काळ आला होता पण वेळ आली नव्हती : एक सत्य कथा

A-plane
A-plane

२९/११/२०१८ !!! दिवस तास नॉर्मल सुरु झाला होता. पण ट्रीप साठी निघालो तसं काही का काही घडत होतं, मुलगा आजारी तो सावरला मग मुलगी आजारी त्यामुळं घरी कधी जातोय ही हूर हूर होती. गुरुवार २९/११/२०१८ ला सकाळच्या ११:०० पर्यंतच्या मिटिंग आटोपून अजून एक दिवस थांबायची गरज नाही असा प्लॅन करून परतीचा फ्लाईट मिळतंय का ते चेक केल. आधीच्या प्लॅन नुसार शुक्रवारी ३०/११/२०१८ निघणार होतो म्हणून ३०-४५ मिनिट कस्टमर केअर शी बोलून कसंबसं १:३० च्या फ्लाईट च्या  वेटिंग लिस्टवर जागा मिळवली. घड्याळात बघितलं ११:४५ झालेले. १० मिनटात सामान आटोपून हॉटेल मधून निघालो, टॅक्सी साठी धावपळ मग ट्राफिक त्यात भर जोरदार पाउस मग  चेक इन साठी मोठी रांग सगळं करत घामघूम होऊन सुस्कारे टाकत १:०० वाजेपर्यंत एअरपोर्ट गेटवर पोहोचलो. आणि एव्हढं सगळं करून बघतो तर काय खराब वातावरणामूळे फ्लाईट २:४० ला निघणार. हुशः डोक्यला हात लावला पण धावपळीत सकाळपासून काही खाल्लं नव्हत थोडा वेळ आहे म्हणून काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून सहज सवयीप्रमाणे हात मागच्या खिशात क्रेडीट कार्ड , कॅश बघायला गेला तर लक्षात  आलं कि सगळे कार्ड कॅश हॉटेल रूम मध्ये टेबलवर विसरलोय. आतापर्यंतच्या केलेल्या अनेक प्रवासांमध्ये पहिल्यांदा मी काही तरी हॉटेल रुम मध्ये विसरलो होतो. फ्लाईट २:४० ला निघणार म्हणून सुदैवाने अजून दीड तास वेळ होता मग काय काही पर्याय नव्हता, पहिला घाम सुकायच्या आत परत पळत निघालो पुन्हा टॅक्सी साठी धावपळ मग ट्राफिक त्यात भर टाकणारा जोरदार पाउस करत हॉटेल रूम वर पोहोचलो नशीब कार्ड, कॅश तिथेच होती, पुन्हा धावपळ करत ऐअरपोर्ट वर पोहोचलो २:१० झालेले. गेटवर जाऊन बघतो तर कळाल वातावरण जास्त खराब होईल म्हणून २:४० ची फ्लाईट २:०० लाच निघून गेली. 

जे होतं ते चांगल्यासाठी असा नेहमी मानणारा मी आता मात्र आज काहीतरी चुकतंय का असा विचार करायला लागलो होतो, पण प्रयत्न सोडू शकत नव्हतो पुन्हा ३०-४५ मिनिट कस्टमर केअर शी बोलून पुन्हा कसंबसं ३:०० च्या फ्लाईटच्या वेटिंग लिस्टवर जागा मिळवली, जरा निवांत बसणार तर ५ मिनिटांनी सूचना ऐकू आली ३:०० ची फ्लाईट ३:४० ला निघणार, फ्लाईट गेटला लागली प्रवासी उतरले नवीन चढले मला जागा मिळेल हि आशा मनात ठेऊन सूचना लक्ष देऊन ऐकत होतो. फ्लाईट ला निघायला १० मिनिटे राहिली तरी माझं नाव पुकारेना असा विचार करत होतो इतक्यात मला बोलावलं, एकदम खुश होऊन देवाचे मनात आभार मानून चला शेवटी घरी जाऊ असा म्हणत पुढे गेलो तर मला सांगितलं कि "फ्लाईट एकदम फुल आहे त्यामुळे मला ५:०० च्या वेटिंग लिस्टवर ट्रान्सफर केलय", मनात खूप चीड चीड होऊनही आणि चेहऱ्यावर स्मित हसून धन्यवाद म्हणून जाऊन बसलो. 

