esakal | बलुचिस्तानसाठी भारत पाक युद्ध नको

बोलून बातमी शोधा

Balochistan
बलुचिस्तानसाठी भारत पाक युद्ध नको
sakal_logo
By
अनुवाद व टिप्पणी: सुधीर काळे (sbkay@hotmail.com)

balochhal.com/2016/10/26/interview-with-malik-siraj-akbar/
By The Baloch Hal News

अखिल भारतीय विवाद व्यासपीठाचे-Indian Union Debate Forum (IUDF)- वार्ताहार श्री. प्रतीक बक्षी यांनी श्री. मलिक सिराज अकबर यांची बलुचिस्तानबद्दलच्या कित्येक महत्वाच्या मुद्द्यांसंबंधी मुलाखत घेतली. श्री. मलिक सिराज अकबर हे स्वत: एक पत्रकार, एक राजनैतिक विश्लेषक व संचारव्यवस्थेचे विशषज्ञ (communications specialist) आहेत. ते वॉशिंग्टनस्थित बलुचिस्तान संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष असून ’बलोच हाल’ या पाकिस्तानच्या पहिल्या-वहिल्या संस्थळाद्वारे चालणार्‍या ’केवळ-स्थानिक’ अशा वृत्तपत्राचे प्रमुख संपादक आहेत. तसेच ’एंकार’ नांवाच्या एका उर्दू नियतकालिकाचेही ते संपादक आहेत.
 

माझे दोन शब्द: या मुलाखतीमध्ये श्री. नलिक यांनी व्यक्त केलेली मते अतीशय परिपक्व, प्रगल्भ व व्यवहारी वाअटली व त्यामुळे मला खूप पटली! नुकत्याच ’डॉन’ वृत्तपत्रातील त्यांनी व्यक्त केलेल्या मतात बराच फरक जाणवतो व भरही योग्य ठिकाणी दिलेला वाटला. सकाळच्या वाचकांना हा लेखही रुचेल अशी आशा आहे.
त्यांची ही चित्तवेधक मुलाखत IUDF व श्री. मलिक यांच्या अनुमतीने प्रकाशित करत आहे.

 
प्रतीक बक्षी: नरेंद्र मोदी यांनी आपल्या २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख करून एक अगदी आगळी-वेगळी, नेहमीपेक्षा निराळी अशी कारवाई केली. भारतीय उपखंडातील शक्तींविरुद्ध नेहमीची शस्त्रास्त्रे वापरत प्रतिहल्ला करण्याची अधिक क्षमता असण्याच्या आणि बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करण्याच्या  भारताच्या गरजेपोटी त्यांनी असा उल्लेख केला असावा काय?
 
मलिक: बलुचिस्तानमध्ये भारताने कुठल्याही तर्‍हेचा लष्करी हस्तक्षेप केल्यास पाकिस्तानबरोबरचा  तणाव आणखी वाढेल व त्याचा परिणाम केवळ राजनैतिक क्षेत्रापुरताच मर्यादित न रहाता लष्करी संघर्षातही होऊ शकेल. बलुचिस्तानमध्ये भारताने लष्करी हस्तक्षेप करणे व्यवहार्य वाटत नाहीं कारण भारताची सरहद्द कुठेही बलुचिस्तानला लागलेली नाहींय्. त्यामुळे भारताचा लष्करी हस्तक्षेप १९७१ सालच्या बांगलादेशबरोबरच्या लष्करी हस्तक्षेपापेक्षा निराळा आहे. आज भारत व पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रें अण्वस्त्रधारी आहेत (तशी ती १९७१ साली नव्हती) व त्यांच्यामध्ये युद्ध पेटलेले कुणालाच नको आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत व इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा वारंवार उठवणे व त्याला राजनैतिक पाठिंबा देणे हे बलुचिस्तानला जास्त उपयुक्त आहे. कारण आज कुठलाही देश बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला अधिकृतपणे समर्थन देत नाहीं आहे. जर भारत ’स्वतंत्र बलुचिस्तान’चे अधिकृत समर्थन जाहीर करेल तर ते भारताचे बलुचिस्तानच्या चळवळीला दिलेले मोठे योगदान ठरेल. बलुचिस्तानला स्वातंत्र्य जर मिळालेच तर ते राजनैतिक प्रयत्नांतूनच मिळेल. अण्वस्त्रधारी पाकिस्तानला लढाईद्वारे हरवून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देणे अशक्यच वाटते. केवळ बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारत व पाकिस्तानमधील युद्धाच्या शक्यतेसाठी आज कुणाचीच तयारी नाहींय्. कित्येक भारतीयांनासुद्धा अशी लढाई योग्य वाटत नाहीं! भारत बलुचिस्तानच्या कुठल्याही भागावर दावा करत नसताना मला तरी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताने पाकिस्तानबरोबर युद्ध करणे सयुक्तिक वाटत नाहीं!
 
