Navratri Festival 2019 : हार, गजरे, फुलांची सजावट करून कुटुंब सावरले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

महिलांसाठी अनुभवाचे बोल

  • संकटे कितीही आली तरी त्याला निर्भीडपणे सामोरे जा.
  • कोणताही व्यवसाय हा लहान नसतो. सुरवात करा यश नक्कीच मिळेल.
  • प्रामाणिकपणे कष्ट केले तर परिस्थिती बदलू शकते.
  • अडचणी सर्वांसमोर असतात; मात्र जो वाट शोधतो त्यालाच यश मिळते.
  • अपयश आले तरी थांबून चालत नाही. 
  • सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे.
  • मनात जिद्द असेल तर नक्कीच मार्ग सापडतो.

लग्न झाल्यानंतर काही वर्षांतच पतीचे निधन झाले. दोन मुली, एक मुलगा आणि कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडली. त्यांच्या भविष्याची चिंता असल्याने न डगमगता, कोणापुढेही हात न पसरवता घरच्या पारंपरिक व्यवसायाला सुरवात केली. अनेक संकटे आली; पण त्या संकटांना सामोरे जात कुटुंबाची घडी पुन्हा सावरली. 

मी मूळची आष्टूर (ता. लोहा, जि. नांदेड) येथील. तेथील केरबा फुलारी यांच्याशी २००१ मध्ये विवाह झाला. लग्नाच्या दहाव्या वर्षी पतीचे अकाली निधन झाले. पदरात दोन मुली आणि एक मुलगा. कमी वयात वैधव्य आल्यामुळे दुःखाचा डोंगरच उभा राहिला. एकीकडे पती निधनाचे दुःख आणि दुसरीकडे तिन्ही मुलांचे भविष्य. पुढे काय करायचे, हा यक्षप्रश्न उभा होता.

मला माहेर आणि सासरकडून हार, गजरे आणि फुलांच्या सजावटीचा वारसा मिळाला आहे. पुढे याच व्यवसायात पाय ठेवत पाल्यांच्या भवितव्यासाठी मी घराची चौकट ओलांडली. सुरवातीला आष्टूर येथे काम सुरू केले. मात्र, व्यवसाय अपेक्षित चालत नव्हता. म्हणून मग आसपासच्या गावांचा शोध घेतला आणि २०१३ मध्ये चापोली (ता. चाकूर) गाठले. येथे एकही फुलारी नसल्याने आणि हे महामार्गावरील मोठे गाव असल्याने येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून येथेच हार, गजरे, फुलांच्या सजावटीचा व्यवसाय सुरू आहे. मिळालेल्या उत्पन्नातून मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. चापोली, हिंपळनेर आणि नांदेड येथून फुलांची खरेदी करून आणते. सकाळी पाच वाजेपासून घरातील कामे आटपून हार, गुच्छ बनवून विक्रीसाठी घेऊन जाते. आता कालानुरूप व्यवसायातले बदलही स्वीकारले आहेत. त्यामुळे मागणीनुसार लग्न, वाढदिवस आणिा इतर प्रकारच्या समारंभांत स्टेज, वाहन सजावट करण्याच्या व्यवसायात समावेश केला आहे. मुलगा निखिल व दोन्ही मुली मला या कामात मदत करतात.

(शब्दांकन - प्रा. डॉ. रवींद्र भताने)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Renuka Fulari Lifestyle Success Motivation