Navratri Festival 2019 : अध्यात्म, कला व संस्कृतीचा सुरेल संगम

डॉ. रामचंद्र देखणे
Sunday, 29 September 2019

लोककलावंतांचा सन्मान करणारा, पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा पुणे नवरात्र महोत्सव. त्याचे उद्‌घाटन रविवारी (ता. २९) विविध क्षेत्रांतील नवदुर्गांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त घेतलेला आढावा... 

लोककलावंतांचा सन्मान करणारा, पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा पुणे नवरात्र महोत्सव. त्याचे उद्‌घाटन रविवारी (ता. २९) विविध क्षेत्रांतील नवदुर्गांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त घेतलेला आढावा... 

शास्त्रीय, अभिजात संगीतापासून ते महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे सादरीकरण असलेला हा महोत्सव यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच शारदीय नवरात्र उत्सवाची एक परंपरा आहे. शहरात एकमेव गाजणारा नवरात्र उत्सव म्हणजे ‘पुणे नवरात्र महोत्सव’. गेल्या पंचवीस वर्षांपासून भक्ती आणि अध्यात्माच्या अनुषंगाने हा महोत्सव पुणेकरांचे आकर्षण ठरला आहे.

महोत्सवाला एक सांस्कृतिक अधिष्ठान असून, आध्यात्मिक परंपरा जपण्याचे कामही महोत्सवाने केले आहे.  या महोत्सवाच्या निमित्ताने सहकारनगरचा आसमंत भक्तिमय होऊन जातो. हा आदिशक्तीचा उत्सव मानला जातो, त्यामुळे ‘ती’च्या सहभागाने महोत्सवात जणू स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. जोगवा, अष्टमीला घागरी फुंकणे यांसारख्या धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची महती घराघरांत पोहोचते, सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीदेखील पुणेकरांना मिळते. विविध क्षेत्रांतील प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत व्यक्तींना सन्मानित केले जाते. समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून उल्लेखनीय कार्य केलेल्या ऋषितुल्यांना ‘महर्षी’ व ‘लक्ष्मीमाता मानकरी’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. आपली संस्कृती, संस्कारमूल्य जपण्याचे काम जयश्री आणि आबा बागूल करीत आहेत, हे या महोत्सवाचे वेगळेपण आहे. 

हा महोत्सव पुण्याचा सांस्कृतिक उत्सव म्हणून परिचित असला, तरी सामाजिक आणि विधायक उपक्रमांची जोडही त्याला मिळालेली आहे. एका सामाजिक अंगाने संस्कृतीशी नाते जोडण्याचा आदर्श महोत्सवाने घालून दिला आहे. पुण्याचा एकमेव सामूहिक उत्सव म्हणून या महोत्सवाकडे पाहता येईल. पुणे हे कलेचे माहेरघर आहे. अनेक कलावंत या व्यासपीठावर येऊन गेलेले आहेत. 

सामाजिक, आध्यात्मिक व्यासपीठांवर कलावंतांना बोलवणारी खूप कमी व्यासपीठे आहेत, त्यांमध्ये या व्यासपीठाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. आध्यात्मिक व्यासपीठावर कलावंतांचा सन्मान होणे ही एक जमेची बाजू आहे. प्रत्येक कलाकारास या महोत्सवाने जोडून घेतले आहे, त्यामुळे प्रत्येकाला हा आपला महोत्सव असल्याची जाणीव होते. पुणे नवरात्र महोत्सवासारख्या व्यासपीठांची आज खरी गरज असून, यातून आपली संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Navratri Mahotsav 2019