
नवरात्री स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, हीच खरी साधना होय.
नवरात्री स्त्री हीच शक्ती निर्माणाचे प्रचंड मोठे केंद्र आहे. तिने स्वतःला जगापुढे सिद्ध करण्यापेक्षा, स्वतःशीच स्पर्धा करीत राहून स्वयंसिद्धा बनले पाहिजे. जगाने आपल्या पद्धतीने बदलावे अशी अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडविणे जास्त सोपे ! स्वतःशी तादात्म्य पावण्याचा मार्ग स्वीकारणे, हीच खरी साधना होय.
प्रत्येक स्त्रीकडे धाडस, बुद्धिकौशल्य, चातुर्य आणि कष्टाळू वृत्ती आहे, तरी तिला दुय्यम स्थान मिळते. याला कारण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीही मातास्वरूप गणली गेली आहे, पण हीच संस्कृती स्त्रीत्वाचा सन्मान करण्यास मात्र विसरली आहे. पूर्वीच्या कथांमध्ये सांगितले आहे, की देवीने दैत्यांशी युद्ध केले आणि त्यांचा नाश केला. देवीला कोणीच ठार मारू शकलेले नाही, त्यातून तिने हेच सिद्ध केले की कोणतीही बाह्यशक्ती नाहीतर स्वतःतील प्रखर ऊर्जाशक्ती आपला उद्धार करू शकते. पण तिच्यातील सुप्त शक्तीची जाणीव कोणालाही नाही, तिला स्वतःलाही नाही!
साधनेचा मार्ग कर्मकांड, यज्ञविधी, यंत्रपूजन, मूर्तिपूजन, योग, कुंडलिनी जागृती, नामस्मरण, जप, पूजेचा अथवा इतर कोणताही असो. कोणता मार्ग स्वीकारायचा याचे साधकांनी चिंतन करावे. केलेले कोणतेही कर्म ही साधनाच होय. साधनामार्गात श्रद्धा असणे हे अतिशय गरजेचे आहे. ज्ञानाच्या शोधात आपण बाह्यमुख होतो, तसेच अंतर्मुखही होणे गरजेचे असते.
आपल्यामध्ये अंतर्गत असणारे दैवीशक्तितत्त्व जाणण्यासाठी सबल, निर्भय मनाची गरज असते. निर्भय मन लवकर अंतर्मुख होऊ शकते. मन एकदा अंतर्मुख झाले, की अंतर्यामी असणाऱ्या दैवी शक्तितत्त्वाची जाणीव होऊ लागते, आपल्यातील ही दैविशक्ती इच्छा, ज्ञान व क्रियेच्या माध्यमातून प्रत्येकीनेच जागृत करणे महत्त्वाचे असते. मनाच्या तळातून तीव्र इच्छाशक्ती निर्माण झाली की इप्सित कार्य सहज शक्य होते.
इच्छाशक्तीतून स्वीकारलेले कार्य साध्य करण्यासाठी ज्ञान मिळविण्याची धडपड सुरू होते, संघर्ष करण्याची शक्ती मिळते. इच्छा व ज्ञानातूनच क्रियाशक्ती जागृत होते. स्त्रियांमध्ये या तिन्ही शक्ती फार लवकर जागृत होतात. ही त्रिशक्ती म्हणजेच ‘ललिता महात्रिपुरा सुंदरी’ अथवा ‘ललिताम्बिका’. ही दुसरी तिसरी कोणी नसून आपणच आहोत. या स्वरूपांचा सुप्त आविष्कार प्रत्येक स्त्रीमध्ये अंतर्भूत आहे, म्हणूनच प्रत्येक स्त्री स्वयंभू-स्वयंशक्ती आहे!