esakal | चीन : एक अपूर्व अनुभव

बोलून बातमी शोधा

China wall
चीन : एक अपूर्व अनुभव
sakal_logo
By
आरती अरविंद लिमये

चीन म्हटलं, की आज आपल्या डोळ्यापुढं येतं चायना सिल्क, चायनीज फूड, बोन चायना क्रोकरी या आणि अशा अनेक गोष्टी. 2008 चे बीजिंग ऑलिंपिक टीव्हीवर पाहिले आणि चीनची तांत्रिक प्रगती, शिस्त पदोपदी मानला स्पर्शून गेली. यातूनच चीनला भेट देण्याची इच्छा बळावली. 13 ते 28 एप्रिल 2014 या काळात चीनचा अविस्मरणीय प्रवास घडला.

या प्रवासात आम्ही बीजिंग, शिया, गुलियन, शांघाय, शेंझेन, मकाऊ व हॉंगकॉंग ही पर्यटनस्थळे पाहिली. भारताच्या जवळजवळ दुप्पट आकाराचा हा देश आहे. पण विमान प्रवासामुळे हजारो कि.मी.चे अंतर काही तासांत होत असल्याने हे शक्‍य झाले. बीजिंग ते शिया बुलेट ट्रेनने प्रवास केला, तर शेंझेन ते मकाऊ व मकाऊ ते हॉंगकॉंग फेरीबोटीने. 

बीजिंगमध्ये पोचल्यावर पहिले आकर्षण होते ते चीनच्या भिंतीचे. ही भिंत जगातील 7 आश्‍चर्यांपैकी एक आहे. इ.स. पूर्व 5 व्या शतकात सुरू झालेल्या चीनच्या भिंतीचे बांधकाम कित्येक शतके चालले. ही भिंत ही त्या काळाची गरज होती. मोठमोठ्या टोळ्या येऊन लुटालूट करत होत्या. म्हणून प्रत्येक राजाने आपापल्या गावाबाहेर भिंत बांधली. ही भिंत तुटक तुटक जेथे पाहिजे तेथे बांधलेली आहे. आज संरक्षणाच्या दृष्टीने तिचा फारसा उपयोग होत नसला तरी तिचे अस्तित्व एका महान संस्कृतीच्या अफाट आकांक्षेचे, चिकाटीचे व ताकदीचे निदर्शक आहे. 

बीजिंगमधील 'फॉरबिडन सिटी' या 600 वर्षांपूर्वी बांधलेल्या राजवाड्यात अनेक इमारती आहेत. राजेशाहीच्या काळात येथे सामान्य लोकांना येण्यास मनाई होती, म्हणून आता तिला 'फॉरबिडन सिटी' असे म्हटले जाते. सर्व बांधकाम लाकडी आहे. या वास्तूत खिळे, सळ्या, सिमेंट न वापरता केवळ लाकडाच्या कुशल सांध्यांनी ती इमारत तोलून धरली आहे. नैसर्गिक रंग व पॅगोडा प्रकारात असलेल्या या इमारतींमध्ये वस्तुसंग्रहालय, बगीचा, राणीवसा इ. बाबी आहेत. 

बीजिंगमधील तियानानमेन चौक हा जगातील एक अजस्त्र चौक आहे. प्रतिज्ञा स्थितीत उभे राहता येईल अशा पद्धतीने येथे समान आकाराच्या आयताकृती 10 लाख फरशा बसवल्या आहेत. येथेच माओ त्से तुंगचे स्मारक व त्याची प्रचंड मोठी प्रतिमा दिसते. 
2008 च्या बीजिंग ऑलिंपिक ग्राऊंडला भेट देण्यास आम्ही सारेच उत्सुक होतो. तेथील प्रचंड आवारात ऑलिंपिक ग्राऊंडस्‌, स्वीमिंगसाठीची बबल बिल्डिंग, निरनिराळ्या खेळांतील आदर्श पोझेस दाखवणाऱ्या उत्कृष्ट कलाकृती इ. पाहिले. हा सर्वच परिसर कलात्मक व भव्य वाटला. 

