Navratri 2022 : सेंद्रीय शेतीसाठी झटणारी सविता ,वाचा तिच्या जिद्दीची कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratri festival

Navratri 2022 : सेंद्रीय शेतीसाठी झटणारी सविता ,वाचा तिच्या जिद्दीची कहाणी

पुणे : शेतात रासायनिक खते वापरून जास्त उत्पन्न मिळवण्याची धडपड सगळेच करतात. पण, सेंद्रीय शेतीचा अट्टहास धरणारी सविता डकले सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. औरंगाबादमधील पेंडगाव या छोट्याश्या खेड्यात राहणाऱ्या सविताने फेसबुकवर ८ लाखांहुन जास्त लोकांचा गृप बनवला आहे. यामुळे फेसबुकनेही दिल्लीत तिचा सत्कार केला आहे. याच सविताची कहाणी ऐकूया तिच्याच शब्दात..

नमस्कार मी सविता. तूम्हाला माझी कहाणी सांगते. माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. माझ्या माहेरची परिस्थिती तशी बेताचीच होती. आम्ही पाच भावंड होतो. कमी मोबदल्यात खाणारी तोंड जास्त. यामूळं म्हणावं तसं जगता आलं नाही. भावंडांच्या शिक्षणासाठी मी एका कंपनीत कामालाही जात होते. यामुळं मी दहावीत नापास झाले. २००४ मध्ये पेंडगावमधील एका शेतकऱ्यासोबत माझं लग्न झालं. मला २ मुले आहेत कन्याश्री आणि आदित्य. माझ्या पतीची सव्वा एकर जमीन आहे. त्यामुळे नाईलाजाने कधीच शेतात न गेलेली मी शेतात जाऊ लागले आणि शेतीची कामे शिकू लागले.

याच दरम्यान आमच्या गावात महिला सक्षमीकरणासाठी काम करणारी एक संस्था आली. मी त्या संस्थेत काम करायला सुरु केलं. या संस्थेत आम्हाला स्वयंरोजगार कसा करावा हे शिकवले जात होते. याच संस्थेकडून मी सेंद्रिय खत कसे बनवायचे आणि सेंद्रिय शेती कशी करायची यावर काम सुरु केले. मी स्वत: सेंद्रिय शेती करायला सुरु केली. याचा मला फायदाच झाला. मी अनेक कृषी प्रदर्शन आणि कार्य शाळेत सहभाग घेऊन लोकांना याबद्दल समजावले.

माझ्या मुलीमुळे मी पुन्हा १० ची परीक्षा देण्याचे धाडस केले. त्यानंतर मी न थांबता ११ ला प्रवेश घेतला. आता मी १२ वीत असून लवकरच माझी बोर्डाची परिक्षाही देणार आहे. खूप शिकायची इच्छा आहे माझी. अजून थोडे शिकून जगाला सेंद्रीय शेतीबाबत जागृत करायचा माझा मानस आहे.

सेंद्रीय शेती करण्यासाठी मी लोकांना प्रोत्साहीत करत आहे. लोकांनी रासायनिक शेती न करता आपली पारंपरिक शेती करावी असे मला वाटते. यासाठी आधी मी माझ्या भागातील महिला शेतकऱ्यांचा व्हॉट्सअप गृप काढला. त्यावर मला ७०० महिला जॉईन झाला. महिलांचा असा प्रतिसाद पाहुन मी फेसबुकवर सेंद्रीय शेतीचा गृप काढला. त्यावरही अनेक लोक सेंद्रीय शेतीबद्दल जाणून घेतात. शंका विचारतात. लोकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहुन प्रोत्साहन मिळते.

‘तू फेसबुकवर इतक्या संख्येने लोक एकत्र केले आहेस. तुला दिल्लीला यायलाच लागेल’, असा जेव्हा फेसबुककडून फोन आला. तेव्ह पोटात गोळा आला होता. दिल्ली गाठायचे स्वप्न कधी पाहिलेही नव्हते. आणि थेट संधी मिळाली होती. दिल्ली जवळ करायची हा विचार करूनच टेन्शन आलं होतं. घरच्यांची ही तीच अवस्था होती.

दिल्लीला इतक्या लांब मी कधी एकटी गेली नव्हते. आता गेले नाही तर परत कधीही जाऊ शकले नसते. विमान प्रवास, त्या सगळ्या प्रोसेस याच टेन्शन आलेलं. पण फेसबुकच्या ऑफीसमध्ये जाताच ' सविता आली , सविता आली अस म्हणत जेव्हा फेसबुकच्या महिला अधिकारी गळ्यात पडल्या तेव्हा स्वतचच अप्रूप वाटलं. त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या माझा सत्कारही केला. मला नविन फोनही भेट म्हणून दिला.

एकदा मी सेंद्रिय शेतीचे पीक चांगले आल्याबद्दल लिहिलं होतं. माझ्या शेजारील शेतकऱ्यानेही तसे केले आणि त्याला फायदा झाला. त्याबद्दल मी पोस्ट केली. त्यावर एका अधिकाऱ्याची कमेंट आली की, हे सगळं खोटं आहे. लोकांना वेड्यात काढू नका. या आधीही काही नकारात्मक कमेंट आल्या होत्या त्यांचं मला काही वाटलं नाही. पण ही कमेंट अगदीच जिव्हारी लागली. मला ते सहनच झालं नाही. मी लगेच त्या व्यक्तीच्या फेसबुक प्रोफाइलवरून नंबर शोधला आणि त्यांना व्हिडीओ कॉल केला.

त्या व्यक्तीने 2 वेळा माझा फोन कट केला. पण तिसऱ्यांदा त्यांनी फोन उचलला. त्यावेळी मी शेतातच होते आणि जेवायला बसले होते. मी त्यांच्याशी बोलले, माझं शेत, माझ्या सहकारी हे सगळं दाखवलं त्यांनाही ते पटलं आणि ते नरमले. त्यांनी माझी माफी मागितली. माझ्या कामाचे कौतुक केले आणि यावरच न थांबता त्यांनी फेसबुकवरही माझी माफी मागितली.

माझं काम लोकांपर्यंत पोहोचत आहे. लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत. लोकांनी त्यावर कामही सुरू केलं आहे. याच इतके दिवस अस काही खास वाटत नव्हतं. पण जेव्हा अभिनेते सुनील शेट्टी यांनी कमेंट करून माझ्या कामाचं कौतुक केलं तेव्हा स्वतःचाच अभिमान वाटला. शेतीच्या कामासोबतच मी माझ्या गावातील महिला, तरुणी यांना मार्गदर्शन करत असते. त्यांची बँकेतील कामे, बचतगट खाते उघडणे, एखादे काम शिकवत असते.

मी 7 वीतुन 10 मध्ये यायला बरीच वर्षे लागली. या वर्षात मी बरच काही अनुभवलं. मला शिक्षणाची आवड होती त्यामुळेच मी माझ्या मुलीसोबत 10 वीची परीक्षा दिली आणि ती पासही झाले. आणि आता 12 वीचा फॉर्म भरला आहे. मी शिकले माझ्या कुटुंबामुळे. पण माझ्या शेजारील काही स्त्रिया आजही बंधनात आहेत. त्या माझ्या जवळ येऊन रडतात. तेव्हा मी त्यांच्या घरच्यांची समजूत घालते आणि त्यांना मुक्त करते. आता त्या महिला त्यांना हवं तसं करू शकतात, हेच माझ्या जगण्याचे मला उर्जा मिळण्याचे साधन आहे.