esakal | अनुभव सातासमुद्रापारचे... : विभिन्न प्रवृत्तींचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Niranjan-Rao

अमेरिकेत मार्चपासून लॉकडाउन चालू झाले आणि आम्ही घरून काम चालू केले. संपूर्ण जगभरातच परिस्थिती गंभीर होती.. अजूनही आहे. पण या काळात काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत, त्याचबरोबर अनेक उपद्रवी प्रवृत्तींचेही या निमित्ताने दर्शन घडते आहे.

अनुभव सातासमुद्रापारचे... : विभिन्न प्रवृत्तींचे दर्शन

sakal_logo
By
निरंजन राव, सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका

अमेरिकेत मार्चपासून लॉकडाउन चालू झाले आणि आम्ही घरून काम चालू केले. संपूर्ण जगभरातच परिस्थिती गंभीर होती.. अजूनही आहे. पण या काळात काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत, त्याचबरोबर अनेक उपद्रवी प्रवृत्तींचेही या निमित्ताने दर्शन घडते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक जाणवले की, लोक एकमेकांना मदत करायला तयार असतात. इथे सोशल मीडियावर अनेक वेळा मदत मिळेल का, या आशयाच्या पोस्ट दिसतात. अनेक जण वयामुळे किंवा प्रकृतीच्या कारणामुळे बाहेर पडू शकत नाहीत. मला दुकानातून कोणी पीठ आणून देईल का... अशी मागणी असते. म्हटले तर ही बाब साधी आहे. पण या हाकेला ओ देणारे अनेक लोक सापडतात.  विशेष म्हणजे या विनंत्यांना अनेक भारतीयच तत्परतेने उत्तर देताना दिसतात. कारण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी गरजूंना मदत करण्याची आपली संस्कृती विसरता येत नाही.

आमच्या कामाचे स्वरूप फारसे बदलले नाही. जे काम ऑफिसमधून करत होतो, तेच घरून. पण, वेळ मात्र बदलली. पूर्वी जी कामे दोन मिनिटांत बोलून व्हायची, त्याकरता फोन किंवा कॉन्फरन्स कॉल करायला लागतो. स्क्रीन शेअरिंग वगैरेंमुळे काम पूर्ण होत असले तरी ऑफिसचे वातावरण नाही व ती मजाही नाही... उलट, अनुभव असा आहे की कामाचा वेळ वाढलाय. 

माझा स्वतःचा अनुभव... आमच्याकडे मास्क नव्हते. नवीन नियमानुसार दुकानात जाताना मास्क असणे आवश्यक आहे. अनेक लोक घरी मास्क शिवत असल्याचे समजले म्हणून विचारले, तर चार मास्क दारात येऊन पोचले, कोणताही मोबदला न घेता... ज्या बाईंनी आणून दिले, त्यांनी सोशल डिस्टन्सिंगमुळे दारातच ठेवले व नंतर आम्हाला कळले. आम्ही इमेलच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले.

दोन टोकांच्या प्रवृत्तीची माणसे जगात सर्वत्र सापडतात. इथेही आहेत. इथे हिंडायला परवानगी असल्याने, लोक बाहेर पडू शकतात. मोठ्या हॉस्पिटलमधील शिफ्ट बदलताना पोलिस, अग्निशामक दलाचे जवान त्यांच्या वाहनांसह पोचतात व बाहेर उभे राहून टाळ्या वाजवत डॉक्टर, नर्स, तसेच अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाला सलाम करतात. अभिमानाची गोष्ट म्हणजे येथील बरीच डॉक्टर मंडळी भारतीय आहेत. इथे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उपहारगृह किंवा रेस्टॉरंट बंद आहेत. तेथील कामगारांची जाणीव ठेवून एक दिवस तरी बाहेर खा, अशी मोहीम चालू आहे. तिथे जाऊन बसणे शक्य नाही पण खाद्यपदार्थ घरी आणता येतात. मी परवा शेजारी पाटी बघितली की, भुकेले राहू नका... don''t be hungry, whatever I have we can share.  त्या व्यक्तीने काही पदार्थ बाहेर टेबलवर ठेवले होते व ज्यांना गरज आहे त्यांनी घेऊन जावे. आपण आणि आपला समाज यांची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. सरकार सर्व सांभाळू शकणार नाही, हेच यातून जाणवते.
(शब्दांकन - नयना निर्गुण)