ऑस्ट्रेलियातही रंगला गणेशोत्सव 

शलाका एकबोटे
Sunday, 3 September 2017

'प्रथम तुला वंदितो, कृपाळा, गजानना, गणराया...' हे शब्द सकाळी रेडिओवर ऐकून दिवसाची सुरवात करून बालपण सरलेले आम्ही ! आता परदेशात येऊन काही वर्षे झाली तरी मराठीपण विसरत नाही. आम्ही इथेही दाराला तोरण लावतो आणि गणेशोत्सव साजरा करतो. तसाच याही वर्षी उत्सव साजरा केला. 
 

आम्ही सगळेजण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट मेलबर्नमधले मराठी. म्हणजे पु. ल. आज असते, तर ते आम्हाला 'ऑस्ट्रेलियन महाराष्ट्रीयन मेलबर्नकर' असे काहीतरी म्हणाले असते. कारण तोच मराठी बाणा, तीच निस्सीम इच्छाशक्ती आणि आपल्या लाडक्‍या गणरायावरचे प्रचंड प्रेम. त्यातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा ध्यास. दूर देशी येऊनही मराठी लोकांना एकत्र आणत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली. ऑगस्ट .... ला वेस्ट मेलबर्न मराठी या ग्रुपने परत एकदा मेलबर्नचा पश्‍चिम भाग दणाणून सोडला. आपले रीतिरिवाज, आपली परंपरा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गणपती बाप्पा वरची भक्ती आख्या जगाला दाखवून दिली. 

इथे ऑफिसमधले मोठे-मोठे पदाधिकारी खुर्च्या उचलायला येतात. इथे दुकानात अष्टगंध सुद्धा मिळेल की नाही अशी शंका असते, पण सगळी आव्हानं स्वीकारत वेस्ट मेलबर्न मराठी ग्रुपचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले; काही महिने आधीपासूनच ! 

जनगर्जना या ढोल पथकाने कार्यक्रमाची सुरवात केली. ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आणि उत्साह नसानसांत संचारले. गणपती बाप्पाच्या सुरेख मूर्तीने डोळ्यांचे पारणे फिटले. 'गणपती बाप्पा मोरया...!!' च्या गर्जनांनी आसमंत उजळून निघाला. चार महिने कष्ट करून कार्यकर्त्यांनी काय केला नाही ते विचारा? ढोल, देखावा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरती, नैवेद्य आणि महाराष्ट्रीयन जेवणही करण्यात आले. 

यंदाच्या गणेशोत्सवाला 'हॉब्सन्स बे'चे उपमहापौर आणि प्रशासन अधिकाऱ्यांनीही सहकुटुंब हजेरी लावली आणि आमचे बाप्पावरचे प्रेम पाहून तेही भारावून गेले. हत्तीसारखा दिसणारा आपला बाप्पा आमच्यासाठी काय आहे; हे आमच्या ग्रुपने ऑस्ट्रेलियन लोकांना दाखवून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Australia Ganesh Utsav