Solapur
सोलापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर आहे. सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. सोलापूर या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन, शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.