Navratri Festival 2019 :  तंत्राधारित व्यवसायांच्या निर्मितीकडे

Navratri Festival 2019 : तंत्राधारित व्यवसायांच्या निर्मितीकडे

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे ‘इनोव्हेशन सेल’ ‘आयआयसी’ला दर महिन्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांची जबाबदारी देते आणि संस्थांनी त्यावर काम करणे, अहवाल सादर करणे, छायाचित्र आणि ध्वनिचित्रफीत सादर करणे अपेक्षित आहे. ज्या संस्थांना अधिक क्रेडिट पॉइंट्स मिळतात, त्या इनोव्हेशन सेलच्या काही विशिष्ट कार्यक्रमांसाठी पात्र ठरतात. आम्हाला खात्री आहे, की संस्थांनी आयआयसीच्या कार्यक्रमांना योग्य पद्धतीने अमलात आणल्यास एका ठराविक कालावधीत त्या संस्थांच्या कार्यक्षेत्रात कल्पकता आणि उद्योजकतेशी संबंधित कार्यसंस्कृती निर्माण होऊन स्थिरावेल.

अमेरिका, जर्मनी, दक्षिण कोरिया, इस्राईल, सिंगापूर आदी देशांना आज जगातील सर्वांत कल्पक देश समजले जाते. या देशांनी इनोव्हेशनसारख्या मुद्द्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ देणाऱ्या स्टॅनफोर्ड, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॅलटेक, प्रिनस्टन, साऊथ युनिव्हर्सिटी, नानयांग टेक्नॉलॉजिलकल युनिव्हर्सिटी, हिब्रू युनिव्हर्सिटीसारख्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था विकसित केल्या आहेत. या संस्थांच त्या देशांमध्ये निर्माण होणाऱ्या नवकल्पनांच्या केंद्रबिंदू झाल्या आहेत. भारत मात्र १० हजार शिक्षण संस्थांमधून ८० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रम शिकत असतानासुद्धा इनोव्हेशनच्या बाबतीत फारच मागे आहे. दुर्दैवाने, आपली शिक्षण व्यवस्था कल्पकता आणि उद्योजकता या गुणांना विकसित करत नाही. मोठ्या संख्येने संस्थांच्या प्रमुखांशी बोलण्यानंतर आमच्या हे लक्षात आल्यावर कल्पकता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याबाबत दुमत नाही, मात्र हे नेमके कसे करायचे, याबाबत स्पष्टता नाही. या आव्हानाला तोंड देण्यासाठीच आम्ही एक नवीन संकल्पना पुढे आणली, ती म्हणजे इस्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी). आम्ही ठरवले की, काही निवडक संस्थांना इनोव्हेशन आणि चाकोरीबाहेरच्या कल्पनांना पुढे आणण्यासाठी कार्यसंस्कृतीत आणि दृष्टिकोनात बदल घडवण्यासाठी दर महिन्याला किंवा दर तिमाहीला मदत करायची. आयआयसीची यंत्रणा मुख्यत: टिअर २ आणि टिअर ३ संस्थांना डोळ्यांसमोर ठेवून आखलेली आहे.

आम्हाला मागील वर्षी ९५० पेक्षा जास्त संस्थांमध्ये ‘आयआयसी’ रुजवण्यात यश आले. त्यातील जवळपास ६०० संस्था या वर्षी चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. त्याव्यतिरिक्त आम्ही आणखी चारशे संस्थांमध्येही ही संकल्पना राबवीत आहोत. ‘आयआयसी’च्या अध्यक्षपदी संबंधित क्षेत्रातील वरिष्ठ अध्यापक असतो, तर उर्वरित सदस्य हे पेटंट तज्ज्ञ, बॅंकतज्ज्ञ, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान हस्तांतरातील तज्ज्ञ आदी स्थानिक उद्योगांचे प्रतिनिधी असतात. उद्योजकता वाढीला अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी स्थानिक उद्योग, वित्तसंस्था, मार्गदर्शन इत्यादींना एकत्र आणणे, मोट बांधणेसुद्धा आयआयसीकडून अपेक्षित आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे इनोव्हेशन सेल आयआयसीला दर महिन्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांची जबाबदारी देते आणि संस्थांनी त्यावर काम करणे, अहवाल सादर करणे, छायाचित्र आणि ध्वनिचित्रफीत सादर करणे अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे आपण क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यानंतर आपल्याला क्रेडिट पॉइंट्स मिळतात, त्याप्रमाणे कामगिरीनुसार प्रत्येक संस्थेला क्रेडिट पॉइंट्स किंवा गुणांकन मिळतात. ज्या संस्थांना अधिक क्रेडिट पॉइंट्स मिळतात, त्या इनोव्हेशन सेलच्या काही विशिष्ट कार्यक्रमांसाठी पात्र ठरतात. आम्हाला खात्री आहे, की संस्थांनी आयआयसीच्या कार्यक्रमांना योग्य पद्धतीने अमलात आणल्यास एका ठरावीक कालावधीत त्या संस्थांच्या कार्यक्षेत्रात कल्पकता आणि उद्योजकतेशी संबंधित कार्यसंस्कृती निर्माण होऊन स्थिरावेल. आयआयसीचे कार्यक्रम सुरवातीच्या काळात अतिशय सोपे होते आणि नंतरच्या काळात ते अधिकाधिक गुंतागुंतीचे होत गेले. पहिल्या काही महिन्यांत आम्ही संस्थांना किमान ५० टक्के विद्यार्थी आणि अध्यापकांचा सहभाग असलेल्या फक्त दोनच कार्यशाळा घेण्यास सांगितल्या. या संस्थांनी कार्यशाळांचे आयोजन स्थानिक तज्ज्ञांच्या सहकार्याने करणे अपेक्षित होते. कारण स्थानिक तज्ज्ञांचा सहभाग कार्यसंस्कृती आणि मानसिकता बदलण्यासाठी महत्त्वाचा आहे.

