करवीर निवासिनी अंबाबाईची त्रिपुरसुंदरी रूपात सालंकृत पूजा 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी हजेरी लावली. श्री अंबाबाईची त्रिपुरसुंदरी रूपात सालंकृत पूजा बांधली. सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी झाल्यानंतर घटस्थापना व त्यानंतर शासकीय पूजा झाली. 

आदि शंकराचार्यांनी रचलेले त्रिपुरसुंदरी अष्टक म्हणजे आठ श्‍लोकांचे स्तोत्र देवी उपासक, श्री विद्या सांप्रदायामध्ये अत्यंत प्रिय आहे. जिने कुंकवाचे विलेपन केले आहे. जिच्या मस्तकावरील कस्तूरीतिलकाला केसांच्या कुरळ्या बटा स्पर्श करू पाहत आहेत. जी मृदूल आहे. जिने हातामध्ये बाण, धनुष्य, पाश आणि अंकुश धारण केले आहे. जी तांबड्या जास्वंदीच्या फुलांनी शोभून दिसते, अशा अंबिकेचे जपाव्दारे स्मरण करतो, असे या पूजेचे धार्मिक महात्म्य आहे. पुरूषोत्तम ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी ही पूजा बांधली. 

दरम्यान, भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही दिवसभर भाविकांची गर्दी राहिली. सकाळी मंदिरात घटस्थापना झाल्यानंतर देवीची पालखी अंबाबाईच्या भेटीसाठी गेली. अंबाबाई मंदिरात शेखर मुनीश्‍वर यांच्या हस्ते घटस्थापना तर धनाजी जाधव यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली. तुळजाभवानी मंदिरात युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते घटस्थापना झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Karveer Nivasini Ambabai Puja