Navratri festival 2019 : जुगाड म्हणजे इनोव्हेशन नव्हे...

अभय जेरे
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

जुगाड खूप प्रासंगिक असतो. त्याचा वापर आणि अंमलबजावणी विशिष्ट स्थान, वेळ आणि परिस्थितीपुरती मर्यादित असते. तो मोजता येत नाही आणि तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण शोधात तो रूपांतरित होत नाही. त्यामुळे भारतीयांनी ‘जुगाड’विषयी असलेले आपले प्रेम बाजूला ठेवले, उत्तमात उत्तम गोष्टी करण्याच्या आपल्या क्षमता ओळखल्या, त्यांचा आग्रह धरला आणि दुय्यम दर्जाच्या गोष्टी करणे सोडल्यास आपण तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडवू शकतो. 

आम्हा भारतीयांना नेहमीच आपली वैज्ञानिकदृष्ट्या उत्क्रांत झालेली संस्कृती आणि भूतकाळाबद्दल उच्च स्वरात बोलायला आवडते. त्याचप्रमाणे, शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संतांनी मोठ्या प्रमाणावर मांडलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना (इनोव्हेशन) आणि सिद्धांताबद्दलची आपण तावातावाने बोलतो. तळागाळातील कमी खर्चामध्ये होणाऱ्या इनोव्हेशनच्या उपजत क्षमतांचाही आपल्याला अभिमान असतो. हे इनोव्हेशन ‘जुगाड’ या नावाने लोकप्रिय आहेत. खरेतर, एकीकडे आपल्या पूर्वजांच्या इनोव्हेशनचा अभिमान बाळगणाऱ्या आपल्या देशाला दुसरीकडे स्वातंत्र्यापासून खूप महत्त्वाची, क्रांतिकारक कल्पना जगाला देता आली नाही, हा विरोधाभास विलक्षणच. दीर्घकाळापासून आपली सृजनशीलता गोठल्यासारखी वाटते. एका लेखामध्ये अमित बलूनी यांनी आपल्या या सद्यःस्थितीचा नेमका उल्लेख केलाय. त्यांनी म्हटलेय, ‘जगाने संपूर्ण मानवतेवर परिणाम घडविणाऱ्या महत्त्वाचे त्याचबरोबर विनाशकारी शोध लावले आहेत. मात्र, आपण शून्य, पुष्पक विमानासारख्या संदिग्ध शोधकथांवरच आपली भूक भागवतोय. त्यातच समाधान मानतोय. कोठल्याही उद्देशाशिवायचे, फारसे परिणामकारक नसलेले जुगाडही यात येतात.’ 

भारताला ‘वर्ल्ड इनोव्हेशन हब’ म्हणून खरोखरच पुढे यायचे असल्यास आपण आपल्या समाजाला इनोव्हेशनचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्यापक चळवळ उभारण्याची गरज आहे. आपण इनोव्हेशन आणि उत्कृष्टतेची संस्कृतीही पुन्हा एकदा लोकमानसावर ठसवायला हवी. आम्ही पुण्यामध्ये ‘सकाळ मीडिया ग्रुप’च्या सहकार्याने एक प्रायोगिक प्रकल्प राबविला होता. या चळवळीची सुरवात करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रत्येक आठवड्याला ‘सकाळ’मधून काही चांगल्या भारतीय इनोव्हेटरच्या कामाला प्रसिद्धी दिली. शेवटी या सर्व कुशल इनोव्हेटरला पुण्यात आमंत्रित केले. त्यांना शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसमोर आणले. आमच्या या उपक्रमाला मोठे यश मिळाले. आम्ही तब्बल १४० इनोव्हेटरना एक लाखापेक्षा अधिक लोकांपुढे आणू शकलो. 

