शोकांतिका अमेरिकेची

शोकांतिका अमेरिकेची
शोकांतिका अमेरिकेची

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड ही अमेरिकन रिपब्लिकनसाठी, अमेरिकन राज्यघटनेसाठी अन्य काहीही नसून निव्वळ एक शोकांतिका आहे; याचबरोबर अमेरिकेतील व जागतिक स्तरावरील वंशवर्चस्ववाद, हुकूमशाही, स्त्रीद्वेष्टेपणा आणि केवळ भूमिपुत्रांचा विचार करणाऱ्या कोत्या मनोवृत्तींचा हा विजय आहे. ट्रम्प यांचे धक्कादायक विजय नोंदवून देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणे हा अमेरिका व उदारमतवादी लोकशाहीच्या इतिहासामधील एक अत्यंत लाजिरवाणा क्षण आहे. आता 20 जानेवारी 2017, आपण अमेरिकेच्या पहिल्यावाहिल्या आफ्रो-अमेरिकन अध्यक्षांस - उदारमतवाद, सचोटी व शुद्ध आचरण यांचे प्रतीक असलेल्या अध्यक्षांस निरोप देणार आहोत. आणि याचवेळी, श्‍वेत वंश वर्चस्ववाद व इतर देशांचा द्वेष करणाऱ्या शक्तींना उत्तेजन दिले जाऊ नये, यासाठी पुरेसा संघर्ष न करणाऱ्या एका माणसाच्या कारकिर्दीच्या अध्यायाचेही आपण साक्षीदार ठरणार आहोत. 

तेव्हा आता कष्टप्रद दिवसांची सुरुवात होईल - प्रतिक्रियावादी सर्वोच्च न्यायालय, नवे अवसान चढलेली उजव्यांची कॉंग्रेस आणि महिला व अल्पसंख्यांक, नागरी स्वातंत्र्य व वैज्ञानिक तथ्ये यांबद्दल ज्याने बाळगलेली द्वेषभावना सतत दिसून आली आहे असा अध्यक्ष...ट्रम्प हे अमर्याद अश्‍लीलतेचे प्रतीक आहे. ज्ञानाचा गंध नसलेल्या या राष्ट्रीय नेत्यामुळे आता केवळ बाजारपेठाच कोलमडतील असे नव्हे; तर त्याने अनेकदा अपमानित केलेले दुर्बळ घटक, संकटांना बळी पडण्याची शक्‍यता जास्त असलेल्या "इतरां'च्या मनात भय निर्माण होईल. या इतरांमध्ये आफ्रिकन-अमेरिकन आहेत, हिस्पॅनिक्‍स आहेत, महिला आहेत, ज्यू आहेत, मुस्लिम आहेत. या अत्यंत भीषण घटनेकडेही आशापूर्ण दृष्टिकोनामधून पाहण्याचा एकच मार्ग आहे - तो म्हणजे आता येणारा काळ हा अमेरिकन संस्थांच्या सामर्थ्याची वा त्यांच्या दुर्बलतेची परीक्षा पाहणारा असेल, याची जाणीव ठेवणे होय. ही आपल्या गांभीर्याची व संकल्पाचीही चाचणी असेल. 

निवडणुकीच्या दिवशी, निकालांनी मनात काळजी निर्माण केली; मात्र पेनसिल्व्हानिया, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना आणि फ्लोरिडासारख्या राज्यामध्येही डेमोक्रॅट्‌ससाठी पुरेशी सकारात्मक परिस्थिती होती. जॉर्जियासारख्या राज्यांमधील हिलरी यांच्या विजयाची आशा सुमारे एका आठवड्यापूर्वीच मावळली होती. एफबीआय अध्यक्षांकडून हिलरी यांची चौकशी पुन्हा सुरु करण्यासंदर्भात कॉंग्रेसकडे पाठविण्यात आलेल्या बिनडोक व नुकसानकारक पत्रामुळे ही परिस्थिती ओढविली होती. "इ-मेल्स', 'अँथनी वेनर', आणि "पंधरा वर्षीय मुलगी' अशा चलतीत असलेल्या नुकसानकारक शब्दांचा पुन्हा उदय झाला होता. 