‘आयआयसी’ला सुचवण्यात आलेली पहिली कार्यशाळा बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) ही होती, तर दुसरी कार्यशाळा डिझाईन थिकिंगची होती. बौद्धिक संपदा अधिकारांसंदर्भात मोठ्या संख्येने तरुणांना जागरूक केल्याने त्यांच्यात कल्पना आणि कल्पकतेचे संरक्षण करण्यासंबंधीची जागरुकता निर्माण होईल. यात विविध कागदपत्रांची हाताळणी, कायदेशीर आणि वित्तीय बाबी, भारतात आणि परदेशात पेटंटची नोंदणी यांसारख्या बाबींचा समावेश आहे. आम्ही फॉर्च्युन कंपन्यांमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक बदल घडून आलेल्या विविध उदाहरणांच्या अभ्यासावर भर दिला आहे. संस्थांनी पेटंटची नोंदणी करणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांबरोबर करार करणे आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि अध्यापकांना बौद्धिक संपदा अधिकाराच्या संदर्भातील सेवा खूपच स्वस्त दरात उपलब्ध होतील. डिझाईन थिकिंग ही दुसरी कार्यशाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांनी समस्यांचा शोध कसा घ्यावा आणि त्यावरील सर्वोत्तम उत्तराची मांडणी कशी करावी यासाठी आहे. डिझाईन थिंकिंग हे माणसांना केंद्रबिंदू मानून लोकांच्या गरजा जोडण्यासंदर्भातील, तंत्रज्ञानाच्या शक्यतांची संबंधित आणि व्यवसायाच्या यशासाठी आवश्यक बाबींच्या कल्पकतेशी निगडित आहे. डिझाईन थिकिंगचे कल्पकतेच्या संदर्भात असलेले महत्त्व मी स्वतंत्र लेखात मांडेन. या मूलभूत कार्यशाळा झाल्यावर आम्ही आयआयसीला त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कोणत्याही चार संस्थांची भेट घेण्यास सांगतो. उदाहरणार्थ ३०० खाटांचे इस्पितळ किंवा ऊर्जा प्रकल्प किंवा कृषी विद्यापीठ किंवा खाद्यान्नावर प्रक्रिया करणारा प्रकल्प इत्यादी. विद्यार्थ्यांनी या संस्थांमध्ये एक किंवा दोन दिवस राहून तेथील व्यवस्था आणि प्रक्रिया समजावून घेणे आणि तेथील सध्याच्या समस्या जाणून घेणे अपेक्षित आहे. समस्या ओळखल्या की आयआयसींना एक स्पर्धा आयोजित करण्यास सांगण्यात येते. समस्यांची उकल करण्यासंदर्भातील कल्पनांची ही स्पर्धा असते. सर्वोत्तम कल्पना किंवा उत्तर निवडली जाते आणि ती मांडणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांना बक्षीसही दिले जाते. आता या पुढची पायरी आहे चांगल्या कल्पनेला नमुना उत्पादनात (प्रोटोटाइप) परावर्तीत करणे. आयआयसी लवकरच यासाठी एक चांगली टीम तयार करण्यासाठी छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. या टीमच्या प्रत्येक सदस्याची निवड त्याची योग्यता आणि दृष्टिकोन पाहून एका स्पर्धेच्या माध्यामातून केली जाईल. त्यामुळे आपल्याला चांगल्या संकल्पनेला उत्पादनात  परावर्तित करण्यासाठीचे हुशार विद्यार्थी मिळतील. 

नमुना उत्पादनांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मंत्रालयातर्फे  देशभरातील विद्यार्थ्यांच्या कल्पनांना एकत्रित करण्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्यांचे आयोजन करेल. मागील वर्षी आम्हाला पहिल्याच फेरीत देशभरातून अशी १ हजार ६०० नमुना उत्पादने मिळाली होती. त्यांचे परीक्षण करून त्यातील ४३ उत्पादने दिल्ली झालेल्या शेवटच्या फेरीसाठी निवडली गेली होती. आता मंत्रालय या उत्पादनांतून स्टार्टअपची निर्मिती व्हावी यासाठी इनक्युबेशनच्या माध्यमातून मदत करीत आहे. आयआयसीचा हा उपक्रम एकमेवाद्वितीय ठरला आहे. आमचे सदस्य नसलेल्या संस्थांनीही त्याची तत्त्वे पाळावीत अशी इच्छा आहे. आमचे अंतिम ध्येय इनोव्हेशन्सची बेटे निर्माण करणे व त्यातून आंत्रप्रेन्युअरशिपसाठीच्या वातावरणनिर्मितीचा आहे. त्यातून आपल्याकडे भन्नाट कल्पनांची रीघ लागेल व त्यातून तंत्राधारित व्यवसायायाची निर्मिती शक्य होईल.(क्रमश:)

(लेखक केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयात  चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com