Video कोल्हापूर : मेबॅक मोटार दसरा सोहळ्यासाठी सज्ज 

मतीन शेख
Wednesday, 9 October 2019

कोल्हापूर - केशरी रंगाची चकचकीत, देखणी, जुन्या विदेशी सिनेमात दिसणाऱ्या मोटारीशी साधर्म्य असलेली जर्मन बनावटीची मेबॅक मोटार कोल्हापूरच्या रस्त्यावर धावायला लागली की, हजारो नागरीकांच्या नजरा या गाडीवर खिळल्या जातात. 1932 साली राजघराण्यात दाखल झालेल्या या मोटारीची चर्चा दसरा जवळ आला की रंगते आणि तिला पाहण्याची उत्कंठाही शिगेला पोचते. या मोटारीचे पॉलिश करून ती दसरा सोहळ्यासाठी सज्ज करण्यात आली. 

कोल्हापूर - केशरी रंगाची चकचकीत, देखणी, जुन्या विदेशी सिनेमात दिसणाऱ्या मोटारीशी साधर्म्य असलेली जर्मन बनावटीची मेबॅक मोटार कोल्हापूरच्या रस्त्यावर धावायला लागली की, हजारो नागरीकांच्या नजरा या गाडीवर खिळल्या जातात. 1932 साली राजघराण्यात दाखल झालेल्या या मोटारीची चर्चा दसरा जवळ आला की रंगते आणि तिला पाहण्याची उत्कंठाही शिगेला पोचते. या मोटारीचे पॉलिश करून ती दसरा सोहळ्यासाठी सज्ज करण्यात आली. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मोटारीचा मोठा छंद होता. तो छंद छत्रपती राजाराम महाराजांनी जोपासला. 1932 मध्ये जर्मन बनावटीची मेबॅक मोटार महाराजांनी ऑर्डर देऊन लंडन मधून खरेदी केली. संस्थानाच्या ध्वजाचा रंग केशरी असल्याने केशरी रंगाच्या मोटारीची ऑर्डर देण्यात आली. जगात अगदी बोटावर मोजण्याइतपत या मोटारीचे मॉडेल उपलब्ध आहे.

ऍडॉल्फ हिटलरकडे ही मोटार होती. दुसरी छत्रपती घराण्याकडे मोटारीचे मॉडेल असल्याचे मालोजीराजे सांगतात. कारच्या बोनेटच्या पुढे करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती असून, मधल्या हेडलाईट जवळ भवानीमाता शिवरायांना तलवार देते, असे संस्थानाचे चित्र कंपनीकडून तयार करून घेतले आहे.

टिंटेड काच असलेल्या मेबॅकमध्ये स्पीड मीटर हे किलोमीटर ऐवजी मैल परिमाणाचे एकक आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे एक किलोमीटर मोटार धावते. सतरा फूट लांब आणि सहा फूट रुंद असलेल्या 'मेबॅक' मध्ये सात व्यक्ती आरामात बसू शकतात. टिंटेड ग्लास आणि उघडझाप करणारे कापडी छत मेबॅकच्या सौंदर्यात अधिक भर घालते. रेल्वेच्या हॉर्न सारखा खास वेगळा हॉर्न या कारला बसवण्यात आला आहे. हॉर्नच्या आवाजाने अनेकांचे लक्ष वेधले जाते. 

मेबॅक मोटारमध्ये डबल व्हेलॉसिटी कार्बोरेटर असल्याने इंजिनची कार्यक्षमता आजही टिकून आहे. 86 वर्षांपूर्वी राजघराण्यात दाखल झालेली मोटार आजही सुस्थितीत आहे. सध्या केवळ सीमोल्लंघन सोहळ्यासाठी मेबॅक रस्त्यावर आणली जात असली तरी तिची काळजी वर्षभर घेतली जाते. संस्थानकाळात दसऱ्यामध्ये हत्ती, घोडे अग्रभागी होते. सर्वात शेवटी मोटार असायची. सध्याच्या युगात हत्ती मिळणे मुश्‍कील झाल्यामुळे जुन्या काळातील मेबॅक मिरवणुकीच्या अग्रभागी आली. 

भारतात म्हैसूर व कोल्हापूरचा दसरा प्रसिद्ध आहे. विजयादशमी दिवशी सायंकाळी सोने लुटण्याचा सोहळा चौफाळ्याच्या माळावर अर्थात दसरा चौकात असतो. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो करवीरकर उपस्थित असतात. यावेळी राजघराण्यातील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज शहाजीराजे, यशस्विनीराजे, यशराजे यांची स्वारी या मोटारीतून येते. 

मेबॅक मोटार आमच्या राजघराण्यातील एक सदस्य आहे. लहानपणापासून आमच्या अनेक आठवणी मोटारीशी जोडल्या आहेत. सध्याच्या इम्पोर्टेड कारपेक्षा या मोटारीत सफर करण्यात अधिक आनंद वाटतो. मोठे बंधू संभाजीराजे व माझ्या लग्नाच्या काढलेल्या वरातीचा प्रसंग विसरना न येण्यासारखा आहे. कोल्हापूरची शान वाढवण्यात ही मेबॅक मोटार नेहमीच अग्रेसर आहे. 
- महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती. 

मेबॅक मोटारीचा मार्ग बदलणार 
महावीर महाविद्यालय ते खानविलकर पेट्रोल पंप रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे यंदा मेबॅक मोटारीचा मार्ग बदलणार आहे. मोटार न्यू पॅलेस, महावीर महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, खानविलकर बंगला, खानविलकर पेट्रोल पंप, सीपीआर चौकमार्गे दसरा चौकात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Mebac Motor ready for Dussehra Festival