esakal | अनुभव सातासमुद्रापारचे : ऑटोमोबाईल हबमध्ये नियमांचे काटेकोर पालन
sakal

बोलून बातमी शोधा

अनुभव सातासमुद्रापारचे : ऑटोमोबाईल हबमध्ये नियमांचे काटेकोर पालन

कोविड-१९च्या जागतिक संकटात अमेरिकेत गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल या भीतीपोटी काहींनी शस्त्रे व हत्यारे जवळ ठेवण्यास सुरवात केली आहे. 

अनुभव सातासमुद्रापारचे : ऑटोमोबाईल हबमध्ये नियमांचे काटेकोर पालन

sakal_logo
By
अभिजित होशिंग, डेट्रॉईट, मिशीगन, अमेरिका

अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडवल्याने येथे सर्वजण आपापल्या घरातच दोन आठवड्यांपासून क्वारंटाईन झाले आहेत. मी ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये इंटेरिअर डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करतो. पत्नी आणि दोन लहान मुलींसह मी मिशीगन राज्यातील डेट्रॉईट शहरात वास्तव्याला आहे. माझी पत्नी सुमेधा ही येथील एका रुग्णालयात ‘कोविड-१९ फ्रंट लाईन वर्कर’च्या पथकात असून, ती दररोज १२ ते १५ तास काम करते आहेत. माझ्या पत्नीचा मला सार्थ अभिमान वाटतो व त्याच वेळी थोडीशी चिंताही वाटत राहते. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेट्रॉईट शहर हे ऑटोमोबाईल हब आहे. येथे अनेक विद्यापीठे असल्यामुळे इथे विदेशी व इतर राज्यातील पाहुण्यांची नेहमीच खूप वर्दळ असते. त्यामुळे या शहरात व जवळ असलेल्या शहरांमध्ये कोरोनाचा खूपच मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. दररोज हजारभर नव्या रुग्णांची भर पडते आहे. 

प्रशासनाने दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू केला आहेत. तसेच वेळीच लॉकडाउन व वर्क फ्रॉम होम केल्यामुळे पुढील लाखोंच्या संख्येत होणारे संक्रमण रोखण्यात यश आले. सर्वच लहान उद्योग बंद असल्याने ७ लाखांपेक्षा अधिक लोक बेरोजगार झाले असून, त्यांच्यात नैराश्य वाढते आहे. कोविड-१९च्या जागतिक संकटात अमेरिकेत गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल या भीतीपोटी काहींनी शस्त्रे व हत्यारे जवळ ठेवण्यास सुरवात केली आहे. येथील प्रशासनाने मोकाट फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई देखील चालू केली आहे. कोणी जर निष्कारण फिरताना दिसला तर त्याला कमीतकमी एक हजार अमेरिकन डॉलरचा दंड (सुमारे ७५,००० रुपये) व सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. त्यामुळे नियम मोडण्यास फारसे कोणी धजावत नाही. आम्ही दहा दिवसांतून एकदा गरजेचे सामान आणण्यासाठी फक्त बाहेर पडतो. त्यासाठी मॉल्समध्ये सोशल व फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाते. 

जेव्हा माझे अमेरिकन सहकारी ऑनलाइन मिटिंगमध्ये भारतातील परिस्थितीची चौकशी करतात तेव्हा त्यांना सांगतांना अभिमान वाटतो की भारतातील प्रशासनाने वेळीच काळजी घेतल्यामुळे खूप प्रचंड प्रमाणामध्ये कोरोनाचे संक्रमण झालेले नाही. इकडे बहुतेक माध्यमांमधून भारतातील परिस्थितीची प्रशंसा केली जाते. तेव्हा भारतातील सर्व नागरिकांचे मनोमन कौतुक वाटते आणि भारतीय असल्याचा अभिमानही वाटतो. त्यामुळे अशीच, किंबहुना यापेक्षाही अधिक काळजी तुम्ही सर्वजण आणखी काही महिने घ्याल अशी माझी खात्री आहे.