कष्टकऱ्यांच्या दारात करवीर निवासिनी अंबाबाई पालखी दर्शनाची प्रथा कायम 

सुधाकर काशीद
Thursday, 3 October 2019

कोल्हापूर - भले तेथे उद्योगाची चाके सुरू नसतील. भले तेथे कामगारांचे अस्तित्व राहिले नसेल. पण, तरीही कष्टकरी, श्रमिकांच्या दारात जाऊन त्यांना दर्शन देण्याची प्रथा अंबाबाईच्या पालखीने आज पाळली. नवरात्रातील ललित पंचमीची पालखी आज प्रथेप्रमाणे शाहू छत्रपती मिल्सच्या आवारात गेली.

कोल्हापूर - भले तेथे उद्योगाची चाके सुरू नसतील. भले तेथे कामगारांचे अस्तित्व राहिले नसेल. पण, तरीही कष्टकरी, श्रमिकांच्या दारात जाऊन त्यांना दर्शन देण्याची प्रथा अंबाबाईच्या पालखीने आज पाळली. नवरात्रातील ललित पंचमीची पालखी आज प्रथेप्रमाणे शाहू छत्रपती मिल्सच्या आवारात गेली.

अर्थात मिल बंद होती. पण, एखाद्या मिलमध्ये जाणे म्हणजे उद्योगाच्या मंदिरात पालखी जाण्याची ही देशात कुठेच नसेल, अशी प्रथा श्रद्धेने जपली गेली. ही प्रथा कोणत्याही धर्म धोरणातील नाही किंवा कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेख नाही. पण, छत्रपती शाहूंनी सुरू केलेली ही वेगळी प्रथा आहे. जो कष्ट करतो, त्याला देव स्वतःहून भेटतो, असा या प्रथेचा सार आहे आणि तो कोल्हापुरातील शाहू मिल्समध्ये पाळला गेला आहे.

लोकांना रोजगार मिळावा म्हणून..वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी सूत व कापड निर्मितीची मिल सुरू केली. कोटीतीर्थ तळ्याच्या काठावर साधारण 27 एकरात मिलची उभारणी झाली. अकराशे ते बाराशे जणांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला.

शाहू मिलचे 'मांजरपाट' कापड इतके दर्जेदार की, ते मिळवण्यासाठी रेशनकार्ड घेऊन यायला लागत असे. दोन पाळ्यात ही मिल चालू होती. मिल चालू होण्याचे संकेत मिळण्यासाठी रोज सकाळी पावणे सहा व दुपारी तीन वाजता भोंगा वाजत होता. त्यावेळी कोल्हापूर शहराची व्याप्ती लहान असल्याने सगळ्या गावांत तो ऐकू जात होता. किंबहुना शाहू मिलचा भोंगा वाजला की पहाट झाल्याचा संकेत शहरवासीयांना मिळत होता.

मिलमध्ये पगारही चांगले होते. मिलच्या कॅन्टीनत अवघ्या चार आण्यात चहा, चिवडा, खाजा कामगारांना मिळत होता. दर दिवाळीला बोनस होता. म्हणजेच शाहू मिलचा एकंदर कारभार उद्योगाला आणि रोजगाराला पूरक असा चालू होता. 

या शाहू मिलमध्ये दरवर्षी अंबाबाई पालखीच्या भेटीचा सोहळा होता. हा सोहळा म्हटला तर धार्मिक. पण, या सोहळ्यात मोठा आशय होता. दरवर्षी नवरात्रात अंबाबाईची पालखी ललित पंचमीच्या दिवशी त्र्यंबोली भेटीस जाते. या मार्गातच शाहू मिल आहे, या मिलमधील श्रमिकांना देवीचे दर्शन व्हावे, या आवारात पालखीने काही क्षण विसावा घ्यावा, पालखीच्या खांदेकऱ्यांना व सोबत आलेल्या भाविकांना अल्पोपहार मिळावा, म्हणूनही पालखीच त्र्यंबोलीला जाता जाता काही काळ शाहू मिलमध्ये आणण्याची प्रथा सुरु झाली.

खुद्द करवीर निवासिनी आपल्या मिलमध्ये येणार म्हणून कामगार फुलांच्या पायघड्या घालायचे. फुलांचा गालिचा तयार करायचे. त्यावर काही क्षण पालखी थांबायची. आरती व्हायची आणि पालखी पुढे त्र्यंबोलीला जायची. 

शाहू छत्रपती मिलचे वेळोवेळी आधुनिकीकरण झाले नाही. त्यामुळे कापड निर्मितीच्या स्पर्धेत हळूहळू शाहू मिल मागे पडली. कामगार कपात सुरू झाली. एक दिवस मिल पूर्ण बंद पडली. कामगारांचा रोजगार गेला आणि मिलचा परिसर भकास होत गेला. शाहूंच्या नावाने असलेल्या मिलचा दिवसागणिक होत गेलेला ऱ्हास शाहूप्रेमींनी निमूटपणे पाहिला.

आता तेथे मिलचे केवळ भग्नाशेष आहेत. म्हणजे रोजगाराचे कष्टकऱ्यांचे मंदिर होते. ते बंद पाडून आता तेथे कृत्रिम सजावटीचे शाहू स्मारक करण्याचे नियोजन सुरू आहे. आणि यातही वेगळेपण असे की, याही अवस्थेत अंबाबाईच्या पालखीची दरवर्षी मिलला भेट ठरलेली आहे. एक काळ फुल फॉर्ममध्ये असलेल्या शाहू मिलच्या भेटीत आणि आताच्या बंद शाहू मिलमध्ये भेटीत जरूर फरक आहे. पण, अंबाबाईच्या पालखीने दरवर्षीच्या भेटीची परंपरा पाळली आहे. 

निवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा 
अंबाबाईची पालखी शाहू मिलमध्ये येणार म्हणून मिलचे वॉचमन, काही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी बंद मिलच्या दरवाजाला आंब्याच्या पानाचे, झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले होते. प्रवेशद्वार ते मिलचे प्रांगण रांगोळी घातली होती. फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. या मिलमध्ये पुन्हा एखादी रोजगार केंद्र सुरू आहे. तरुणांना रोजगार मिळावा जणू अशीच प्रार्थना तेथे आज लगबगीत असणारे निवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय करत होते. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Karveer Nivasini Ambabai Palkhi