Navratri Festival 2019 : डिझाईन थिंकिंगमधून कौशल्यनिर्मिती

अभय जेरे
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

आपल्याला तरुणांना आकलनक्षमता आणि डिझाईन थिंकिंग या कौशल्यांचे प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यांना ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या शोधून त्यावर शाश्‍वत उत्तर शोधण्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल. या प्रशिक्षणाने तरुणांमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा आत्मविश्‍वास व उत्पादननिर्मितीचे कौशल्य निर्माण होईल.

मी  काही दिवसांपूर्वी इनोव्हेशन आणि सर्जनशीलता यांची आपल्या शिक्षणव्यवस्थेतील महत्त्व या संदर्भात पर्सिस्टंट सिस्टम्सचे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांच्याशी चर्चा करत होतो. त्या वेळी डॉ.  देशपांडे म्हणाले की, ही संकल्पना खूप महत्त्वाची असली, तरी आपण कल्पकतेला आत्मविश्‍वासाशी जोडणारा आराखडा विकसित करण्यासाठी काम केले पाहिजे. तरुणांना त्यांच्या आयुष्याची जबाबदारी त्यांनीच घेण्याची जाणीव करून दिली पाहिजे. हा मुद्दा आणखी विस्ताराने मांडताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘सध्या आपले बहुतांश तरुण रेल्वेगाडीच्या डब्यांप्रमाणे आहेत. ते पुढे जाण्यासाठी एकमेकांकडे बघत आहेत. यातील थोडेच इंजिनप्रमाणे इतरांना पुढे नेऊ शकतात. आपल्याला अधिकाधिक इंजिनांची निर्मिती करावी लागेल. या इंजिनांत आत्मविश्‍वास, ऊर्जा आणि इतरांना पुढे नेण्याची क्षमता असावी. इनोव्हेशन आणि सर्जनशीलतेची संकल्पना आपण आणखी इंजिनांची निर्मिती करण्यासाठी वापरली पाहिजे. भारतात सध्या ३.५ कोटी विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत असल्याने हे खूप महत्त्वाचे आहे. आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे व नंतर नीतिमूल्यांवर आधारित चांगले जीवनमान जगण्यासाठी संधी दिल्या पाहिजेत.’’

मी डॉ. देशपांडेंच्या मतांशी पूर्णपणे सहमत नाही. मला वाटते, आपण शोध घेणाऱ्या तरुणांना पुढे आणल्यासच हे सर्व साध्य करू शकू. ते नोकरी शोधणारे नाही, तर नोकऱ्या निर्माण करणारे असतील. आपल्याला समस्यांवर उत्तरे शोधणारे तरुण उभे करायचे असल्यास मोठ्या प्रमाणावर तरुणांना आकलन क्षमता आणि डिझाईन थिंकिंग या कौशल्यांचे प्रशिक्षण द्यावे लागेल. आपल्याला त्यांना खरी समस्या शोधून त्यावर शाश्‍वत उत्तर शोधण्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल. या प्रशिक्षणाने तरुणांमध्ये जीवनातील आव्हाने पेलण्याच्या आणि सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा आत्मविश्‍वास निर्माण होईल.

आमच्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन उपक्रमादरम्यान डिझाईन थिकिंग या कौशल्याचा विद्यार्थ्यांवर झालेला प्रभाव आमच्या लक्षात आला. डिझाईन थिकिंगचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी प्रश्‍नांची उकल करण्यासंदर्भात अधिक सक्षम असल्याचे दिसले. त्याची परिणती म्हणून अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास अप्रशिक्षित विद्यार्थ्यांच्या तुलनेत कितीतरी अधिक होता. समस्यांवर उत्तरे शोधणे आणि सर्जनशीलता वाढवणे यासाठी असलेल्या हॅकेथॉन मॉडेलवर मी स्वतंत्र लेख लिहिणार आहे. आपण तरुणांनी त्यांच्यातील सर्जनशीलतेचे रूपांतर त्यांनी स्वत:साठी, इतरांसाठी आणि देशासाठी संपत्तीनिर्मिती करण्यासाठी करावे, यासाठी आपण त्यांना प्रशिक्षित करावे लागेल. 

डिझाईन थिकिंग हा इनोव्हेशनसाठीचा एक मानवकेंद्रित दृष्टिकोन असून, त्यात लोकांच्या गरजा, तंत्रज्ञानातील शक्यता आणि व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा एकत्रित विचार करण्यात येतो. डिझाईन थिकिंगमुळे तरुण समस्या शोधणे, ती निश्‍चित करणे, कल्पना करणे, नमूना बनवणे आणि चाचणी घेणे या पाच टप्प्यांत विचार करू लागतात.