प्रतीक बक्षी: काश्मीरमध्ये जे घडले त्याला एक प्रतिक्रिया म्हणून वा उत्तर म्हणून मोदींनी बलुचिस्तानबद्दल हा मुद्दा उठवला असे तुम्हाला वाटते काय?
 
मलिक: मला तरी तसेच वाटते कारण बलुचिस्तानचे स्वातंत्र्ययुद्ध गेली सहा दशके चालू आहे, पण पाकिस्तानने जेंव्हां बलुची लोकांविरुद्ध जीवघेण्या मोहिमा काढल्या तेंव्हां त्याविरुद्ध भारताने आपला आवाज कधीच उठवला नव्हता! बलुची लोकांच्या कत्तली व अपहरण करून त्यांना अदृश्य करणे या घटना गेल्या दहा वर्षांपासून सुरूच आहेत. मोदींनी किंवा कॉंग्रेस पक्षाने याविरुद्ध आतापर्यंत कधीच आस्था, चीड वा तिडीक दाखवलेली नाहीं.[१]

बलुचिस्तानची चळवळ ही पहिल्यापासून एक स्थानिक चळवळच आहे व तिचे रूप किंवा व्याप्ती कधीच काश्मीरमध्ये काय होत आहे किंवा भारत-पाकिस्तानचे संबंध कसे आहेत यावर अवलंबून नव्हती. उद्या भारताने बलुची लोकांना दिलेले समर्थन काढून घेतले तरी बलुची जनता आपल्या मागण्यांसाठी, सार्वमतासाठी व आपल्या नैसर्गिक संपत्तीच्या मालकीसाठी सतत लढतच राहील असेच माझे मत आहे.
 
प्रतीक बक्षी: (अजित कुमार) दोवल प्रणाली[२] बलुचिस्तानमध्ये वापरावी असे आपल्याला वाटते काय? 
 
मलिक: याला दोन बाजू आहेत. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र या नात्याने भारत आपल्या शेजारी देशांत काय चालले आहे याबद्दल पूर्णपणे उदासीन राहू शकत नाहीं. भारताने दक्षिण आशियातील लोकांच्या लोकशाही मार्गाने मिळणार्‍या अधिकारांचे समर्थन करण्यासाठी आपले राजनैतिक मार्ग वापरलेच पाहिजेत पण ते करण्यासाठी भारताने आपण स्वत: तसे करून एक उदाहरण जगापुढे ठेवले पाहिजे. पण जेंव्हां भारत स्वत: काश्मीरमधील आपल्याच लोकांविरुद्ध क्रूर शक्ती वापरतो तेंव्हां त्याला पाकिस्तानने बलुची जनतेच्या या अधिकारांना मान्यता देण्याबाबत आग्रहाने समर्थन करण्याचा नैतिक अधिकारच उरत नाहीं. जर भारताने तरीही बलुची जनतेच्या बंडाळीला समर्थन दिले तर पाकिस्तान काश्मिरी सशस्त्र गटांना आतापेक्षा जास्त समर्थन देऊ लागेल. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे भारत बलुचिस्तानमधील बंडाळीत सक्रीय हस्तक्षेप न करता आपल्या राजनैतिक मार्गाद्वारे पाकिस्तानला ओशाळवाणा करू शकतो. भारतीय नेतृत्वाला बलुचिस्तानबद्दल कांहींच माहिती नाहीं त्यामुळे तिथे थेट हस्तक्षेप केल्यास तो आणखीच अडचणीत पडण्याची शक्यता आहे.
 
प्रतीक बक्षी: या राजकीय खेळाला बुद्धिबळाशी तूलना केल्यास आपल्याला मोठा फायदा मिळावा म्हणून बलुची लोकांना प्याद्यासारखे वापरले जात आहे असे आपणास वाटते काय?
 
