अनुभव सातासमुद्रापारचे... : आता क्लीन सिंगापूर मोहीम

Dhananjay-Kulkarni
Dhananjay-Kulkarni

सिंगापूर हा आग्नेय आशियातील सर्वांत छोटा देश; परंतु संपूर्ण जगातील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र. चीनमधून येणारे पर्यटक व नागरिकांची संख्या इथे मोठी असते. त्यामुळे चीनमध्ये डिसेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, त्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीलाच सिंगापूरमध्ये काही रुग्ण आढळले आणि सिंगापूर सरकारने अत्यंत तातडीने पावले उचलली. त्यांच्याकडे २००३ मध्ये ‘सार्स’ हा साथरोग हाताळणीचा मोठा अनुभव होता. माझ्या माहितीप्रमाणे जगात सर्वप्रथम विमानतळावर प्रवाशांची थर्मल इमेजिंगद्वारे तपासणी सिंगापूरमध्ये सुरू झाली व काही प्रवासावर बंधनेही घातली. सर्व कार्यालये व सार्वजनिक ठिकाणे इथे व्यक्तीला तापमान तपासूनच प्रवेश देण्याचे बंधन घातले.

सिंगापूर सरकारच्या या प्रयत्नांना चांगले यश आले. बाधितांची संख्याही नियंत्रणात आली. जे बाधित नव्याने निष्पन्न होत होते, त्यांच्या संपर्कातील नागरिकांना शोधण्यासाठी ‘ट्रेस टूगेदर’ नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले. टेक्‍नॉलॉजीसह सिंगापूर पोलिस दलाची मदत घेण्यात आली.

साधारणतः मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बाधितांची संख्या वाढली, तेव्हा काही कार्यालये बंद करून ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या गेल्या. हे सर्व करीत असताना सरकारी पातळीवर सतत जनतेला माहिती पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली.

इथवर सर्व नियोजनबरहुकूम सुरू असताना एप्रिलच्या सुरुवातीला कामगारांच्या वस्तीमध्ये (जे सर्व जण बहुदा भारतीय अथवा बांगलादेशी आहेत आणि दाट वस्तीत राहतात) संसर्ग वाढला. त्यामुळे सिंगापूर सरकारने नागरिकांच्या हालचालींवर अधिक कडक निर्बंध लादले आहेत. ज्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर व तीन मेपर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व आस्थापना, शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उभारली, ज्यात निर्बंधांचे उल्लंघन केल्यास पहिल्या प्रसंगाला ३०० डॉलर (सुमारे सोळा हजार रुपये) एवढा दंड काही हजार लोकांना करण्यात आला. दुसऱ्यांदा उल्लंघनासाठी १० हजार डॉलर (सुमारे पाच लाख रुपये) एवढ्या दंडाची तरतूद आहे.

अजूनही संसर्ग जास्त असल्याने हे निर्बंध हे जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. सध्या सार्वजनिक बस व लोकल ट्रेन सेवा सुरू असली, तरी लोकांची वर्दळ खूप तुरळक असते. सर्व ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याचे भान पाळले जात आहे. एकंदरीत, सर्व जण घराच्या बाहेर पडण्यापूर्वीच मास्क वापरतात, तसेच ‘एसजी क्लीन’ ही मोहीमही सुरू करण्यात आली आहे. भारताप्रमाणेच नागरिकांची स्वयंशिस्त व सरकारचे नियोजनपूर्वक नियोजन सिंगापूरमध्येही असल्याने ही साथ लवकरच आटोक्‍यात येईल, असा विश्वास आहे.
(शब्दांकन - दीपक रोकडे, नगर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com