श्री अंबाबाईची चामुंडा मातृका रूपात सालंकृत पूजा : Kolhapur Navaratri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री अंबाबाईची चामुंडा मातृका रूपात सालंकृत पूजा

तिरुपती तिरुमला देवस्थानकडून आज करवीर निवासिनी अंबाबाईला गुलाबी रंगाचा, सोनेरी काठ-पदराचा १ लाख ७ हजार ७३० रुपये किमतीचा शालू अर्पण करण्यात आला.

Kolhapur Navaratri: श्री अंबाबाईची चामुंडा मातृका रूपात सालंकृत पूजा

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज चामुंडा मातृका रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. काल रात्री नगर प्रदक्षिणेनंतर मंदिरात विविध धार्मिक विधी झाल्याने आज सकाळी नऊ वाजता मंदिर दर्शनासाठी खुले झाले. दुपारी देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. चामुंडा मातृका ही यमाची शक्ती असून तिला काली, चामुंडी म्हणूनही ओळखले जाते. तिच्या गळ्यात मुंडमाळा तर हातात डमरू, त्रिशूल, तलवार, वाडगा आहे. काही धर्म ग्रंथानुसार तिला शंकराची शक्ती म्हणतात. ती वाद्यावर आरूढ असून रंग गडद लाल आणि चेहरा रौद्र आहे, अशी माहिती श्रीपूजक मयूर मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर यांनी दिली.

तिरुपतीहून अंबाबाईला शालू अर्पण

तिरुपती तिरुमला देवस्थानकडून आज करवीर निवासिनी अंबाबाईला गुलाबी रंगाचा, सोनेरी काठ-पदराचा १ लाख ७ हजार ७३० रुपये किमतीचा शालू अर्पण करण्यात आला. तिरुमला देवस्थान समितीचे डेप्युटी ऑफीसर एम.रमेश बाबु यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्द केला. आज सकाळी 'गोविंदा गोविंदा' च्या गजरात शालू मंदिरात आणण्यात आला. यावेळी तिरुपती देवस्थान समितीच्या एम.कंचन,वेदपारायण पंडीत के.संपतकुमार,डी.जनार्दन,भरत ओसवाल,के.रामाराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navratri