मलिक: ऐतिहासिक दृष्ट्या पाहिल्यास बलुची जनता आपल्या लढाया स्वत:च  लढत आली आहे व तिने आपली चळवळ परदेशी प्रभावापासून मुक्तच ठेवली आहे. पण मोदींच्या निवेदनानंतर अनेक बलुची नेत्यांच्या प्रतिक्रिया पहाता असे वाटते कीं बलुचींची नवी पिढी अत्यंत निराशेपोटी आता फारच  जिवावर उदार होऊन भारतासारख्या एकाद्या बलाढ्य परदेशी शक्तीचे प्यादे बनायलासुद्धा तयार झाली आहे. माझ्या मते ही नवी बलुची पिढी परराष्ट्र संबंधांत व मुत्सद्देगिरीत फारच भोळीभाबडी आहे. मोदींच्या भाषणातील बलुची जनतेच्या मानवाधिकारांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दलचा केवळ एका उल्लेखाची परिणिती नजीकच्या भविष्यकाळात भारताच्या उघड व अधिकृत समर्थनात होईल अशी आशा बाळगण्याला उतावीळपणा तरी म्हणावे लागेल किंवा तद्दन हास्यास्पद समज मानावा लागेल. पाकिस्तानच्या तावडीतून सुटण्यासाठी बलुची लोक कुणाहीकडून मदत घ्यायला तयार आहेत. त्या प्रयत्नात ते भारताची स्तुती करण्यात व मोदींच्या निवेदनावर अतिशयोक्तीपूर्ण जल्लोष करण्यात गुंतली आहे. पण त्यामुळे पाकिस्तानी सरकारला बलुची चळवळीला बदनाम करण्याची आयती संधी मिळाली आहे.
 
प्रतीक बक्षी: इराणला वैफल्यग्रस्त, नाउमेद करण्यासाठी बलुचिस्तानवरील भारताच्या प्रभावाचा अमेरिका व सौदी अरेबिया दुरुपयोग करून घेत आहेत असे आपल्याला वाटते काय?
 
मलिक: सध्या तरी भारताचा बलुचिस्तानवर कसलाही प्रभाव आहे असे मला वाटत नाहीं! भारत कुठल्या स्तरापर्यंत जाऊन मदत करणार आहे हे कळायलासुद्धा कांहीं वेळ वाट पहावी लागेल. मोदींच्या बलुचिस्तानबद्दलच्या निवेदनानंतर आतापर्यंत तरी भारताने ते निवेदन वरच्या पायरीवर नेलेले नाहीं. इराणबरोबर भारताचे अनेक उत्तम करार आहेत व या दोन देशांत उत्कृष्ठ प्रतीचे सहकार्यही आहे. त्यामुळे भारत कधीही आपला प्रभाव इराणला गोत्यात आणण्यासाठी वापरणार नाहीं. पाकिस्तानपेक्षा भारतावर इराणचा जास्त विश्वास आहे. पाकिस्तानी बलुचींच्या  राष्ट्रवादी बंडाळीमुळे इराण कधीच अस्थिर बनणार नाहीं. ’इराणी बलुचिस्तान’मधल्या[३] सुन्नीपंथीय बलुचींच्या नेतृत्वाखालील जुंडुल्ला किंवा जैश-ए-अडाल यासारख्या संघटनांच्या बंडाळीमुळे तिथे अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. भारताला बलुचिस्तानसंबंधीची जी आत्मीयता व कळवळ आहे ती फक्त पाकिस्तानी बलुचिस्तानच्या निधर्मी  राष्ट्रवादी चळवळीशी आहे, इराणमधील सुन्नी बलुचिस्तानबद्दल नाहींय्.

इराणबरोबर अमेरिकेचा अणुसंशोधनाबद्दल करार झालेला असल्यामुळे अमेरिका आता इराणमध्ये अस्थिरता निर्माण करायची शक्यता नाहींच, पण जर करायची जरूरी भासली तर ते अशी अस्थिरता निर्माण करण्यासाठी भारतापेक्षा पाकिस्तानला हाताशी धरतील! सुन्नी बंडाळीला चिथावणी देऊन तिला मोकाट सोडणे ही इराणला वैफल्यग्रस्त करायची परिणामकारक कारवाई आहे. सुन्नी आतंकवाद्यांना समर्थन देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि प्रोत्साहन देणे या कारवायांसाठी या भागात तरी पाकिस्तानचा हात दुसरा कुठलाही देश धरू शकत नाहीं. आधीच अफगाणिस्तानमध्ये व पाकिस्तानमध्ये ’इसिस’ सक्रीयपणे कार्यरत असताना इराणमध्ये अस्थिरता कुणालाच नको आहे. एक वेळ सौदी व पाकिस्तानला इराणमध्ये अस्थिरता निर्माण करायची खुमखुमी असेल पण त्याला अमेरिका पाठिंबा देणे शक्य नाहीं. अलीकडे अमेरिका आधीच सौदी असेबियावर वैतागलेली आहे व त्यामुळे ’इसिस’शी तोंड द्यायला अमेरिकेला लवकरच इराणबरोबरचे आपले संबंध सर्वसामान्य करून ते सुधारावे लागणार आहेत.
 
