Navratri 2022: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करावी या देवीची अर्चना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratri festival

Navratri 2022: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करावी या देवीची अर्चना!

नवरात्री उत्सवाला भारतामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे; अगदीच असं म्हणायला हरकत नाही की नवरात्री हा सर्वांचाच आवडीचा उत्सव आहे. आज घरोघरी आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते, झेंडूच्या फुलांनी घर सजवले जाते, घटस्थापना करून देवीची पूजा सुरू होते.

जाणून घेऊया आजच्या माळेचे महत्व

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळीला देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. हिमालयाची कन्या पार्वती ही पूर्वजन्मीची 'सतीदेवी', शंकराची पत्नी. वडिल दक्षप्रजापतिंनी योजलेल्या यज्ञात पतीचा अपमान झाला म्हणून यज्ञाग्नीत प्राणार्पण केलेली सती पुढच्या जन्मात हिमालयकन्या पार्वती म्हणून जन्माला आली. तीच ही शैलपुत्री. शैल म्हणजे पर्वत.

वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम्।

वृषारूढ़ां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥

"मनोकामना पूर्ण करणाऱ्या मस्तकी अर्धचंद्र धारण केलेल्या नंदीवाहन आणि त्रिशूल धारण करणाऱ्या शैलपुत्री देवीला नमस्कार असो."

ह्या देवीचा आवडता रंग पांढरा आहे; म्हणून पहिल्या माळेला पांढरे वस्त्र परिधान केले जाते; तर नैवेद्य म्हणून तूप किंवा तूपातले पदार्थ देवीला दाखवले जातात.

पौराणिक कथांचे ऐतिहासिक संदर्भ लावणे कठीण आहे; या गोष्टींमध्ये तात्पर्य किंवा शिकवणूक महत्त्वाची. या कथेच तात्पर्य हे की, देवी कुठेही जन्म घेऊ शकते. हिमालयाने भारतीयांना आणि जगाला खूप काही दिले आहे. नद्या आणि सृष्टीसौंदर्याचे ऐश्वर्य.. तो एक अभेद्यभिंत म्हणून उभा आहे तो.. हीच त्याची शक्ती.. शैलपुत्री.

शंकराचार्य आपल्या शिवमानसपूजा स्तोत्रात म्हणतात.

'आत्मा त्वं गिरिजा मतिः'

आपली बुद्धी हीच शैलपुत्री, गिरिजा. आपल्या शरीरात, बुद्धी, वाणी रूपाने रहाते ती ही शैलपुत्री. हे तिचे आध्यात्मिक रूप आहे.

आपल्या शरीरात ही शैलपुत्री कोणत्याही रूपाने आहे ?

आपली जी बुद्धीची, विचारशैली आहे, वर्तन शैली आहे, बोलण्याची वक्तृत्व शैली आहे, या सगळ्यांच्या वेगवेगळा विचार केला तर ती एकेक शक्ती आहे असे आपण म्हणू शकतो. ती उगम कुठून पावते, जन्म कुठे घेते ? तर, आपल्या असणेपणातून म्हणजे अस्तित्वातून म्हणजेच आत्म्यातून किनई ! आपण असलो तरच आपली शक्ती असणार ! तेच तीचे आध्यात्मिक माहेर. आत्मा हिमालय ! पिता तिचा !! तिलाच गिरिजा म्हणतात.पहिल्या माळेला देवीची उपासना करून मांगल्याचे आशीर्वाद मिळतात.