दुपारचे ४ वाजलेले सकाळपासून फक्त पाणी पीत होतो पण आता या सगळ्यात भूकच गायब झाली होती पण आज काहीतरी नक्की चुकतंय हे पटायला लागलं होतं आणि आज आपण घरी जातोय का नाही हि काळजी वाटत होती. बाहेर जोरदार पाऊस काळवंडलेल आभाळ सुसाट वर हे सगळा पाहून वातावरण भयाण वाटायला लागलं होतं. आता ५ च्या फ्लाईट मध्ये तरी जागा मिळेल अशी आशा घेऊन बसलो आणि समोरच्या स्क्रीनवर ५ ची फ्लाईट ६ ला निघणार दिसलं. आता मात्र सहनशक्ती संपायला लागली होती मग पुन्हा ३०-४५ मिनिट कस्टमर केअर शी बोलून आणि सगळी आन बाण शान वापरून त्या फ्लाईट मध्ये वेटिंग वरून सीट कन्फर्म केला, आज नक्की घरी जातोय या विचाराने हायसं वाटलं. या सगळ्यात बायकोला हे सगळं सांगून ताण वाढवण्यापेक्षा "मी येतोय थोड्यावेळात" असा मेसेज पाठवत होतो. 

शेवटी फ्लाईट आली बोर्डिंग सुरु झालं सगळा निट होतंय असं वाटत होतय असा वाटतंय तोच बोर्डिंग करताना फ्लाईट स्टाफ ला माझं नाव प्रवास्यांच्या  यादी मध्ये सापडेना म्हणून मला बाजूला थांबायला सांगितलं. त्यांनी फोन करून मग लिस्ट पुन्हा चेक करून मला बोर्डिंग करायला सांगितलं, मी तिकीट स्कॅन  करून फ्लाईट मध्ये चढणार एव्हड्यात माझ्या केबिन बॅगचं एक चाक तुटलं, तशी ती बॅग मी गेली १० वर्ष प्रवासात वापरतोय ते चाक खराब झालेला होता पण ते आज नेमका का तुटावं ? आता मात्र  उगाचच विचार यायला लागले पण तरी फोनमधला आपल्या लाडक्या बाप्पांचा फोटो पहिला आणि सगळं नीट होईल असा म्हणून विमानात सीटवर जाऊन बसलो. आज कधी नाही ते खूप दिवसांनी एक सुंदर तरुणी बाजूला बसली होती. ते पाहून पुन्हा हे आजच का ? असा वाटलं पण डोकं आधीच भणभनलेलं म्हणून सामान ठेऊन पुस्तक वाचायला घेतलं. डोक्यात काही घुसेना मग उगाच आपला बाहेर बघत होतो. 

