Navratri Festival 2019 : दहा प्रधान रूपांनी देवीची उपासना

सरोजिनी चव्हाण
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

दशमहाविद्याच्या साधनेद्वारे धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होते, असे मानले जाते. या विद्यांची साधना निष्काम भावनेने करावी, अशी अपेक्षा असते. कामाख्यापीठी दशमहाविद्याची मंदिरे आहेत.

दशमहाविद्याच्या साधनेद्वारे धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होते, असे मानले जाते. या विद्यांची साधना निष्काम भावनेने करावी, अशी अपेक्षा असते. कामाख्यापीठी दशमहाविद्याची मंदिरे आहेत.

आदिशक्तीची उपासना करणाऱ्या साधकांना नवदुर्गाबाबतीत माहिती असते. पण, तितकीशी दशमहाविद्यांबाबतीत नसते. शाक्तसंप्रदायात ज्या दहा प्रधान रूपांनी देवीची उपासना केली जाते, त्या देवता समूहाला दशमहाविद्या असे म्हणतात. सृष्टीतील विशिष्ट कार्याच्या या दहा अधिष्ठात्री देवता आहेत व अशुभ शक्तींच्या नाशार्थ त्या प्रकट झाल्या आहेत, असे मानले जाते. यातील प्रत्येक विद्येचे स्वरूप भिन्न-भिन्न आहे. या शक्तींची नावे महाकाली, उग्रतारा, षोडशी, भुवनेश्‍वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी व कमला अशी आहेत.

सृष्टीमध्ये शक्तीची अनेक रूपे आहेत. सर्व विश्‍व शक्तीशिवाय निष्प्राण ठरेल. या विराट सृष्टीतील शक्तीच्या कार्याचे निरूपण आगम आणि निगम ही दोनी शास्त्रे करतात. खरे तर आगम आणि निगम हे खूप विस्तृत शास्त्र आहे. निगमामध्ये या दहा विद्यांना विराट विद्या, तर आगमामध्ये महाविद्या म्हणतात. यातील काही विद्या महाविश्‍वाच्या हालचालीसंबंधी, उत्पत्ती विनाशासंबंधी ज्ञान देणाऱ्या आहेत. या विद्यांच्या अभ्यासामुळे महाविश्‍व म्हणजे काय, ब्रह्मांड कशाला म्हणतात, त्याची उत्पत्ती कधी झाली, लय केव्हा होईल, हे लय करणारी शक्ती कोणती असते, याचे समाधानकारक उत्तर निगमागमाचाऱ्यांनी दशमहाविद्यांद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे.

अखंड विश्‍वामध्ये एक सामाईक ऊर्जा सामावलेली आहे, तसेच सूर्यकिरणांद्वारे सातत्याने ऊर्जा प्रवाहित होत असते. विश्‍वात अस्तित्वात असणाऱ्या या सर्व प्रकारच्या ऊर्जेचा मानवी शरीरावर, जीवनक्रमावर, सृष्टीच्या नित्यक्रमावर सातत्याने काय व कसे परिणाम होतात, याचे अतिशय साधकबाधक विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

विश्‍वामध्ये अस्तित्वात असणाऱ्या ऊर्जेतील चैतन्याचा उपयोग साधनेद्वारे करता येऊ शकतो, हेच या विद्यांच्या अभ्यासातून प्रकर्षाने अनुभवता येते.
दशमहाविद्यांच्या या भिन्न-भिन्न स्वरूपांना समजण्यासाठी व ही शास्त्रोक्त माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ऋषिमुनींनी कथानकाचा, प्रतीकांचा वा निदानविद्येचा वापर केला. देवीपुराणांत पराशक्तीने दशमहाविद्येचे रूप कसे धारण केले, याचे वर्णन आहे. बृहद्धर्म पुराणामध्ये दशमहाविद्याच्या उत्पत्तीविषयीची कथा सांगितली आहे. बंगालमधील तोडलं तंत्रामध्ये १० पटल व ३९८ ऋचा दिलेल्या आहेत. यामध्ये दशमहाविद्या, त्यांच्या सहचारिणी, तसेच शिवासंबंधी माहिती दिलेली आहे. काही पुराणांमध्ये दशमहाविद्यांबरोबरच दशावतारांना जोडलेले आहे.

दशमहाविद्यांना प्रतीकरूपाने समजावून सांगताना देवता स्वरूप देऊन त्यांच्या तांत्रिक साधना निर्माण केल्या. या प्रत्येक साधनेचे स्वरूप, नियम वेगवेगळे आहेत. यंत्र, मंत्र व साधनेचे विशिष्ट तंत्र वेगवेगळे आहेत. मुहूर्त, पर्वकाळ पाहून, साधनशुचिता सांभाळून, आसनपद्धतींचा नीटनेटका अभ्यास करून साधनेला सुरवात केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 article sarojini chavan