करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी आज ललिता पंचमीनिमित्त श्री अंबाबाईची अंबारीतील गजारूढ रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यानिमित्ताने टेंबलाई टेकडीवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबोली यात्रा झाली. दुपारी पारंपरिक उत्साहात कोहळा फोडण्याचा विधी झाला. 

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या पाचव्या दिवशी आज ललिता पंचमीनिमित्त श्री अंबाबाईची अंबारीतील गजारूढ रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. यानिमित्ताने टेंबलाई टेकडीवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबोली यात्रा झाली. दुपारी पारंपरिक उत्साहात कोहळा फोडण्याचा विधी झाला. 

दरम्यान, उत्सव मध्यावर आला असताना पहिल्या पाच दिवसातच चार लाखाहून अधिक भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. रात्री पालखी सोहळ्यालाही मोठी गर्दी होवू लागली आहे. 
श्री अंबाबाईने कोल्हासुराबरोबर युद्ध करून त्याचा वध केला. त्याचा आनंदोत्सव सर्व देव-देवतांनी साजरा केला; मात्र या सोहळ्यासाठी त्र्यंबोलीला बोलाविण्याचे राहून गेले. त्यामुळे रुसून बसलेल्या त्र्यंबोलीदेवीचा रूसवा काढण्यासाठी श्री अंबाबाई लवाजम्यासह तिच्या भेटीस गेली. कोल्हासूर वधाचे प्रात्यक्षिक त्र्यंबोलीला कुमारीरूपात दाखविले. तरीही त्र्यंबोलीने आपला हट्ट सोडला नाही. त्यामुळे प्रत्येक ललिता पंचमीला श्री अंबाबाई तिची भेट घेऊन खणा-नारळाने ओटी भरते, असे या पूजेचे आणि एकूणच परंपरेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक रामप्रसाद ठाणेकर, श्रीनिवास जोशी, प्रसाद लाटकर यांनी सांगितले. दरम्यान, पूजेसाठी रवि माईणकर यांचे विशेष सहकार्य मिळाले. 

टेंबलाई टेकडीवर हाणामारीचा प्रकार 
टेंबलाई टेकडीवर दुपारी साडेबाराच्या सुमारास खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी झाला. यावेळी कोहळ्याचे तुकडे मिळवण्यावरून तरूणांच्या गटात हाणामारी झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर दगडफेकीचाही प्रकार घडला. सुमारे वीस मिनिटांहून अधिक काळ हा थरार सुरू होता. त्यात काही तरूण जखमी झाले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Karveer Nivasini Shree Ambabai puja