सुरवातीला या कल्पनेवर विचारमंथन करत असताना माझ्या सहकाऱ्यांनी सुचविले की, आपण आपल्या उपक्रमाचा ‘जुगाड मेला’ किंवा काटकसरीतून साकारलेले इनोव्हेशन म्हणजेच, ‘फ्रुगालोव्हेशन’ असा ब्रॅंड तयार करायला हवा. मी तत्काळ या सूचना फेटाळल्या. जुगाड ही माझ्यासाठी इनोव्हेशन नाहीच. जुगाड हे तर एक प्रकारचे पॅचवर्क आहे. मोजता न येणाऱ्या गोष्टी साकारण्याचा तो ओबडधोबड मार्ग आहे. ते स्थानिक मर्यादांवर मात करण्यासाठी केलेले काम होय. बहुतेकदा ते तांत्रिकदृष्ट्या अपरिपूर्ण असतात. दुर्दैवाने, भारतीय जुगाडाची इनोव्हेशनशी बरोबरी करतात. इनोव्हेशनकडे पाहण्याचा हा सर्वांत चुकीचा, भ्रष्ट मार्ग आहे, असे मला वाटते. जुगाडाच्या अनेक उदाहरणांमध्ये सुरक्षा मापदंडाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. ते अत्यंत धोकादायक ठरू शकते. उदा. ‘३ इडियटस’ या हिंदी चित्रपटात रॅंचो (आमीर खान) आपत्कालीन परिस्थितीत प्रसूतीसाठी व्हॅक्युम क्लीनरचा वापर करतो. हा अर्भकांच्या प्रसूतीचा आदर्श ठरू शकतो का? ते सुरक्षित आहे का? निश्चितच नाही. शिवाय, जुगाड खूप प्रासंगिकही असतो. त्याचा वापर आणि अंमलबजावणी विशिष्ट स्थान, वेळ आणि परिस्थितीपुरता मर्यादित असते. तो मोजता येत नाही आणि तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण शोधात तो रूपांतरित होत नाही. 

मी जुगाडप्रमाणेच काटकसरीतून साकारलेल्या इनोव्हेशन्सचा चाहता नाही. अनेकदा हे दोन शब्द पर्यायी म्हणूनही वापरले जातात. काटकसरीने म्हणजे गोष्टी स्वस्तात (कॉस्ट इफेक्टिव्ह) करणे ही संकल्पना आपल्या देशातील उद्योजकांना फारच आवडते. अनेकदा उत्पादनाच्या निर्मितीमध्ये शॉर्टकट घेऊन किंमत कमी केली जाते. यामुळे उत्पादन दुय्यम दर्जाचे, न टिकणारे व अनेकदा असुरक्षित होत असल्याने असे करणे योग्य नाही. उदाहरणार्थ काही भारतीय औषध उत्पादन कंपन्या (सर्वच कंपन्या नव्हे.) जनेरिक औषधांची निर्मिती करताना किंमत कमी करण्यासाठी शॉर्टकट घेतात. मात्र, त्यातील बहुतांश सुरक्षा आणि परिणामकारकता या निकषांवरील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चाचण्यांमध्ये अपयशी ठरतात.

मला असे मनापासून वाटते की, आपण अस्सल इनोव्हेशन्सना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांना पुरस्कृतही करायला हवे. दुर्दैवाने पाश्‍चिमात्य जग आपल्या अशा अस्सल इनोव्हेशन्सना दुय्यम दर्जाच्या उत्पादनांत मोजतात. याचे सर्वांत चांगले उदाहरण आहे मंगळयानाचे. या मिशनचा आराखडा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) अत्यंत काटेकोरपणे तयार केला होता. त्यांनी काटकसर करण्यासाठी कोणताही शॉर्टकट घेतला नव्हता. त्यामुळे मंगळयान हे खूप मोठ यश ठरले आणि भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश करणारा पहिला देश ठरला. मंगळयानाची किंमत जेमतेम ७ कोटी डॉलर किंवा ४७३.३ कोटी रुपये होती. (ही रक्कम हॉलिवूडच्या ‘ग्रॅव्हिटी’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी झालेल्या खर्चापेक्षा कमी आहे.) 

सध्या भारत अत्यंत योग्य अशा परिस्थितीमध्ये आहे. आपण जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहेत आणि आपली ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. तरुणांमध्येच चौकट तोडून विचार करण्याची क्षमता आणि भव्य कल्पना साकारण्याची क्षमात असते. आपल्याकडे अशा तरुणाईची संख्या मोठी आहे. आपल्याकडे इंग्रजी भाषेचे ज्ञान असणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. ते आपल्या देशाच्या यशोगाथा जगातील मोठमोठ्या व्यासपीठांवर सक्षमपणे मांडू शकतात. आपण एक समाज म्हणून ‘जुगाड’विषयी असलेले आपले प्रेम बाजूला ठेवले, उत्तमात उत्तम गोष्टी करण्याच्या आपल्या क्षमता ओळखल्या, त्यांचा आग्रह धरला आणि दुय्यम दर्जाच्या गोष्टी करणे सोडले पाहिजे. मला विश्‍वास आहे की, असे केल्यास आपण तंत्रज्ञानविषयक अनेक समस्यांवरची अत्यंत कमी खर्चातील उत्पादने जगाला देऊ शकतो...

(क्रमशः) 
(लेखक मानव संसाधन विकास मंत्रालयामध्ये चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.)

नवरात्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhay Jere article on Innovation

टॅग्स
टॉपिकस