'मराठी कट्टा जर्मनी 2019'चा सर्वोत्तम पुरस्कार अशोक देशमानेंना जाहीर

pune.jpg
pune.jpg

अशोक देशमाने हे नाव फार काही प्रकाश झोतात नसते. ही व्यक्ती पुण्याबाहेर शहराच्या झगमगाटापासुन दूर आळंदी नजीकच्या एका छोट्या गावामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व संगोपणासाठी, सरकारच्या कोणत्याही मदतीविना 'स्नेहवन' या संस्थेच्या माध्यमातून 80 मुलांचा सांभाळ करतो. 'स्नेहवन'"ही नुसती संस्था नाही तर एक कुटूंब आहे. आपल्या मराठी कट्टा जर्मनीने या थोर व्यक्तिमत्त्वाची दखल घेत 'मराठी कट्टा जर्मनी 2019' चा सर्वोत्तम पुरस्कार अशोक देशमाने यांना जाहीर केला. पुरस्काराचे स्वरूप रू.10,000 आणि स्मृतीचिन्ह असे. 

आळंदी पासून 7 किलोमीटर वडगाव घेणंदच्या एका छोट्या गावामध्ये आम्ही गेलो होतो. गावात जाणारा रस्ता एकदम कच्चा होता. एका मोकळ्या जागेमधे आजुबाजूला फारशी घरेही नव्हती, थोडी फार झाडे आणि एक इमारत 'स्नेहवन'. छोटी मुले अंगणात खेळताना दिसली...पायात चप्पल नाही, कपडे ही साधारणसे, हातामध्ये मोबाईल नाही. विशेष म्हणजे दुसर्‍याकडून कशाचीच अपेक्षा नाही. अशोक देशमाने त्यांची अर्धांगिनी, आई वडील असे सर्व जण 'स्नेहवन' मधे सर्व मुलांसोबत एकत्र राहतात. 

आळंदीला देवदर्शनासाठी जाणारे 'सो कॉल्ड भक्त' आणि परतीच्या मार्गावर 'गोखले मळा' शोधणाऱ्या लोकांची कमतरता नाही. पण 'स्नेहवन' चा पत्ता शोधून काढला तो म्हणजे मराठी कट्टा जर्मनीनेच. ज्या वयामध्ये करिअर करणे, पैसे कमवणे, बंगला घेणे किंवा फॉरेनची ट्रीप करणे अशी स्वप्ने मनात ठेवणारे तरुण कुठे आणि आयटीतील गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून वंचित मुलांच्या भवितव्यासाठी अहोरात्र झटणारा अशोक देशमाने कुठे! त्याने वयाच्या 26 व्या वर्षी 'स्नेहवन'ची सुरूवात केली. 
हाच खरा 'बाप माणूस' आहे. मुलांना जन्म देण्यापेक्षा सांभाळ करणारेच खरे आई वडील आणि मला नेमके तेच अशोक देशमाने यांच्यामध्ये दिसले. मुलांकडून पुस्तक वाचन करून घेणे, शाळेचा अभ्यास करून घेणे तसेच या मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी देशमाने कुटुंब जीव तोडून काम करत आहे. 

आज 'स्नेहवन' मधील पाच मुले दहावीच्या परीक्षेमध्ये ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहेत. आम्ही त्या सर्वांचे अभिनंदन केले. कुणीही शिक्षणापासुन वंचित राहू नये हा त्यांचा प्रयास आहे. तसेच संगणक प्रशिक्षण केंद्र, मुलांना दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी गौशाळेचा प्रकल्प ही चालु केला आहे. त्यांचा सर्वांगीण विकास करत जीवनावश्यक शिक्षण देत, देशहीत समाजहीत जपणारा चांगला माणूस बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही खेड्याची वाट धरली आहे. शहरातील सुख सुविधा येथे नाहीत. मार्ग थोडा खडतर असणार आहे, परंतु ते संघर्ष करायला तयार आहोत. 

आजकाल असा एकही दिवस जात नाही की, आपल्या मुलांनी स्मार्टफोन वापरला नाही, अगदी ४ वर्षाचा मुलगा देखील हट्ट करून २ मिनिटे का होईना आपला स्मार्टफोन रोज गेम्ससाठी किंवा यू ट्यूब बघण्यासाठी घेतोच आणि आपण तो देतोच ,पण 'स्नेहवन' मधील त्या मुलांना हट्ट करण्यासाठी कोणीच नाही. नियतीने त्यांच्याकडून तो हक्क हिरावून घेतलेला आहे, पण अशोक आणि त्याचे कुटुंब खंबीरपणे मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या पाठीशी आहे. 

२४ तास १२ महिने 'मी मी आणि मला मला म्हणणार्‍या लोकांपासून अगदी खूप दूर असे ते चार तास अंतरमनाला आणि हृदयाला खूप काही मोलाची शिकवण देऊन गेले.
 अशोक देशमाने हे या सर्व मुलांना एक 'चांगला माणूस' म्हणुन घडवत आहेत, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. आयटी कंपनीचा जॉब सोडून आज हा माणूस गरीब वंचित मुलांसाठी ज्ञान यज्ञ चालवत आहे. अशा या बाप माणसाला मराठी कट्टा जर्मनीकडून सलाम.

जर्मनीवरून कुटूंबाच्या भेटीला भारतात आलो असता, 'स्नेहवन'ला भेट दिली तेंव्हा अशोक देशमाने आणि मुलांची भेट झाली. ते क्षण मनाला सुखद आनंद देवून गेले. हा जो मराठी कट्टा जर्मनीचा पुरस्कार आहे तो आपल्या देशातील जे तरूण स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या भल्यासाठी कार्य करतात त्यांना दिला जातो. मागील वर्षी आपण हा पुरस्कार पुणे मुंबई महामार्गावर अपघात होवू नये म्हणुन कार्य करणाऱ्या तन्मय पेंडसेंला दिला होता. या वर्षीचा पुरस्कार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपणासाठी आपली आयटीतील नोकरी सोडून काम करणाऱ्या अशोक देशमाने यांना दिला गेला आहे. एक मनापासून वाटत, देवळातल्या दान पेटीत दोन पैसे देण्यापेक्षा ''स्नेहवन'' सारख्या गरजू संस्थांना देण्यात गैर काय!!!

मराठी कट्टा जर्मनीआपल्याला 'स्नेहवन'ला मदतीचा हात द्यायचा असेल तर कृपया संपर्क करावा.
संपर्क : marathikattafrankfurt@gmail.com
पल्लवी करपे-जीवन  करपे +491777361308
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com