esakal | कांगारूंच्या देशात... ढोलाच्या जोशात 
sakal

बोलून बातमी शोधा

Amaulika ringe

कांगारूंच्या देशात... ढोलाच्या जोशात 

sakal_logo
By
अमौलिका रिंगे

"जनगर्जना ढोलपथक' अखेर सज्ज झालं. ऑस्ट्रेलियात ढोलपथक तयार करताना अनेक अडचणी आल्या; पण प्रत्येकवेळी त्या अडचणींवर मात करीत मेलबोर्नच्या मुंबा महोत्सवात ढोलांच्या तालावर पावलं थिरकलीच. 
 

मेलबोर्नमध्ये मुंबा महोत्सवात वेगवेगळे खेळ, करमणूक, शर्यती आणि विविध देशांच्या खाद्य, कला व क्रीडा यांची झलक दाखवणारी मिरवणूक अशी पर्वणी असते. या वर्षीच्या महोत्सवात पहिल्यांदाच ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात महाराष्ट्राचा भगवा फडकला. ऑस्ट्रेलियन मंडळींनी अतिशय उत्साहात, थिरकत्या पावलांनी मराठमोळ्या पथकाला भरभरून प्रतिसाद तर दिलाच; पण पुढच्या वर्षी येण्याचे आमंत्रणसुद्धा दिले. 
या परक्‍या देशात आपल्या संस्कृतीची पाळेमुळे राखत असे पथक स्थापन करण्याचे स्वप्न सतीश, शिल्पा व पराग गायकवाड यांनी पाहिले. या गायकवाड कुटुंबाने मित्रमंडळींना सोबत घेऊन ते पूर्णही केले. जानेवारी 2016 मध्ये गायकवाड कुटुंबीयांनी कोणत्याही पाठबळाशिवाय, स्वखर्चाने ढोल-ताशे पथकाचा गणवेश, अगदी टिपरूसह सर्व काही पुण्यामधून आणले. हळूहळू हौशी मंडळी सहभागी होत गेली आणि बारा जणांचे "जनगर्जना ढोलपथक' तयार झाले. पहिल्या दिवशी गायकवाडांच्या घराच्या अंगणात ताशा वाजला. आता ढोलावर थापी मारणार, इतक्‍यात दारावर शेजाऱ्यांची थाप पडली. "तुमच्या घरातून फारच मोठा आवाज येतो आहे,' अशी तक्रार ऐकताच सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले. मग पूर्वपरवानगीने एका मोकळ्या बागेमध्ये दर शनिवारी सकाळी सराव करायचे ठरले. दर शनिवारी आधी गाडीत ढोल भरून सरावाच्या ठिकाणी न्यावे लागत. सतीश व पराग वगळता आम्ही सगळेच नवशिके होतो. त्यामुळे ढोल ताणून बांधण्यापासून, टिपरू कसे पकडायचे, हात कसे वाजवायचे याने श्रीगणेशा सुरू झाला. सर्वजण आपापली पूर्ण वेळ असलेली नोकरी सांभाळून आठवडाअखेरीस या नवीन अभ्यासात रमत होते; परंतु चार-पाच आठवड्यांत बागेच्या व्यवस्थापनाने "तुमचा आवाज फार मोठा आहे, स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास होतो', असे कारण देत पथकाच्या सरावाला बेसहारा केले. पुण्यात नदीकाठी कोणाचाही विचार न करता हवे तसे ढोल वाजवता येतात; पण तेथे कायम गृहीत धरलेल्या गोष्टींमध्ये इथे पदोपदी नवे अडसर येत होते. निःशुल्क सराव संपला तरी, येथील एका जिल्हा परिषदेच्या कलासराव संकुलात परत पुढच्या तालमी सुरू झाल्या. लांबचा प्रवास, हॉलचे भाडे या कशाचाही बाऊ न करता पथक आकार घेत होते. 
हळूहळू वेगवेगळ्या संस्थांकडून ढोल वाजवण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली. गेल्या वर्षभरात अक्षरधाम मंडळाची तीन किलोमीटरची रथयात्रा, 15 ऑगस्टचे संमेलन, गणपती, गरबा, दिवाळी, स्थानिक भारतीय मंडळांचे कार्यक्रम, होळी अशा विविध ठिकाणी ढोल गरजू लागला. स्वतःच्या संस्कृतीची या परकी मातीत रुजवण करताना पथकाने सामाजिक बांधिलकीचेही भान राखले आहे. कार्यक्रमासाठी होणारा खर्च सर्व सभासद वाटून घेतात. आयोजकांकडून एकही पैसा न घेता सर्व कार्यक्रम सादर केले जातात. समजा, आयोजकांकडून मानधन आलेच, तर एका रुग्णालयाला देणगी म्हणून दिले जाते. पथकामध्ये सामील होण्यासाठी कोणत्याही प्रकारची वर्गणी आकारली जात नाही. हौस, आवड आणि वेळ या तीन निकषांवर प्रवेश दिला जातो. बारा सभासदांवरून सुरू झालेल्या पथकाने आता चाळिशी गाठली आहे. वय वर्षे एकावर पाच ते पाचावर एक अशा वयोगटातील सभासदांचे एक कुटुंब तयार झाले आहे. 
मराठी, भारतीय समाजासाठी ढोल हा ओळखीचा प्रकार आहे; परंतु इन्व्हरलॉक विदेशी जॅझ महोत्सवात आणि मुंबामध्ये ढोल सादर केल्यामुळे हळूहळू हे नव्याने माहित झालेले वाद्य इथल्या स्थानिक लोकांना भुरळ घालत आहे. देश, भाषा, प्रांत अशा कृत्रिम सीमा ओलांडत ढोल-ताशांचा नाद ऑस्ट्रेलियामध्ये स्वतःची ओळख तयार करीत आहे.