अनुभव सातासमुद्रापारचे... : कोरोनाशी दोन हात करताना!

Chetan-Patki
Chetan-Patki

मी सध्या इंग्लंडमध्ये डॉक्‍टर म्हणून (Anaesthetist & Intensivist) काम करतो. मी इंग्लंडला ‘एफआरसीए’ करण्यासाठी २०१७ मध्ये आलो. सध्या कोरोनाचे रुग्ण माझ्या हॉस्पिटलमध्येही मोठ्या संख्येने भरती झाले आहेत.

साधारणत डिसेंबर महिन्यापासून औपचारिकरित्या चीनमध्ये या विषाणूची लागण चालू झाली व ११ मार्च २०२० रोजी कोरोनाची जागतिक साथ असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली. इंग्लंडमध्ये ‘एनएचएस’ म्हणजेच सरकारी आरोग्य व्यवस्था या आव्हानासाठी तयारीला लागली. इटली आणि स्पेनच्या अनुभवातून इंग्लंडने धडा घेतला आणि तयारी चालू झाली. आमच्या सर्व सुट्या रद्द केल्या. आमची ८ तासाची ड्यूटी आता १३ तास केल्या गेल्या. फक्त अत्यावश्‍यक शस्त्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्या. सर्जन आणि बाकी  फिजिशियन यांनाही आम्ही आयसीयू ट्रेनिंग देण्यास सुरूवात केली. आम्ही दन आठवड्यात संभाव्य धोक्यासाठी सज्ज झालो. मी पहिला रुग्ण पहायला धाकधुकीतच खोलीत गेलो. तेव्हा ह्या विषाणूबद्दल माहिती तशी कमीच होती. रोज नवीन मार्गदर्शकतत्त्वे येऊ लागली. यात बाकीच्या देशातील रुग्णांवरील उपचार, त्याने होणारे शरीरावरील परिणाम हे सर्व रोज वाचन करणे व सर्व ट्रेनिंग आणि अनुभव वारंवार आठवून स्वतःची काळजी घेत होतो. आता प्रत्येक ड्यूटीला ३- ४ कोरोना बाधित रुग्णांचा सामना होतोच. कोरोना बाधित रुग्णाला कोणते आणि कसे उपचार द्यायचे हे 

फिजिशियन, इमरजन्सीमधील डॉक्‍टर आणि अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ असे एकत्रितपणे ठरवितात. दर काही तासांनी तपासण्या, निरीक्षणे, आढावा, औषधांत बदल अशी प्रक्रिया कायम सुरू असते. प्रतिजैविके हा कुठल्याही विषाणूसाठी इलाज नसतो आणि त्याचा गैरवापर झाल्यास ‘अँटिबायोटिक रेझिस्टन्स’ वाढू शकतो. त्यामुळे त्यांचा वापर विचारपूर्वक करावा लागतो. आम्हाला १३ तास पीपीई किट म्हणजेच मास्क अणि बाकी गाऊन घालून रुग्णांची सुश्रुषा करावी लागते. बऱ्याच परिचारिकांना मास्कमुळे चेहऱ्यावर चट्टे उठले आहेत. इंग्लंडमध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त असली तरीही कोरोना विषाणूमुळे तरुण व्यक्तीही संक्रमित झाल्या आहेत. ज्या व्यक्तीना हृदयरोग, फुप्फुसाचे आजार, मधूमेह, कर्करोग असे आजार किंवा ६५ पेक्षा जास्त वय असते त्यांच्या प्राणाला जास्त धोका असू शकतो. इंग्लंडमध्ये ‘एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन’वर भर दिला जातो. त्यामुळे विविध औषधांच्या परिणामांच्या नोंदी करून औषधोपचार केले जात आहेत.

भारतामध्येही या काही किंवा सर्व उपायांची अंमलबजावणी झाल्याशिवाय युद्ध जिंकता येणार नाही. आपल्या देशाची लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, तुलनेने तुटपुंजी सरकारी आरोग्यव्यवस्था, अपुरा कर्मचारी वर्ग या सर्व अडचणींना लक्षात घेऊन सामना करावा लागणार आहे. या कोरोनच्या संकटाने जगातील सर्व देशांची अर्थव्यवस्था चांगलीच झोडपून निघालेली आहे. भारत सुद्धा त्याला अर्थातच अपवाद नाही. या सर्व संकटातून आपली यशस्वीरित्या सुटका होईल असा मला विश्वास आहे. पण यानंतर जगाच्या आरोग्य व्यवस्थेकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलणार हे नक्कीच! 
(शब्दांकन - अभय जोशी, पंढरपूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com