Navratri Festival 2019 : आदिशक्तीच्या उत्सवाला सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

आदिशक्ती, दुर्गामाता, चंडिका, अंबामाता अशी नावे विविध; मात्र, दुष्टांचा संहार करणारे ते आदर्श रूप एकच. या आदिशक्तीची आराधना करण्यासाठी रविवारी घरोघरी घटस्थापना करण्यात आली.

धनकवडी - आदिशक्ती, दुर्गामाता, चंडिका, अंबामाता अशी नावे विविध; मात्र, दुष्टांचा संहार करणारे ते आदर्श रूप एकच. या आदिशक्तीची आराधना करण्यासाठी रविवारी घरोघरी घटस्थापना करण्यात आली. काही घरांमध्ये दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध मंदिरामध्ये पहाटेपासून सुरू असलेले मंत्रपठण, पूजाविधी, सनई व नगारावादन अशा मंगलमय वातावरणात आदिशक्तीच्या उत्सवाला आज सुरवात झाली. 

शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह काही औरच असतो. सकाळपासूनच घरगुती घट बसविण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. घटस्थापनेसाठी अनेक जण मातीच्या घटासह देवीच्या प्रतीकात्मक  मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. यामध्ये घटस्थापनेसाठी देवीला सुंदर मुकुट, दागिने, तोरणे, पत्री, विड्याची पाने, झालर, आकर्षक झुंबर अशी सजावट करण्यात येते. घरगुती घट बसविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. तसेच, सार्वजनिक मंडळांनी ‘दुर्गामाता की जय’, ‘अंबामाता की जय’चा घोष करीत दुर्गादेवीच्या मूर्तीची मिरवणुकीने उत्साहात प्रतिष्ठापना केली. ठिकठिकाणी आध्यात्मिक, वारकरी तसेच, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अशा भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने शहरातील देवीच्या मंदिरामध्ये व घराघरांमध्ये घटस्थापना झाली.

महालक्ष्मी मंदिरात ‘पद्मनाभ’ची प्रतिकृती 
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन 
करमळकर यांनी सपत्नीक घटस्थापनेची पूजा मंदिरामध्ये केली. महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली देवीच्या गाभाऱ्यात फुलांची व विविधरंगी मखरांनी आकर्षक सजावट करण्यात आली. भाविकांनी घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासून महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली. यंदा नवरात्र उत्सवानिमित्त केरळमधील पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदिरात यंदा उत्सवांतर्गत धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival start