esakal | Navratri Festival 2019 : नाटकांतून समाज परिवर्तनाचा वसा (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanashri-Hebalikar

युरोपमधील संसदसदस्यांपुढे बोलायची संधी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल, स्थलांतरित तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या विशेष मुलांच्या जीवनात रंगभूमीच्या माध्यमातून आनंद फुलवण्याच्या प्रयोगाची माहिती धनश्रीनं युरोपमधील संसद सदस्यांना सांगितली. नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणाप्रसंगी धनश्रीला मनोगत मांडण्याची संधी मिळाली. अनुभवावर आधारित विचार तिनं मांडले. त्यानंतर उपस्थितांनी केलेल्या प्रशंसेमुळे तिचा हुरूप आणखी वाढला.

Navratri Festival 2019 : नाटकांतून समाज परिवर्तनाचा वसा (व्हिडिओ)

sakal_logo
By
नीला शर्मा

नाटकांतून मनोरंजनाबरोबरच लोकप्रबोधन करीत सामाजिक परिवर्तनाचा वसा धनश्री हेबळीकर या तरुणीनं घेतला आहे. यासंदर्भात तिला तिचे विचार मांडायची संधी युरोपमध्ये मिळाली. ती अभिनेत्री, गायिका, संगीतकार अशा विविध भूमिकांमधून वावरते. रंगभूमीला सामाजिक परिवर्तनाचं साधन मानून निरनिराळे प्रयोग करीत असते.

धनश्री हेबळीकर पूर्णपणे नाटकमय झाली असल्याची जाणीव तिला भेटणाऱ्या अनेकांना होते. नुसताच अभिनय नाही, तर नाटकासाठीचं गायन, संगीत दिग्दर्शन यातही ती रमते. ‘स्वतंत्र थिएटर’ या संस्थेची ती सहसंस्थापिका आहे. पुण्यातील बीएमसीसी रस्त्यावरील श्री महावीर जैन विद्यालयात ती रोज कुठल्या तरी नाटकाच्या प्रक्रियेत असते. क्रिएटिव्ह आर्ट डायरेक्‍टर या नात्यानं ती नाटकांच्या उभारणीत, सादरीकरणात दक्ष असते. नाटक या माध्यमाचा संकोच केवळ अभिजनवर्गापुरता का? नाटक हे माध्यम समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलं वाटणारं असावं, असं तिला वाटतं. नाटक बहुजनसुलभ करण्यासाठी ती झपाटलेली आहे.

सातत्यानं कार्यरत असलेली पुण्यातील हिंदी नाट्य संस्था म्हणून अल्पावधीत ठसा उमटवण्यामागं धनश्री आणि तिच्या चमूचे अविरत परिश्रम आहेत. ‘जिस लाहोर नहीं देख्या’, ‘कोमल गंधार’, ‘मुझे अमृता चाहिए’ व ‘जाग उठा है रायगड’ या व्यावसायिक सफाईनं बसवलेल्या प्रायोगिक नाटकांमधून धनश्री अभिनय करीत असते. ‘कबीरा खडा बाजार में’सारख्या नाटकात तिचं गायन असतं. शास्त्रीय संगीत शिकलेली असली तरी बोलीभाषेतील नाटकांमधील लोकगीतांसाठी वापरला जाणारा खुला बाज ती सहज पेलते. ‘कोर्ट मार्शल, ‘ॲन इव्हिनिंग विथ चेकोव्ह,’ ‘ॲन ॲक्‍सिडेंटल डेथ ऑफ ॲन अनार्किस्ट’ अशा नाटकांसाठी तिनं संगीत दिलं आहे. 

स्थलांतरितांच्या वस्त्यांमध्ये जाऊन, तेथील मुलं व महिलांच्या समस्या जाणून घेऊन तिनं त्या त्यांच्यासमोर नाट्यकृतींमधून मांडल्या. त्यामुळे त्या मंडळींना आपलं म्हणणं कुणीतरी समजून घेऊन जगाला समजावून देऊ शकतं, असा विश्वास वाटला. ‘सांगण्याचं भान’ आलेले तिथले काही जण मग भरभरून बोलू लागले. तिथली मुलं नाटकात सहभागी होऊ लागली.

वस्तीतील मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत पुण्यात झालेल्या एका परिषदेत धनश्रीला बीजभाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. धनश्रीनं चालवलेलं रंगभूमीचं हे आगळंवेगळं अभियान आहे. सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवर तिची दमदार वाटचाल सुरू आहे.