Navratri festival 2019 : नगाडे संग ढोल बाजे... ढोल बाजे...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

गणेशोत्सव जवळ आला, की पुण्याच्या कानाकोपऱ्यातून ढोल-ताशांच्या सरावाचे आवाज कानी पडतात... त्यात सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या चांगलीच वाढलीये... पण, हीच तरुणाई नवरात्रोत्सव जवळ आली की गरब्यात सहभागी होण्यासाठीही क्‍लास लावत आहेत.

पुणे - गणेशोत्सव जवळ आला, की पुण्याच्या कानाकोपऱ्यातून ढोल-ताशांच्या सरावाचे आवाज कानी पडतात... त्यात सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या चांगलीच वाढलीये... पण, हीच तरुणाई नवरात्रोत्सव जवळ आली की गरब्यात सहभागी होण्यासाठीही क्‍लास लावत आहेत. त्यामुळे खास पारंपरिक दांडिया अन्‌ गरबा शिकवणाऱ्या क्‍लासेसची पुण्यात चलती सुरू झाली आहे. 

नवरात्रोत्सवापूर्वी १५ दिवस या क्‍लासेसच्या बॅचेस सुरू होतात. गरबा आणि दांडियाची क्रेझ सर्वांमध्येच असल्याने १४ ते ५० वर्षे वयोगटातील महिला, तरुण-तरुणी आणि पुरुषही गरब्याच्या क्‍लासला येतात. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा बेसिक कोर्स, त्यानंतर पाच दिवसांचा ॲडव्हान्स कोर्स, वीकेंड बॅच यासारखे प्रकार आहेत. खासकरून आयटीतील तरुण-तरुणींची वीकेंड बॅचला गर्दी होते, असे  ‘अभिव्यक्ती गरबा ग्रुप’च्या रेखा भानुशाली यांनी सांगितले. या कोर्सेसचे शुल्क ५०० ते २००० हजारांपर्यंत आहे.

क्‍लासमध्ये येणाऱ्या ४० ते ५० वयोगटातील महिलांची संख्या जास्त असल्याचे भानुशाली यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी मैत्रिणींना गरबा शिकविण्याच्या  हेतूने त्यांनी क्‍लासेस सुरू केले होते. मात्र, नंतर गरब्याची आवड असणाऱ्यांची संख्या इतकी वाढली, की नवरात्र जवळ आली की पुणेकर चौकशीसाठी आपोआप येतात, असेही त्यांनी सांगितले.  

पाषाणमधील अदिती फदाले म्हणाल्या, ‘‘गरब्याचा सराव केल्याने दांडिया कार्यक्रमात इतरांबरोबर परफॉर्मन्स करण्याचा आत्मविश्‍वास वाढत असल्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी सांगितले. लहानपणापासून दांडिया आणि गरब्याची आवड होती. मात्र, कॉलेजनंतर गॅप पडला. आता पुन्हा मैत्रिणींबरोबर गरबा खेळायचा आहे. त्यासाठी सराव म्हणून गरब्याच्या क्‍लासला येते.’’

आठ-दहा वर्षांपूर्वी पुण्यात गरबा आणि दांडियाचे फारसे आयोजन केले जात नव्हते. प्रस्थ नव्हते, देवीच्या मंदिरासमोर किंवा कॉलनीमध्ये बॉलिवूड गाण्यांवर दांडिया खेळला जात होतो. मात्र, काही वर्षांत गरबा नाईटचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे सर्वच वयोगटांत त्याची क्रेझ वाढली आहे.

जर्मन युवकांनाही ‘क्रेझ’
गणेशोत्सवाप्रमाणेच गरब्याची क्रेझ परदेशी नागरिकांमध्येही दिसून येते. पुण्यात एक वर्षासाठी कामानिमित्ताने आलेल्या फ्रिडोलिन या जर्मनीच्या तरुणालाही गरब्याची आवड निर्माण झाली आणि तो सध्या ‘अभिव्यक्ती’ ग्रुपमध्ये गरबा शिकत आहे. पुण्यात होणाऱ्या गरबा नाईटमध्ये सहभागी होणार असल्याचे त्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth steps towards class to learn Garba at Navratri festival

Tags
टॉपिकस
Topic Tags: