esakal | Navratri Festival 2019 : देवराई व जंगलांच्या अभ्यासाचा ध्यास
sakal

बोलून बातमी शोधा

sharyu-sathe

लाखो वर्षांपूर्वीच्या व सध्याच्या जंगलांची भौगोलिक व जैवविविधतेची स्थिती यांचा तौलनिक अभ्यास करून, त्याआधारे डॉ. शरयू साठे यांनी मांडलेले निष्कर्ष विविध पातळ्यांवर महत्त्वाचे ठरत आहेत. पर्यावरण अभ्यासक, धोरणकर्ते व प्रसंगी न्याय व्यवस्थेला त्यांचा उपयोग होत आहे.

Navratri Festival 2019 : देवराई व जंगलांच्या अभ्यासाचा ध्यास

sakal_logo
By
नीला शर्मा

पूर्वाश्रमीच्या शरयू सखदेव चव्हाण व लग्नानंतरच्या शरयू देवानंद साठे यांनी तीस वर्षांपासून निरनिराळ्या ठिकाणच्या जंगल व देवराईंचा केलेला अभ्यास समाजासाठी विविध पातळ्यांवर मार्गदर्शक ठरत आहे. एका ठिकाणी अत्याधुनिक शहर वसवताना किती प्रकारच्या जैवविविधतेला धोका निर्माण झाला, हे शरयूताईंच्या अभ्यासाआधारे फिर्यादी पक्षाने मांडले. शास्त्रीय अभ्यासामुळे तेथील कामाला स्थगिती देण्यात आली, असा अनुभव त्या सांगत होत्या. 

त्या म्हणाल्या, ‘‘ताडोबा, अंधारी, पेंच, गडचिरोली, शिवणी, मोहर्ली आदी अनेक ठिकाणच्या आरक्षित वळणांचा, देवराईंचा अभ्यास करण्याचा मला ध्यास जडला. यातून लक्षात आलं, की लाखो वर्षांपूर्वी आपल्याकडे सदाहरित जंगल होतं. मुबलक पाऊस होता. जैवविविधता भरपूर होती. हळूहळू तापमान बदलत गेलं. जंगलं कमी झाली. यासाठी औद्योगिकीकरण, शहरीकरण व इतर कारणांमुळे झालेली जंगलतोड कारणीभूत आहे. वनाच्छादन कमी झाल्याने जमिनीची धूप झाली. सध्या दिसणारी अनेक जंगलं ही एकाच प्रकारच्या झाडांची लागवडीतून असल्याने तेथील जैवविविधता मर्यादित आहे. यामुळे प्राणी, पक्षी, कीटक आदींना जगवणारी अन्नसाखळी बाधित होते. कालांतराने अशा जागांचं रूपांतर गवताळ कुरणांत होऊ लागतं.’’ 

प्राथमिक शाळेतील शिक्षक दांपत्याची कन्या असलेल्या शरयूताईंनी पदव्युत्तर परीक्षेत पुणे विद्यापीठात सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यांची पुस्तकं आज संदर्भग्रंथ म्हणून विद्यार्थी अभ्यासतात. इस्राईल, श्रीलंका, सिंगापूर, थायलंड आदी देशांमधील वनस्पतीशास्त्र विषयक परिसंवादामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात त्या विभागप्रमुख व मुख्य परीक्षा नियंत्रक पदावर  कार्यरत आहेत. 

त्या म्हणाल्या, ‘‘कित्येक ठिकाणच्या देवराई आज मरणाच्या पंथाला लागलेल्या आहेत. राजकारणी, प्रशासकीय यंत्रणा, अभ्यासक, पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्था आदी सर्वांनी वनं जगवण्यासाठी सक्रिय झालं पाहिजे. गवताच्या एका पात्याचाही संपूर्ण वृक्षासारखा आदर राखत त्याचं जतन  केलं पाहिजे.’’ 

उत्क्रांतीत झाडे आपल्याहून खूप पुढे 
शरयूताई म्हणाल्या, ‘‘झाडं उत्क्रांतीत आपल्याहून कमालीची प्रगत आहेत. माणूस पृथ्वीवर नव्हता, तेव्हाही वनस्पती होत्या व माणूस नाहीसा झाला तरी त्या राहतील. माती, पाणी, सूर्यप्रकाश व कार्बन डाय ऑक्‍साईड एवढ्या किमान मूलभूत घटकांवर झाडं जगतात. मात्र, किती आणि काय काय देतात. शून्य प्रदूषण करणारी औद्योगिक यंत्रणा म्हणजे झाडं म्हटलं तरी वावगं ठरू नये. 

  अभ्यास हाच विरंगुळा मानण्याची वृत्ती. 
  अतिप्राचीन वनस्पतीजीवाश्‍मांचा विशेष अभ्यास. 
  विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यावसायिक समुपदेशन 
  देवराई टिकवण्यासाठी प्रबोधनपर व्याख्यानं.