पहिली आणि सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या ग्राहकांची समस्या शोधणे. यातून तुम्हाला तुमच्या ग्राहकांना समजून घेता येते. दुसरा टप्पा, उकल करण्यासाठीच्या समस्येची नेमकी मांडणी करणे आणि तिच्या उत्तरांची यादी करणे. ग्राहक आणि समस्या निश्‍चित झाल्यावर अंतिम उत्पादनाला लक्षात घेऊन कल्पनेचा विकास करणे. त्यानंतर उत्पादनला अंतिम स्वरूप येण्यासाठी एक नमुना तयार करणे. शेवटचा टप्पा, उत्पादनाची चाचणी घेणे. चाचणी केल्यानंतर त्यातून निघालेल्या निष्कर्षांनुसार दोष दूर करणे आणि पुन्हा एकदा या प्रक्रियेतून जाणे.

ही प्रक्रिया सोपी वाटत असली, तरी मोठ्या संख्येने व्यावसायिक यातील अनेक टप्पे टाळतात. परिणामी, उत्पादन साधारण दर्जाचे बनते आणि ते अपयशी ठरू शकते. डिझाईन थिकिंगच्या प्रशिक्षणामुळे अपयशाचे हे प्रमाण नक्कीच कमी होते. म्हणजेच उत्तमाचा ध्यास ही मानसिकता आपल्या शिक्षणव्यवस्थेत नाही आणि अनेक प्रसंगांमध्ये तरुण जुगाड किंवा ‘चलता है’सारख्या दृष्टिकोनातून काम करतात  व त्याचा त्यांना भविष्यात तोटाच होतो. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आम्ही २०१५मध्ये पुण्याचे स्मार्ट सिटी करण्याच्या प्रस्तावाचा भाग म्हणून ‘डिजिटल पुणे हॅकेथॉन’ उपक्रमाचे आयोजन केले. आम्ही पुण्याच्या सार्वजनिक बसव्यवस्थेला त्यांच्या समस्या सांगण्याची विनंती केली होती. त्यावरची उत्तरे शोधण्यासाठी आमच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर एक आव्हान म्हणून त्या ठेवल्या. त्यातील एक सोपे आव्हान होते बस कंडक्टरसाठी अॅप तयार करणे. अनेक तरुणांनी बस कंडक्टरसाठी अॅपची निर्मिती केली. त्या अॅपचे मूल्यमापन करताना पंचांच्या असे लक्षात आले, की बहुतेकांनी आयफोन अॅप बनवले आहे. काही विद्यार्थ्यांनी अॅंड्रॉइड अॅपची निर्मिती केली होती, मात्र त्यातील अनावश्यक फीचर्समुळे ते फारच जटिल होते.

आमच्या पंचांनी विद्यार्थ्यांना पुढील अतिशय सोपे प्रश्‍न विचारले. तुम्ही कंडक्टरला भेटलात का? तुमच्या उत्पादनाची निर्मिती करण्यापूर्वी त्यांच्या गरजांसंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली का? किती कंडक्टरकडे आयफोन आहेत? कंडक्टरना स्मार्टफोन वापरणे किती सोयीचे वाटते? बहुतांश विद्यार्थ्यांनी कंडक्टरशी न बोलताच ॲपची निर्मिती केली होती. ग्राहकांवर भर देण्याच्या टप्प्याचा पूर्णपणे अभाव होता आणि संकल्पनेचा विकास हा निव्वळ अंदाजावर करण्यात आला होता.

मी माझ्या नंतरच्या लेखांत विद्यार्थ्यांनी डिझाईन थिकिंगचा वापर करून समस्या समजून घेऊन योग्य उत्पादनांची निर्मिती केल्याची उदाहरणे देणार आहे. तरुणांना आकलनक्षमतेच्या कौशल्याविषयी प्रशिक्षण दिल्याने इनोव्हेटरच्या संख्येत नक्कीच वाढ होईल, मात्र यातून डॉ. देशपांडेंनी सुचवल्याप्रमाणे आत्मविश्‍वासाने भारलेले इंजिन मोठ्या संख्येने तयार होतील. मनुष्यबळ विकास मंत्रालय आकलनक्षमता आणि डिझाईन थिकिंग या कौशल्यांच्या तरुणांमधील प्रसारासाठी फारच उत्सुक आहे. अलीकडेच विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली आहे. मी या समितीचा संयोजक आहे. स्वयम या व्यासपीठावर आकलनक्षमता आणि डिझाईन थिकिंग या कौशल्यांसाठी ३५ ते ४० तासांचा ऑनलाइन किंवा ३ क्रेडिट कोर्सचा आराखडा तयार करणे, यासाठी ही समिती स्थापन झाली आहे. अभ्यासक्रम तयार झाल्यावर आम्ही तो पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पूर्ण करण्यास सांगू.

(क्रमशः)

(लेखक मनुष्यबळ विकास मंत्रालयात चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Skills creation from Design Thinking