Navratri Festival 2019 : अनंत काळापासून उपासना

सरोजिनी चव्हाण
Sunday, 29 September 2019

भारतात फार पूर्वीपासून देवीची उपासना प्रचलित आहे. मोहनजोदडोच्या उत्खननात प्राचीन संस्कृतीचे काही अवशेष आढळून आले. त्यात देवीच्या काही मूर्ती सापडल्या. त्यावरून इसवी सन पूर्व चार हजार वर्षांपूर्वीदेखील शक्तीची उपासना होत होती असे दिसते.

भारतात फार पूर्वीपासून देवीची उपासना प्रचलित आहे. मोहनजोदडोच्या उत्खननात प्राचीन संस्कृतीचे काही अवशेष आढळून आले. त्यात देवीच्या काही मूर्ती सापडल्या. त्यावरून इसवी सन पूर्व चार हजार वर्षांपूर्वीदेखील शक्तीची उपासना होत होती असे दिसते. 

वेदात उषादेवी, सूर्यादेवी, लक्ष्मीदेवी अशा विविध देवतांची अनेक रूपे आढळून येतात. ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील शेवटच्या सूक्तात सरस्वतीची स्तुती आहे. त्या काळी शक्तिपूजन मातृदेवतेच्या रूपात केले जाई. पिकांच्या संरक्षणासाठी भूदेवीचे पूजन केले जाई. संपत्तीच्या संरक्षणासाठी लक्ष्मीमातेचे पूजन केले जाई. उपनिषद काळात शक्तीच्या स्वरूपाला एक प्रकारची तात्त्विक बैठक प्राप्त होऊन ध्यानधारणा, साधनामार्गातून शक्तीचा साक्षात्कार करून घेण्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन उदयास आला. पुराणकाळातही देवीविषयक पुराणे निर्माण झाली. 

देवीच्या विविध पूजा, उपासना पद्धती निर्माण झाल्या. देवीच्या सौंदर्याची वर्णने, पराक्रमाच्या कथा-गाथांविषयी अफाट लिहिले गेले असले, तरी तिच्यातील सुप्त अंतर्गत शक्तीविषयी खूप कमी लिहिले आहे. या विषयाशी निगडित वैज्ञानिक तत्वांविषयीही कमी माहिती उपलब्ध आहे. अवघ्या ब्रह्मांडामध्ये अनंत काळापासून आदिशक्ती तत्त्व अस्तित्वात आहे व हेच शक्ती तत्त्व आपल्या अंतर्यामीही अस्तित्वात आहे. अंतर्यामी अस्तित्वात असणारे हे शक्ती तत्त्व जागृत करण्यासाठी विविध उपासना व पूजापद्धती ऋषिमुनींनी सांगितलेल्या आहेत. ऋषिमुनींनी अनेक वर्षांच्या तपश्‍चर्येअंती जे निष्कर्ष काढले, त्यातून सात्त्विक अशा उपासना पद्धती शोधून काढल्या. या पद्धती लोकांना साध्या, सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी त्यांनी प्रतीकांचा, मूर्तिरूपाचा वापर केला. संशोधनातून वास्तुरचना केली. मंदिरे उभारली. पूजा-अर्चांचे प्रयोजन केले. नवरात्रीसारख्या विविध उत्सवांद्वारे तिची आराधना केली जाऊ लागली.

शक्तीविषयी भगवान शंकराने वेगवेगळी तंत्रे लिहिली. श्रीविद्येचे मुख्य आचार्य गुरुदेव दत्त मानले जातात, तर आदिनाथ मच्छिंद्रनाथांनी योगिनीकौलसंप्रदाय स्थापन करून स्त्रीशक्तीला पूजनीय मानले. आदिशक्तीच्या उपासना पद्धतीत मातृकापूजन, दशमहाविद्या साधना, श्रीविद्या व श्रीयंत्र साधना, चौसष्ट योगिनी साधना, कुंडलिनी जागृती, शिवशक्तीसामरस्य, पिंड -ब्रह्मांड रचना यांचा समावेश होतो. मंत्र, यंत्र, चक्र, न्यास, मुद्रा, दीक्षा ही या उपासनेची अंगे आहेत. पवित्र मनाने, शुद्ध अंतःकरणाने स्वतःतील देवत्व जागृत करून आदिशक्तीला पूज्यभावाने, श्रद्धापूर्वक शरण जाणे हे मर्म उपासनेद्वारे जाणले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Article Sarojini Chavan