मूर्तीकारांच्या दक्षतेमुळे कोकणात वेळेआधीच बाप्पा भक्तांच्या घरी दाखल !

मकरंद पटवर्धन
Tuesday, 18 August 2020

मूर्तीकारांनी प्रत्येक भाविकाला दिली वेळ 

रत्नागिरी : गणेश चित्रशाळांमधून लाडक्या गणपती बाप्पाला नेण्याकरिता भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आठ दिवसांपासून मूर्ती नेण्यास प्रारंभ झाला. याकरिता मूर्तीकारांनी प्रत्येक भाविकाला वेळ दिली असून भाविक येऊन मूर्ती घरोघरी नेऊ लागले आहेत. सॅनिटायझर, मास्क व सामाजिक अंतर राखून मूर्ती दिल्या जात आहेत.

कोरोना महामारीचा फटका जसा विविध क्षेत्रांना बसला तसा गणेश चित्रशाळांनाही बसला. मार्चनंतर लॉकडाऊन सुरू झाला आणि गणपतीची माती आणण्याकरिता मूर्तीकारांना कसरत करावी लागली. शिवाय मातीचे दरही वाढले. परंतु त्यावर मात करत साधारण मे महिन्यातच अनेकांनी मूर्ती साकारण्यास सुरवात केली. त्या वेळी मूर्तीची उंची किती असावी याचे निर्देश शासनाकडून मिळावेत, अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्तीकारांनी केली होती. परंतु हे निर्देश गेल्या महिन्यात जाहीर झाले. घरगुती मूर्ती 2 फुटांची व सार्वजनिक मंडळाची 4 फुटांची असावी असे आदेश जारी झाले. त्यामुळे अनेक मूर्तीकारांना पुन्हा मूर्ती बनवण्याची वेळ आली.

हेही वाचा- आले गणराय : संगमेश्वरातील पहिला मानाचा गणपती गुरुवारी येणार या पेशवेकालीन परंपरा  असणाऱ्या वाड्यात -

दरवर्षी चित्रशाळेत लगबग असते. मूर्ती बनवताना पाहणार्‍यांचीही गर्दी होते, पण यंदा सर्वच चित्रशाळांनी गर्दी करू नये, मूर्ती पाहण्यासाठी येऊ नये, असे फलक लावले. वेळेआधीच गणपती मूर्ती द्यायच्या असल्याने अखेरचा हात मारण्याची मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. सुमारे पन्नास टक्के मूर्ती भाविकांच्या घरी दाखल झाल्या असून पुढील तीन दिवसांत उर्वरित मूर्ती दाखल होतील.

हेही वाचा- ....अन्यथा पुन्हा 7 दिवसाचा लॉकडाऊन ; जिल्हाधिकार्‍यांचा इशारा -

नियम पाळून भजनसेवा करण्यासाठी निवेदन

सार्वजनिक गणेशोत्सवात कोरोना महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी भजन, किर्तन, आरती असे कार्यक्रम बंद केले आहेत. काही कलाकार भजनसेवेतून उदरनिर्वाह चालवतात. परंतु गेले पाच-सहा महिने कोरोनामुळे ठप्प झाल्याने कुटुंबाचा आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे नियमांचे पालन करुन घरगुती गणपतीत भजनसेवेची संधी द्यावी, असे निवेदन आभार सांस्कृतिक संस्थेतर्फे सचिव वासुदेव वाघे, भजनीबुवा संजय सुर्वे, नीलेश मेस्त्री व संजय खडपे यांनी उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी यांच्याकडे निवेदन दिले.

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: avoid crowds in the gallery Ahead of time ganesha festival in kokan