याशिवाय समर पॅलेस, चिनी आर्ट म्युझियम, टेंपल ऑफ हेवन इ. प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. 

'शिया'मधील टेराकोटा वॉरियर्स हे पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. एका शेतकऱ्याला शेत नांगरत असता सबंधच्या सबंध पुतळे मिळाले. योद्धे, घोडे, रथ मिळून 7000 मूर्ती मिळाल्या. अजूनही उत्खनन सुरूच आहे. मूर्तीचे शिरस्त्राण व हत्यारे यावरून शिपाई, सरदार, सेनापती धनुर्धर इ. गोष्टी समजतात. 

'गुलियन' हे गाव 'ली' नदीच्या काठावर आहे. रमणीय सृष्टीसौंदर्य असणारे हे गाव गूढ व आकर्षक 'रीड फ्लूट केव्ह'साठी प्रसिद्ध आहे. 

'मकाऊ'मधील 'व्हेमेशियन' कॅसिनोतील आभाळ कृत्रिम आहे, हे सांगितल्यावरच समजले. हॉंगकॉंगमधील 'ओशन पार्क'मध्ये 'पांडा' हा चीनचा राष्ट्रीय प्राणी पाहावयास मिळाला. ओशन पार्क व डिस्ने वर्ल्ड येथील चित्तथरारक गेम्स व फायरवर्क शो अप्रतिम आहे. 

चीनची नृत्यकला व नृत्यकलेतून त्यांचे पारंपरिक जीवन ऍक्रोबॅटिक शो, टॅंग डिमास्टी शो, इम्प्रेशन शो व 'डान्स वुइथ ड्रॅगन शो' या विविध प्रकारांत दिसले. यातील 'इम्प्रेशन' थिएटरमध्ये तर 11 लेव्हल्सचे स्टेज आहे. तांत्रिक प्रगती अमेरिकेच्या बरोबरीने आहे, पण नृत्यकला चीनची संस्कृती दर्शवणारी आहे. 

येथे मनुष्यबळाचा पुरेपूर वापर केलेला दिसतो. टॉयलेट ब्लॉक्‍स, रेल्वे, हॉटेल्स, सार्वजनिक स्थळे, रस्ते व इ. ठिकाणी केलेल्या त्यांच्या नियोजनबद्ध उपयोगामुळे सर्वत्र स्वच्छता व टापटीप दिसते. तसेच रोजगाराचाही प्रश्‍न सुटतो. प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार काम करावे आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेइतके मिळावे, हे साम्यवादाचे मूलतत्त्व इथे प्रत्यक्षात उतरले आहे, असे वाटते. 

मनाला स्पर्शून जाणारी आणि हेवा वाटणारी दुसरी गोष्ट म्हणजे येथील गुळगुळीत रस्ते. शहरात किंवा खेड्यात गल्ल्यांमधून कौलारू घरांचे, जुन्या इमारतींचे दर्शन होते. पण तेथपर्यंत गेलेले रस्ते उत्तम अवस्थेत आहेत. मुख्य रस्ते 10-10 पदरी आहेत. शांघायसारख्या शहरातून तर एकावर एक अशी रस्त्यांची कमानही आढळली. दुभाजकांवर व फूटपाथला लागून वृक्ष, फुलांचे ताटवे व फुलांच्या मोठमोठ्या कुंड्याही आढळल्या. या सजावटीतील विविधता व सुबकता उल्लेखनीय आहे. कुंड्या चोरीला जात नाहीत. त्याचप्रमाणे फुलांनाही कुणी हात लावत नाही. रस्ते देखभालीसाठी छोट्या-छोट्या गाड्याही दिसतात. या सर्व कामांमध्ये मशिनरी व मनुष्यबळाचा मुक्तपणे वापर केलेला आहे. कोठे बांधकाम सुरू असले, दुरुस्ती करत असतील तर तेवढ्या भागाभोवती प्लास्टिक रॉडस्‌चा राऊंड असतो. रस्त्यावर साधारणतः अर्ध्या कि.मी.च्या अंतरावर डस्टबीन कम ऍश ट्रेज आहेत. लोक त्याचाच वापर करतात. संपूर्ण चीनमध्ये फिरताना कुठेही नेत्यांचे फोटो, होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर्स दिसत नाहीत. वंदनीय विभूतींचे पुतळे दिसतात, तेही तुरळकच. 

