Navratri Festival 2019 : सातीआसराही मातृकांचेच रूप

सरोजिनी चव्हाण
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

आपल्या गावात ‘सातीआसरा’ नावाने देवीचे स्थान असते. नवजात बालकाला तेथे पाया पडण्यासाठी नेण्याची प्रथा आहे. या सातीआसराही मातृकांचेच रूप मानले जाते. 

आपल्या गावात ‘सातीआसरा’ नावाने देवीचे स्थान असते. नवजात बालकाला तेथे पाया पडण्यासाठी नेण्याची प्रथा आहे. या सातीआसराही मातृकांचेच रूप मानले जाते. 

देवतास्वरूपात मातृकांची पूजा केली जाते. मातृकांची संख्या काही ठिकाणी सात, तर काही ठिकाणी आठ,  तर काही ठिकाणी नऊ मानली गेली आहे.
सप्तमातृकांची नावे अशी...

ब्राह्मी माहेश्‍वरी 
चैव कौमारी वैष्णवी तथा ।
वाराहीच तथेंद्राणी 
चामुण्डाः सप्त मातरः ।।

या सात नावांमध्ये महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्याच अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीऐवजी योगेश्‍वरी वा चामुण्डाचा अंतर्भाव करतात.

कालीदेवीविषयीची कथा सांगितली जाते, की शंखचूडाबरोबर झालेल्या युद्धात तिने अनेक दैत्यांचा वध केला आणि वध केलेल्या दैत्यांच्या मस्तकांची माळ करून ती आपल्या गळ्यात धारण केली. परंतु, याच गोष्टीचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर जॉन वूड्रॉफ असे विवरण करतात, की ‘ही रुंडमाळ म्हणजे एक रूपक आहे. संस्कृत स्वर-व्यंजनांची वर्णमाला ५२ अक्षरांची आहे. या मालामध्ये ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंतची अक्षरे येतात. वर्णमालेतील ही अक्षरे म्हणजेच मातृका होत. सर्व मंत्र आणि शास्त्रे या अक्षरांतून तयार झाली आहेत. म्हणून देवी या वर्णमालेतील अक्षरांशी किंवा मातृकांशी एकरूप झाली आहे, तिने आपल्या गळ्यात मुंडक्‍यांची माळ म्हणजेच या अक्षरांची माळा परिधान केली आहे, असे मानतात.

मातृका या निरनिराळ्या देवांच्या शक्ती असल्याचे सांगितले आहे. ब्राह्मी, माहेश्‍वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, महेंद्री आणि चामुंडा या अनुक्रमे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र व रुद्र यांच्या क्रियाशक्ती होत. मातृका आपल्या शरीरातीलच ऊर्जाकेंद्रे असून पूजाविधित न्यास, करण्यास, अंगन्यास, व्यापकन्यास आणि मुद्रा या वेळी ती ऊर्जाकेंद्र उद्दीपित होतात व आपल्या शरीरातील विविध शक्ती जागृत करतात.

सुप्रभेदागमन तंत्रात मातृकांच्या मूर्ती कशा कराव्यात, ते सांगितले आहे- द्विभुज व बैठे आसन. एक हात अभय व दुसरा वरद या मुद्रा दाखविणारा. कुंभकोणम, वेरूळ, बेलूर, अमरकंटक, ऐरोळ आदी ठिकाणी मातृकांच्या मूर्ती असून, त्यांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र व दुसऱ्या बाजूला गणपती उभा असतो. बुलडाणा जिल्ह्यातल्या तारापूर या गावच्या देवीमंदिरातही सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. पुण्याजवळील यवत येथील यवतेश्‍वराच्या मंदिरातील ओवऱ्यात मातृकांच्या मूर्ती बसविल्या आहेत. या आदिमातांच्या विकसानाने व कर्तृत्वाने भारतीय देवता विश्‍व उजळून टाकले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 article sarojini chavan