अखेर ट्रम्प हे "रॅडिकल' उजव्यांच्या प्रत्येक सडलेल्या नेणिवेचे विपर्यस्त व्यंगचित्र भासले. ट्रम्प यांच्या या विजयामुळे देश आर्थिक, राजकीय व सामाजिक अनिश्‍चिततेच्या अशा गर्तेत जाणार आहे की त्याची आपण अजून कल्पनाही केलेली नाही. ट्रम्प यांना निवडून देणाऱ्या अनेकवचनी मतदाराने त्यांच्या स्वकेंद्रित गर्व, द्वेष, उद्धटपणा, असत्य आणि सारासार विचार न करणाच्या वृत्तीने भरलेल्या जगाध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाही संकेतांचा ट्रम्प करत असलेल्या द्वेषाचा प्रवास आता सर्व प्रकारची राष्ट्रीय घसरण आणि सर्व प्रकारच्या समस्यांकडेच अंतिमत: होणार आहे. 

आता येत्या काही दिवसांत, या घटनेची भीषणता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अमेरिकन जनतेमधील "आवश्‍यक चांगुलपणा' वा "अंतस्थ शहाणपणा' याबद्दलच्या विचारांनी वाचक व प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जाईल. या काळात भडकलेल्या राष्ट्रवादाच्या आजाराचे गांभीर्य कमी करण्याचा ते प्रयत्न करतील. स्वत: सोन्याच्या विमानातून फिरणाऱ्या; मात्र "रक्त व भूमी'च्या लोकानुनयवादी भूमिकेचा आश्रय घेत, सत्तेसाठी दावा केलेल्या माणसाच्या राज्याभिषेकासंदर्भातील क्रूर निर्णयाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. राजकीय विश्‍लेषकांपैकी सर्वांत निर्भय असलेल्या जॉर्ज ऑर्वेल यांनी अत्यंत सार्थपणे म्हटल्यानुसार मानव उपजत जितका दयाळू असतो; तितकेच जनमत हे उपजत शहाणपणाचे असते! लोक सामूहिकरित्या वा वैयक्तिकरित्या मूर्खपणाचे, सारासार विचारास सोडचिट्ठी देणारे वा स्वत:चाच नाश ओढविणारे वर्तन करु शकतात. काहीवेळा त्यांना केवळ एका धूर्त नेत्याची, असंतोषाची लाट "वाचू' शकणाऱ्या व त्यावर स्वार होऊन लोकप्रिय विजयाकडे नेणाऱ्या एका राजकीय नेत्याची आवश्‍यकता असते. "आपण उपभोगत असलेल्या मर्यादित स्वातंत्र्याची व्याप्ती ही जनमतावर आधारित असते, हा खरा मुद्दा आहे,'' असे ऑर्वेल यांनी त्यांच्या "फ्रीडम ऑफ दी पार्क'' या निबंधात म्हटले आहे. "कायदा हा संरक्षण देऊ शकत नाही. सरकार कायदे बनविते; मात्र त्यांची अंमलबजावणी होते की नाही, पोलिस कसे वर्तन करतात अशा गोष्टी या देशाच्या सरासरी मन:स्थितीवर (टेम्पर) अवलंबून असतात. जर अनेक जण अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असतील; तर कायद्याने बंदी असतानाही अभिव्यक्तीस्वातंत्र्य असेल. जनमत ठाम नसेल; तर अल्पसंख्यांकांच्या रक्षणाकरता कायदे असूनही अडचणीच्या ठरणाऱ्या अल्पसंख्यांकांचे शिरकाण केले जाईल. 