धूर व प्रदूषण टाळण्यासाठी शहरांतील रस्त्यांवर ट्रक्‍स व ट्रॅक्‍टर्सना बंदी आहे. फक्त बॅटरीवरच चालणाऱ्या टू व्हीलर्स दिसतात. शिवाय बॅटरी कार्स, ट्राम्सही आढळतात. सायकल ट्रॅक वेगळा असतो. सायकल रिक्षाही आढळतात. पण हॉर्नचा आवाज क्वचित ऐकू येतो. कार्स तर भरपूर प्रमाणात दिसतात. विशेष म्हणजे स्वतःच्या देशातील वाहने वापरण्यावरच भर दिसतो. त्यामुळे तेथील ब्यूक, कुम्हो इ. कंपनीज आपणास परिचित नाहीत. जनावरांचा वापर गाड्या ओढण्यासाठी केला जात नाही. वाहतुकीसाठी फेरी बोटीही मोठ्या प्रमाणात असतात. 

येथे कोळसे, न्यूक्‍लिअर प्लांटस्‌ आणि सौर उपकरणे यांच्या वापरामुळे वीजटंचाईचा प्रश्‍न उद्‌भवत नाही. आपल्या भूगोलातील पाठ्यपुस्तकात उल्लेख आहे, की 'यांगत्से' नदी म्हणजे चीनचे अश्रू. पण आता ही परिस्थिती नाही. नद्यांवर मोठमोठी धरणे बांधून, मुबलक वीज सर्व मार्गांनी उत्पन्न करून बऱ्यापैकी स्वस्त दरात सर्वत्र पुरवली जाते. वीज कधीही जात नाही. शांघाय, बीजिंगसारखी शहरे रात्रभर रोषणाईने झगमगतात. 

चीनमध्ये काही फॅक्‍टरीजही पाहिल्या. जेड फॅक्‍टरीज, पाचू जेड नामक एका हिरवट, तांबूस किंवा चंदेरी दगडांपासून अनेकविध वस्तू व दागिने बनवले जातात. तेथे जेडच्या खाणी आहेत. त्यापासून वस्तू बनवण्याचे कौशल्य 8000 वर्षे जुने आहे. या वस्तू खूपच सुंदर आकर्षक पण महागड्या असतात. सिल्क फॅक्‍टरीमध्ये वनस्पतीवरील किड्यांपासून ते सिल्कच्या धाग्यांपर्यंत सर्व प्रक्रिया दाखवून विक्री केंद्रात आणतात. अप्रतिम डिझाइन व प्रत असलेले रेशमी कापड हे चीनचे पारंपरिक वैभव आहे. 

मोत्याच्या फॅक्‍टरीमध्ये मोत्यांची शेती कशी केली जाते त्याचे प्रात्यक्षिक दाखवतात. फ्रेश वॉटर पर्ल व ओशन पर्ल असे मुख्य प्रकार त्यात असतात. नैसर्गिक शिंपल्यातून, तो शिंपला एका बाजूने सुरीने उघडून आतील मोती दाखवतात. 'असतील स्वाती तर पिकतील मोती' किंवा शिंपल्यातील मोती याबद्दल लहानपणापासून ऐकले होते, ते प्रत्यक्ष पाहायला मिळाले. 

