Navratri Festival 2019 : नावीन्याचा ध्यास घ्यावाच लागेल

Blooms-Taxonomy
Blooms-Taxonomy

नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही जागर करीत आहोत विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा आणि नवकल्पनांचा. मानवी जीवन अधिक समृद्ध आणि सुकर करण्यासाठी या इनोव्हेशनचा, नवकल्पनांचा उपयोग कसा करता येईल, हे तुम्हाला जाणून घेता येईल. यासंदर्भात तुमच्याकडेही काही कल्पना व समस्या सोडविण्यासाठीची उत्तरे असल्यास आम्हाला कळवा.

भारतात नव्याचा ध्यास, कल्पकता (इनोव्हेशन) हे अजूनही शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी नाही. देशाची कार्यसंस्कृती आणि मानसिकतेत आमूलाग्र बदल घडवून आणून इनोव्हेशन, स्टार्टअप आणि आंत्रप्रेन्युअरशिप (कल्पकता, स्टार्टअप आणि उद्योजकता) या गुणांना आपल्या उच्चशिक्षणाचा पायाभूत आधार बनविण्यासाठी देशाच्या शिक्षण व्यवस्थेत जगभर वापरात असलेल्या ब्लूमच्या टॅक्सोनॉमीच्या मॉडेलवर आधारित सर्वंकष आमूलाग्र बदल करणे क्रमप्राप्त आहे.

‘ब्लूम’ची टॅक्सोनॉमीची मांडणी हे पिरॅमिडसारखे मॉडेल असून, जगभरात त्याचा वापर शैक्षणिक कामगिरीचे वर्गीकरण करण्यासाठी केला जातो. या मॉडेलमध्ये गुंतागुंत आणि वैशिष्ट्ये यांवर आधारित सहा महत्त्वाचे थर आहेत. यातील प्रत्येक थर खालच्या थरावर अवलंबून असतो. स्मरण किंवा लक्षात ठेवणे ही यातील सर्वांत तळाशी असून, सर्जकता किंवा निर्मिती हे सर्वांत वरचे शैक्षणिक कौशल्य आहे.

विद्यार्थी एखाद्या विषयात सखोल ज्ञान मिळवत गेल्यावर तो या पिरॅमिडच्या प्रत्येक पातळीत वर चढत जातो, असे या मॉडेलमध्ये समजले जाते.

दुर्दैवाने, आपल्या शिक्षण पद्धतीत सर्व भर हा घोकंपट्टीवर किंवा स्मरणावरच आहे. घोकणे आणि ओकणे याच तत्त्वानुसार आपण शिकत असतो. त्यामुळेच आपले विद्यार्थी त्या पिरॅमिडमधील सर्वांत खालच्या पातळीवरील कौशल्यावरच अडकतात.

त्यामुळे त्यांची खरी वाढ होतच नाही. ते अन्य महत्त्वाच्या कौशल्यांपासून वंचित राहतात. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एकतर वरच्या पातळीवरील कौशल्ये खूपच मर्यादित असतात किंवा बहुतांशवेळा या कौशल्यांचा त्यांच्यात अभावच दिसून येतो.

बहुतांश विद्यार्थी स्वतंत्रपणे विचार करण्यास सक्षमच नसतात. चाकोरीबाहेर जाऊन एखादा विचार नव्यानेच मांडणे हे त्यांच्या कुवती पलीकडचे होऊन बसते. कारण घोकंपट्टीची लागलेली सवय. याची परिणती विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमानाच्या किंवा आत्मविश्‍वासाचा अभावात होते. परिणामी, त्यांची जोखीम घेण्याची क्षमतासुद्धा विकसित होत नाही. जोखीम घेण्याची क्षमता हा उद्योजकतेतील सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. अर्थातच, त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी हे उद्योजक बनण्याऐवजी फक्त नोकरी शोधणारे तरुण बनतात.

अलीकडेच जागतिक बॅंक आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाने भारताच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या केलेल्या एका अभ्यासानुसार हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. या पाहणीमध्ये साधारणपणे ५,००० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला. हे सर्व विद्यार्थी, न ठरवता सहजपणे वेगवेगळ्या २०० सरकारी आणि खासगी अभियांत्रिकी संस्थांमधून निवडण्यात आले होते. यात अभियांत्रिकी संस्था किंवा महाविद्यालयांमध्ये आयआयटीचा (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) समावेश नव्हता. याच प्रकारची पाहणी चीन आणि रशियातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचीही करण्यात आली. या पाहणीतून असा निष्कर्ष निघाला, की रशियन आणि चिनी अभियांत्रिकी विद्यार्थी भारतीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांपेक्षा वरचढ आहेत.

आश्‍चर्याची बाब म्हणजे, भारतीय विद्यार्थ्यांनी आपल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन वर्षांत गणित आणि गुंतागुंतीची विचारप्रक्रिया या कौशल्यांमध्ये चीन आणि रशियातील विद्यार्थ्यांपेक्षा आघाडी घेतली होती. मात्र भारतीय विद्यार्थ्यांमध्ये रशियन आणि चिनी विद्यार्थ्यांच्या तुलनेत वरच्या पातळीवरील कौशल्ये विकसित झालेली नव्हती.

तांत्रिक शिक्षण घेणारे आपले बहुतांश विद्यार्थीच जागतिक दर्जाचे नसल्यास बिगरतांत्रिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची वरच्या पातळीवरील कौशल्यांच्या संदर्भातील स्थिती काय असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. नवे प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षण धोरण (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी) या आव्हानांना तोंड देण्याचा प्रयत्न करते आहे. यात शालेय पातळीवर आणि उच्च शिक्षणाच्या पातळीवर काही मूलभूत स्वरूपाचे बदल सुचवले आहेत. या नव्या धोरणाचा मसुदा सर्वसामान्य जनतेच्या मतांसाठी खुला करण्यात आला असल्यामुळे त्यावर बरीच चर्चा आणि वाद होताना दिसत आहेत. अनेक सूचना मांडल्या जात आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालय (एमएचआरडी) या सर्व सूचना आणि मतांबद्दल खूप संवेदनशील आहे. नव्या शिक्षण धोरणाच्या सुधारित मसुद्यात या सर्व सूचनांना समाविष्ट करण्याचे नियोजन असून, लवकरच हा मसुदा जाहीर करण्यात येईल.

भारताला नावीन्याचा ध्यास धरायचा असेल, कल्पकता दाखवायची असेल तर तरुणांमध्ये वरच्या पातळीवरील कौशल्यांचा विकास होण्यासंदर्भातील सर्व प्रकारचे प्रयत्न करावेच लागतील. 
(लेखक भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयात चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.)
(अनुवाद : विजय तावडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com