बाहेर जोरदार पाऊस चालूच होता विजा वारा काळे ढग असं जे जे विमान उडण्यासाठी नको असतं ते अगदी सगळं सुरु होतं. पाऊस थोडा मंदावला मग विमान हळू हळू रनवे कडे निघालं. आमच्या आधी १-२ विमानं  उडाली मग आमचा टेकऑफ साठी नंबर आला इंजिन फुल् स्पीड ने सुरु झाल, ब्रेक सुटणार एव्हढ्यात इंजिन पुन्हा बंद झालं. आता पर्यंतच्या  प्रवास अनुभवात ते पहिल्यांदा झालेलं, काही कळायच्या आत पायलट ची सूचना सुरु झाली कि ज्या पट्ट्यातुन विमान टेकऑफ घ्यायचय ते वातावरण सुरक्षित नाही म्हणून ३०-४५ मिनिट रनवेवर थांबून रहा. आता मात्र पुढं काय वाढून ठेवलाय काही सुचेना, मन विचलित करण्यासाठी आजू बाजूच्या प्रवाश्यांशी गप्पा मारत बसलो मग ६:०० चे ६:४५ झाले आणि शेवटी टेकऑफ साठी हिरवा कंदील मिळाला.  विमानाने रनवेवर जोरदार वेग घेतला मी सहज खिडकीतून बाहेर बघितला तर पाऊस अचानक वाढलाय असं जाणवत होतं, विमान नेहमी पेक्षा थोडा जास्त धडधडत होत, काही कळायच्या आत विमानाने हवेत झेप घेतली पण नेहमी पेक्षा तिरपी.  पंखांची धडधड अजून वाढायला लागली होती. आकाशातली उंची, वेग , पाऊस, वारा  सगळे जणू एकमेकांशी स्पर्धा करताय असं वाटत होतं. बाहेर काळेकुट्ट ढग आमची जशी मजा बघत होते. मी समोरच्या स्क्रिनमध्ये विमानाचा  वेग, उंची, दिशा बघायला लागलो आम्ही १००००-१५००० फुटमध्ये हेलकावे खात होतो. मधेच अचानक खाली जात होतो मग विमान जोर धरून वर निघत होते पुन्हा मधेच बाहेरून काहीतरी आपटावं असे विचित्र आवाज  येत होते, विमान एका बाजूला तिरप होऊन जोर लावत होत, उजवी कडून डावी कडे हेलकावे घ्यायला लागला. प्रवाशी एकमेकांच्या खांद्यावर आपटायला लागले, सामान इकडून तिकडे पडायला लागल. आता मात्र काही तरी भयानक होणार हे सगळ्यांना स्पष्ट झाला होत.. आरोळ्या किंचाळ्या सुरु झाल्या तेव्हड्यात विमानाला एक जोरदार धक्का मिळावा तसं काही तरी झालं आणि हवेतून वेगाने खाली पडाव तसं आम्ही खाली जायला लागलो आरोळ्या किंचाळ्या इतक्या वाढल्या कि काही काही सुचत नव्हतं. बास सगळं काही संपलं असं वाटलं. मृत्यू खरंच समोर आला होता की नाही माहित नाही पण तो समोर आलाय या भीती पेक्षा त्याने असं बेसावध का पकडावं अशी चीड डोक्यात येऊन डोळे बंद केले. 

आई पप्पा, बायको मुलं, भाऊ बहिणी नातेवाईक एका सेकंदात सगळं समोर आलं आणि डोकं सुन्न झाला. आज सकाळपासूनच्या सगळ्या घटना आठवल्या आणि वाटलं बहुतेक आज आपल्याला असं घाठवायचं यमाने बहुतेक ठरवलंच होतं म्हणून हे सगळं घडलं असावं ... फोनवर शेवटी एकदा बाप्पांचा फोटो पहावा म्हणून फोन उघडला आणि तेव्हड्यात बायकोचा एक मेसेज आलेला कि "मी आज खिचडीभात करतेय किती वेळ लागेल घरी यायला" तो वाचून वाटलेलं तिला रिप्लाय द्यावा कि "अगं नको माझी वाट बघूस, बहुतेक काळ समोर आलाय आणि आता तो वेळ देईल कि नाही माहित नाही ....."

पण पुढच्या ३० सेकंदात काही तरी चमत्कार व्हावा तसं  विमान स्थिर व्हायला लागलं, पुन्हा इंजिनाने जोर धरला आणि विमान भरधाव वेगाने ढगातुन  वर सरकायला लागल आणि २०००० मग ३०००० फूट जाऊन शांत झालं आणि सगळं काही नीट होतंय असा वाटायला लागलं आणि ५-१० मिनटात विमान स्थिर झाल आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला, गळ्यात आलेला श्वास मोकळा सोडला आणि सुन्न शांतता झाली. सहज घड्याळ बघितलं तर ६.५५ झालेले म्हणजे टेकऑफ घेऊन फक्त १० मिनिट झालेले पण प्रत्येक सेकंद इतका भयाण होता कि जणू तास दोन तास झाले असं वाटत होत. असो पुढे २ तास प्रवास झाला विमान लँडिंग झालं आणि बाप्पाना पुन्हा एकदा बघितलं, नकळत हात जोडले गेले आणि हातून जोरदार टाळी वाजली अन मग काय सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि मनात कदाचित हेच म्हटलं असेल "काळ आला होता पण वेळ आली नव्हती "!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com