Navratri Festival 2019 : शाक्त संप्रदायात शक्तिदेवता सर्वश्रेष्ठ

सरोजिनी चव्हाण
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

शक्तीची उपासना करणाऱ्यांना शाक्त व त्यांच्या धर्मतत्त्वज्ञानाला शाक्त संप्रदाय म्हणतात. या संप्रदायात परमेश्‍वराची किंवा परमतत्त्वाची कल्पना स्त्रीरूपात केली जाते. शाक्तपंथामध्ये देवीला सर्वोत्तम दैवत मानतात व तिच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ सामर्थ्य असल्याने तिच्या कृपेसाठी, प्रसादासाठी व अनुग्रहासाठी साधना करतात.

शक्तीची उपासना करणाऱ्यांना शाक्त व त्यांच्या धर्मतत्त्वज्ञानाला शाक्त संप्रदाय म्हणतात. या संप्रदायात परमेश्‍वराची किंवा परमतत्त्वाची कल्पना स्त्रीरूपात केली जाते. शाक्तपंथामध्ये देवीला सर्वोत्तम दैवत मानतात व तिच्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ सामर्थ्य असल्याने तिच्या कृपेसाठी, प्रसादासाठी व अनुग्रहासाठी साधना करतात.

उत्तर वैदिक काळात शैव, शाक्त, वज्रयान, वैष्णव, गाणपत्य, सौर असे वेगवेगळे धर्म, पंथ निर्माण झाले. याबरोबरच त्यांची विविध दैवते, उपासनापद्धती, शास्त्र, साहित्य तसेच तंत्रेही निर्माण झाले. शाक्त संप्रदायातील मूळ आदिशक्तीला दुर्गा म्हणतात. दुर्गा हे शाक्त संप्रदायाचे सर्वश्रेष्ठ उपास्यदैवत. दुर्गेनेच मानवकल्याणासाठी, शत्रुविनाशासाठी प्रसंगानुरूप तीन रूपे घेतली. महाकाली, महालक्ष्मी अन्‌ महासरस्वती! या तिन्ही रूपांच्या उत्पत्ती कथा मार्कंडेय पुराणातल्या सप्तशतीत दिलेल्या आहेत. दुर्गा, त्रिपुरसुंदरी, ललिताम्बिका, महाभैरवी, आनंदभैरवी. अनेक नावांनी ते शक्तीला संबोधतात. शाक्तपंथीय शिव-शक्ती या दोघांनाही अभेद्य मानतात. यामागचे मुख्य सूत्र असेच आहे, की परमात्मा शिव या शक्तीनेच प्रभावित होऊन विश्‍वाची निर्मिती करतो आणि म्हणून शक्ती ही विश्‍वजननी आहे. मच्छिंद्रनाथकृत कौलज्ञाननिर्णयमध्ये म्हटले आहे...

न शिवें विना शक्‍त्तीर्ण शक्तिरहित: शिव:।
न्योन्यञ्च्‌ प्रवर्तते अग्निधुमौ 
यथा प्रिये।।
न वृक्षरहिता छाया न 
छायारहितो द्रुम:।

शाक्त संप्रदायात आध्यात्मिक पातळीवर वर्णभेद, जातिभेद मानत नाहीत. तसेच, महिलांना गौण मानत नाहीत. आगमरहस्यामध्ये तंत्रमार्गाबाबतची वस्तुस्थिती मांडलेली आहे. ‘दीक्षा देण्यासंबंधी महिलांना पुरुषांप्रमाणेच समान महत्त्वाचे स्थान दिले गेले पाहिजे.’ यावरून असेच दिसते, की महिलांना तंत्रप्रणालीचे उत्तम ज्ञान होते. एवढेच नव्हे, तर त्या दुसऱ्यांना शिकवूही शकत होत्या. महिलांना धार्मिक उपासनेचे समान अधिकार होते.

शाक्तपंथामध्ये देवीउपासनेच्या विशिष्ट पद्धती, तंत्र आहे. श्रीविद्याअंतर्गत श्रीयंत्रपूजन व त्यातून श्रीललिताम्बिका पूजा वा ललितात्रिपुरसुंदरी पूजा या शाक्तसंप्रदायातील महत्त्वाच्या पूजा आहेत. महर्षी व्यासकृत ब्रह्मांड पुराणांतर्गत ललितोपाख्यान ही मौलिक प्रस्थानत्रयी आहे. यामध्ये श्रीविद्येचे रहस्य उकलले आहे व ललितात्रिपुरसुंदरीच्या पराक्रमाचे वर्णन आहे. यातून महिलांमध्ये अंतर्भूत असणारी प्रखर ऊर्जा, अनेक कौशल्ये, अष्टपैलुत्व उदधृत केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Article Sarojini Chavan