ट्रम्प यांनी त्यांची प्रचारमोहिम लक्षावधी मतदारांमधील अस्वस्थता व वंचिततेची भावना हेरुन राबविली. या मतदारांमध्ये बहुसंख्य श्‍वेतवर्णीय होते. यांमधील बहुसंख्य जणांना (सर्वांना नव्हे; पण बहुसंख्य जणांना) प्रभावी परफॉर्मर व कधीकाळी राजकारणात गोपनीय पद्धतीने कार्यरत असलेला, न्यूयॉर्कमधील 80, 90 च्या दशकांतील विनोदवर्तुळात स्थान मिळवित; स्वत:स पुढेपुढे रेटणारा हा विदुषक मतदारांमधील बहुसंख्य जणांमधील असंतोष, संताप, त्यांच्या हिताविरोधी कारस्थान करणाऱ्या "नव्या जगा'संदर्भातील त्यांची धारणा यांना केवळ मान्यता देण्यापलीकडे जाऊन काम करु इच्छिणारा वाटला. ज्याप्रमाणे बोरिस जॉन्सन व अशा इतर अनेकांचे "सिनिसिजम' ब्रेक्‍झिटसाठी मतदान करणाऱ्यांना रोखू शकले नाही; त्याचप्रमाणे ट्रम्प हे फारशी प्रतिष्ठा नसलेले कोट्याधीश आहेत, ही बाबही त्यांच्या मतदारांना त्यांच्या विशिष्ट धारणेपासून परावृत्त करु शकली नाही. खरे पाहता जागतिक महामंदीमधून अमेरिकेचे राष्ट्र विविध मार्गे व विषमरित्या; मात्र प्रभावीरित्या सावरले; बेरोजगारीचा दर 4.9 टक्‍क्‍यांनी खाली आला - या गोष्टीमुळे मतदारांस दिलासा मिळाला असता. परंतु (याउलट) त्यांनी वस्तुस्थितीकडे प्रचंड दुर्लक्ष केले. याशिवाय, आफ्रिकन-अमेरिकन अध्यक्षाची झालेली निवड, विवाहांसंदर्भात येत असलेली समानता आणि अशा अन्य घटकांमुळे "सांस्कृतिक युद्ध' जवळ येत असल्याची धारणा मतदारांची झाली. मेक्‍सिकन स्थलांतरितांना "बलात्कारी' म्हणण्यापासून ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली; तर मुस्लिमांविरोधातील जाहिरातीने त्यांनी प्रचाराचा शेवट केला. त्यांच्या वर्तनाने महिलांची शरीरयष्टी व महिलांच्या प्रतिष्ठेची अक्षरश: कुचेष्टा उडविली गेली. यासंदर्भात त्यांच्यावर टीका केली असता त्यांनी निव्वळ "पोलिटिकल करेक्‍टनेस''च्या भूमिकेचा अंगीकार केला. नक्कीच अशा निर्दय व मागास वृत्तीच्या नेत्यास काही मतदारांचा पाठिंबा मिळू शकेल. मात्र ते जिंकले कसे? नक्कीच गलिच्छ कारस्थानांवर चालणारी "ब्रेटबार्ट न्यूज' ही वृत्तवाहिनी लक्षावधींना माहिती देणारा स्त्रोत व मुख्य प्रवाहातील मत बन शुकत नव्हते. परंतु, सुरुवातीला आपल्या प्रचारमोहिमेकडे केवळ ब्रॅंडिंगचाच एक भाग म्हणून पाहिल्याची शक्‍यता असलेल्या ट्रम्प यांना या अशा "कृष्ण गोष्टी' अधिकाधिक विपर्यस्त स्वरुपात मांडण्याची शक्‍यता जाणवली. जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्यापासून मिट रॉमनी यांपर्यंत "पारंपारिक' रिपब्लिकन्सनी त्यांच्यापासून अंतर राखण्याची केलेली घोषणा ही त्यांना असलेला भावनिक पाठिंबा अधिक वाढण्याच्या दृष्टीने पथ्यावरच पडली. 

या घटनेचे गांभीर्य आणखी कमी करण्याच्या प्रयत्नांत विश्‍लेषक एफबीआयचे गोंधळ निर्माण करणारे व विध्वंसक वर्तन, रशियन गुप्तचर खात्याचा हस्तक्षेप, ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेच्या प्रारंभीच्या टप्प्यावर केबल टीव्हीकडून त्यांना देण्यात आलेल्या तासंतासांचे कव्हरेज (फ्री पास) या गोष्टींनाही कदाचित आवश्‍यक महत्त्व देणार नाहीत. अमेरिकन संस्थांच्या स्थिरतेवर विश्‍वास ठेवण्याचे आवाहन आम्हाला करण्यात येईल; सत्तेत आल्यानंतर अगदी रॅडिकल असलेल्या राजकीय नेत्यांचीही हीच वृत्ती दिसून आली आहे. जसे काही "डेमोक्रॅटिक' मतदारांना संघर्ष, गरिबी आणि दुदैव म्हणजे काय हे माहितीच नाही, असे भासवून आता उदारमतवाद्यांवर स्वकेंद्रित, अहंकारी, क्‍लेष व समस्येशी संबंध नसलेले अशी कठोर टीका करण्यात येईल. या निरर्थक प्रचारावर विश्‍वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही. याशिवाय ट्रम्प व त्यांचा ख्रिस ख्रिस्ती, रुडॉल्फ, माईक पेन्स आणि पॉल रायन हा वृंद चांगुलपणाच्या पारंपारिक रिपब्लिकन मर्यादेमध्ये राहून राज्य करण्याच्या मनस्थितीत आहे, यावरही विश्‍वास ठेवण्यातही काहीही अर्थ नाही. ट्रम्प यांची निवड चांगुलपणा, न्याय्य, राजकीय मवाळपणा, तडजोड, कायद्याचे राज्य या व्यासपीठावर झालेली नाहीच; ती झाली आहे ती असंतोषाच्या व्यासपीठावर. "फॅसिजम' हे आपले भविष्य नाही - असू शकत नाही, अशा भविष्यास आपण परवानगी देऊच शकत नाही - मात्र फॅसिजमचा प्रारंभ होण्याचा हा मार्ग आहे, यात काहीही शंका नाही 