बांबू फॅक्‍टरीमध्ये बांबूपासून नानाविध वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ इ. तयार करतात. त्याचा आरोग्यदायी उपयोगही सांगतात. 

टी फॅक्‍टरीची रचना बाहेरून एखाद्या मंदिरासारखी वाटली. येथे चहाचे मुख्य 15 प्रकार दाखवले. छोट्याशा कपमधून घोट-घोट चवीलाही दिले. ग्रीन टी, सेंटेड टी, प्युअर टी, जस्मिन टी, पिकविक टी इ. प्रकारांचे औषधी उपयोगही सांगितले. चहामध्ये दूध आणि साखर नाही. फक्त उकळते पाणी चहावर ओतायचे. चहाला नैसर्गिक अशी एक चव असते. चहा हा चिनी जीवनाचा व संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. 

या सर्व फॅक्‍टरीजमधील विक्री केंद्रांतून लाखो, करोडोंच्या वस्तू तयार ठेवलेल्या असतात. त्यांची साठविण्याची जबर ताकद आश्‍चर्यचकीत करते. 

चीनमध्ये मांसाहार जास्त प्रमाणात केला जातो. आकाशाकडे पाठ करणारा कुठलाही प्राणी ते खातात; पण शाकाहारी जेवणाची व्यवस्था आहे. जेवण्यासाठी तुम्ही टेबलवर बसलात, की प्रथम चहा येतो. सूप, उकडलेल्या/परतलेल्या भाज्या, नुडल्स, मोमो, सुशी, भात असे भरपूर पदार्थ समोर येतात. तसेच चॉपस्टीक्‍स कागदात गुंडाळून येतात. चिनी लोक भात व नुडल्स या चॉपस्टीकने म्हणजेच 2 काड्यांनी उचलून घेऊन खातात. पण आपल्याला ही कसरत जमत नाही. काकड्या, टोमॅटो, कांदा-पात, मटार, पालेभाज्या, बिन्स, रताळी, बटाटे, कणसे, शेंगदाणे यांचा जेवणात समावेश असतो. कमी तेल, मसाले नाहीत व स्वीट डीश म्हणून शेवटी फलाहार अशी पद्धत असते. जेवायच्या वेळी एक ग्लास पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक किंवा बीअर असा चॉइस असतो. 
एवढ्या प्रचंड देशात 90 टक्के लोकांची भाषा व लिपी एक आहे. चीनमध्ये मॅंदरीन तर हॉंगकॉंग, मकाऊमध्ये कॅंटोन बोलली जाते. शिक्षणामध्ये इंग्लिशचा द्वितीय भाषा म्हणून समावेश आहे. येथील केवळ 5 टक्के लोकांना इंग्लिश कळते. अगदी थोड्यांना बोलता येते. इंग्लिशशिवाय न अडलेल्या या लोकांच्या प्रगतीचा वेग पाहिल्यावर आश्‍चर्य वाटते आणि मातृभाषेवर भर दिला तर विकासास अडसर येत नाही. या उक्तीचे महत्त्व समजते. 

येथे 85 टक्के जनता माओवादी म्हणजे निधर्मी आहे. उरलेल्या 15 टक्‍क्‍यांमध्ये बौद्धधर्मीय व 1/2 टक्के मुस्लिम आहेत. त्यामुळे येथे मंदिर व प्रार्थनास्थळे अत्यल्प आहेत. 

आपल्यासारखीच प्रचंड लोकसंख्या असूनही त्याचा बाऊ न करता सर्वांगीण विकासासाठी चीनने चार तत्त्वांचा अवलंब केला आहे. खासगी संपत्तीला नकार, उत्पादन साधनांचे समान वाटप, धर्मनिरपेक्षता व स्त्रियांचे सबलीकरण. याच तत्त्वांमुळे चीन यशाची भरारी घेत आहे.