठी पहाडावर जागृत आहे. तेथे हिंगलाज मातेच्या दर्शनास लाखो भाविक नियमित येत असतात. डोंगरपुरी नावाचा निस्सीम भक्तही मातेच्या दर्शनास नियमित जात असे. तब्बल ९५ वर्षे देवीची डोंगरपुरी महाराजांनी वारी करुन सेवा - उपासना केली. आता आपण थकल्याने हिंगलाज मातेला आपण आपल्या नगरात घेऊन जावे असे मनोमन ठरवत हिंगलाज देवीची उपासना करत मातेस प्रसन्न करुन घेतले. हिंगलाज देवीमातेस डोंगरपुरी महाराजांनी गावी येण्याची विनंती केली. हिंगलाज देवीमातेने डोंगरपुरी महाराजांची भक्ती पाहुन त्यांचेसोबत गावी जाण्यास तयार झाली. त्यावेळी देवीने डोंगरपुरी महाराजांना अट घातली कि, मी तुझ्याबरोबर येईल, पण जर तुझे ठिकाण येईपर्यंत तु कोठेही मागे वळुन पाहशील तर मी त्याच ठिकाणी थांबेल. डोंगरपुरी महाराजांनी हिंगलाज मातेची अट मान्य करत प्रवास सुरु केला. डोंगरपुरी महाराज पुढे व हिंगलाज माता मागे असे पश्चिमेकडुन पुर्वेकडे मार्गक्रमण सुरु झाले. क्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक, पिंपळगांव मार्गे कारस (सध्याचे खेडे हे गांव) गावी आले असता तेथून वाहणा-या विनता नदीला महापूर आलेला होता.  आता पुढे कसे जायचे याबाबत हिंगलाज देवीमातेचा विचार घ्यावा म्हणुन डोंगरपुरी महाराजांनी मागे वळुन पाहिले आणि हिंगलाज देवीमातेचा दिव्य प्रकाश तेव्हा एकाच जागेवर स्थित झाला. देवी येथेच थांबणार असेल तर आपणही नगरात कशास जायचे असे म्हणून डोंगरपुरी महाराजांनी विधिवत शास्त्रोक्त पध्दतीत हिंगलाज देवीमातेची प्राणप्रतिष्ठा केली 

मंदिरासमोर डोंगरपुरी महाराजांची संजीवन समाधी
डोंगरपुरी महाराजांनीही स्वत: हिंगलाज माता मंदिरासमोर ११०० फुटांवर संजीवन समाधी घेतली आहे. समाधीस्थानाची रचनाही काळ्या चिरेबंदी दगडात हेमांडपंथी स्वरुपात कलाकुसरीचे कोरीव काम आहे. पुरातन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमूना म्हणूनही याकडे बघता येईल रुढी-परंपरेनुसार समाधीस्थानावर महादेवाची पिंड व नंदीचे प्रतिक द्वारपाल म्हणुन आहे. हिंगलाज देवीमातेला स्नान घातल्यानंतर ते तीर्थ डोंगरपुरी महाराजांच्या समाधीस्थानावर जाईल अशी रचना पूर्वी केलेली होती असेही सांगितले जाते. समाधीस्थानावर कोरलेला शिलालेख पुरातत्व विभागासाठी अभ्यासाचा विषय ठरावा असा आहे. डोंगरपुरी महाराज व विनता नदीपात्रातील पुरामुळे हिंगलाज माता खेडे येथे स्थानापन्न झाल्याचा पौराणिक संदर्भ असल्याने भाविकांमध्ये  मातेच्या दर्शनापुर्वी विनता नदी, डोंगरपुरी महाराज व हिंगलाज देवीमाता असे दर्शनाचे क्रम आता रुढ होऊ लागले आहे

मंदिराची रचना 
हिंगलाज देवीमातेचे मंदिर इ.स पुर्व १२२८ मध्ये स्वत: डोंगरपुरी महाराजांनी दगडी चिरे टाकुन हेमांडपंथी रचनेत उभारले. हिंगलाज देवीमातेची मुळ मुर्ती काळी पाषाणाला चिकटून असुन जागृत शक्ती आहे. मातेच्या कपाळावर ज्योतिर्लिंग स्वरुपात तिसरा डोळा आहे. चार भुजा असुन एका हातात चंद्र,सुर्य व त्रिशुल आहे एका हाताने माता आशिर्वाद देत आहे. मंदिरातील गाभा-यात अलिकडेच अंतर्गत सुशोभिकरण काचांच्या रंगसंगतीत अत्यंत आकर्षक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: goddess hinglaj navratri festival begin from wednesday