हिलरी या दोष असलेल्या उमेदवार होत्या; मात्र त्या निग्रही, बुद्धिमान आणि सक्षम नेत्या होत्या. लक्षावधी मतदारांमध्ये त्यांच्याविषयीची असलेली अविश्‍वासु व "एनटायटल्ड' अशी प्रतिमा त्या नष्ट करु शकल्या नाहीत. क्‍लिंटन यांच्याविरोधात वर्षानुवर्षे हाकाटी होत असलेल्या अनेक "बोगस स्कॅंडल्स'च्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यामध्ये निर्माण झालेली संशयी वृत्ती हे या प्रतिमेमागील एक कारण होते. मात्र हिलरी यांनी सचोटीने केलेल्या सार्वजनिक सेवेची कारकीर्द कितीही मोठी व कटिबद्ध असली तरीही त्यांच्यावर ग्राहक, गुंतवणूकदार आणि कंत्राटदारांना फसविणाऱ्या, ज्याच्या असंख्य वाक्‍यांमधून व वर्तनामधून निव्वळ लोभ, खोटेपणा व दुराग्रहच दिसून आलेला आहे, अशा ट्रम्प यांच्यापेक्षा कमीच विश्‍वास ठेवला गेला. ट्रम्प यांच्यासारखा अहंकार हा खरोखरच क्वचितच दिसून येतो. 

आठ वर्षांसाठी अमेरिकेस बराक ओबामा हे अध्यक्ष म्हणून लाभले. या काळात सायबर विश्‍वात आढळलेली वंशवर्चस्ववाद व असंतोषाची भावना कमी करण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला. मात्र माहितीचे हे वर्तुळ उध्वस्त झाले होते. फेसबुकवर पारंपारिक, तथ्याधारित माध्यमांमधील लेख व कारस्थानी अतिउजव्या माध्यमांमधील लेख यांमधील फरक आता कळेनासा झाला आहे. बोलु न शकणाऱ्यांचे प्रवक्ते आता प्रचंड जनसमुहापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. अशा ज्वालाग्राही वातावरणात प्रचंड स्त्री द्वेष्टया भाषेचा वापर करुन हिलरी यांना उध्वस्त करण्यात आले. अति उजवी माध्यमे ही सतत असत्य, प्रोपागंडा आणि कारस्थानांचा स्त्रोत बनली. ट्रम्प यांनी हा स्त्रोत त्यांच्या प्रचारमोहिमेचा प्राणवायु बनविला. ब्रेटबार्टमधील कळीचे व्यक्तिमत्त्व असलेले स्टीव्ह बॅनॉन हे ट्रम्प यांचे मोहिम व्यवस्थापक व प्रोपागॅंडिस्ट बनले. 

आता हे सर्व निराशाजनक चित्र आहे. सर्व निकाल घोषित होत असताना माझ्या एका मित्राने मला अत्यंत दु:खी होऊन दूरध्वनी केला, त्याच्या स्वरात भविष्यातील संघर्षाबद्दल, युद्धाबद्दल भीती होती. तेव्हा हा देश का सोडू नये? परंतु हताशा हे काही उत्तर नाही. हुकूमशाहीचा सामना करण्यासाठी अमेरिकन मूल्यांच्या नावाखाली सचोटीने व प्रखरतेने संघर्ष करणे इतकेच काय ते वाचले आहे. इतकेच काय ते करणे हाती आहे.

( द न्यूयॉर्कर हे अमेरिकेतील प्रख्यात साप्ताहिक आहे. 1925 मध्ये स्थापन झालेले न्यू यॉर्कर बातमीपत्रे, व्यंगचित्रे आणि परखड टीकेसाठी प्रसिद्ध आहे. सोबतचा मुळ लेख वाचाः http://www.newyorker.com/news/news-desk/an-american-tragedy-donald-trump)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com