प्रतीक बक्षी: “चीन-पाकिस्तान आर्थिक हमरस्ता” या प्रकल्पातला एक भागीदार या नात्याने चीन  बलुचिस्तानमधील ग्वादर या बंदराला या प्रकल्पाचा ’जमीनीचा एक पट्टा व त्यातून जाणारा एक हमरस्त” या नात्याने एक अविभाज्य भागच समजतो. भारताचा बलुचिस्तानमधील हस्तक्षेपाकडे चीनने एक आक्रमण किंवा एक आगळीक म्हणून पाहू नये यासाठी भारताचे धोरण व कारवाया कशा असाव्यात असे तुम्हाला वाटते?
 
मलिक: भारत आणि चीन ही दोन वेगळी राष्ट्रें आहेत आणि दोघांचा जगाबद्दलचा दृष्टिकोनही वेगवेगळा आहे. त्यामुळे बलुची जनतेच्या त्यांच्याबद्दलच्या अपेक्षाही वेगवेगळ्य़ा आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतात आहे. लोकशाही, निधर्मीपणा व मानवाधिकार या तीन्ही मूल्यांबाबत भारताची बांधिलकी खूप पूर्वापार चालत आलेली आहे व म्हणूनच भारत आपल्यावरील अन्यायाला व अत्याचारांना सार्‍या जगात वाचा फोडेल एवढीच समंजस व माफक अपेक्षा बलुची जनतेला भारताकडून आहे. चीनमध्ये पाकिस्तानपेक्षाही जास्त स्तरावरील हुकुमशाही आहे. राजकीय मतभेद असलेल्या आपल्याच प्रजाजनांशी वागताना चीन पाकिस्तानी राज्यकर्त्यांपेक्षा जास्त दडपशाहीचा वापर करतो. चीन-पाकिस्तान व्यापारी महामार्गाला बलुची जनतेचे अजीबात समर्थन नाहीत् हे चीनला कळून चुकले आहे, कारण या महामार्ग-प्रकल्पाच्या प्रगतीबरोबरच आपल्याच बलुची भूमीवर आपणच अल्पसंख्य होऊन जाऊ अशी साधार भीती त्यांना वाटते. बलुची जनतेचा विरोध जसजसा तीव्र होत जाईल तसतसा प्रकल्प अधीकच लवकर संपविण्याचा तगादा   पाकिस्तान चीनकडे लावेल. चीनच्या प्रभावाला शह देण्यासाठी भारताने अमेरिकेसह जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांची मदत घेऊन बलुची जनतेच्या हक्कांची कशी पायमल्ली होते आहे सार्‍या जगाला सांगून बलुची जनतेच्या अन्यायाविरुद्ध त्यांचा पाठिंबा मिळविला पाहिजे. भारत, अफगाणिस्तान व बांगलादेश या तीन देशांना जर खरेच बलुची स्वातंत्र्याची चाड असेल तर या तिघांनी एकत्र येऊन बळकट स्थानिक युती बनविली पाहिजे व या युतीद्वारे बलुची जनतेवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे.
 
प्रतीक बक्षी: आपण इराणच्या व अफगाणिस्तानच्या बलुचिस्तानमधील आस्थेचे कसे वर्णन कराल?
 
मलिक: पाकिस्तानप्रमाणेच इराणचा सर्वात मोठा प्रांतसुद्धा बलुचिस्तानच आहे. त्याला ’सिस्टन’ या नावाने ओळखले जाते. इराणमध्ये बलुचींना दुहेरी सापत्नभावाने वागविले जाते, एक त्यांच्या वांशिक कारणाने व दुसरे त्यांच्या वेगळ्या पंथामुळे! सर्व बलुची लोक सुन्नी पंथीय आहेत पण देशाच्या स्तरावर इराणमध्ये शियापंथीय लोक बहुसंख्यांक आहेत. पूर्वीपासून इराण व पाकिस्तान परस्परांच्या सहकार्याने बलुचींच्या विरोधाची गळचेपी करीत आलेले आहेत. इराणला पाकिस्तानी बलुचिस्तानमधील हिंसाचार थांबून स्थिरता यायला हवी आहे कारण पाकिस्तानी बलुचिस्तानमधील बंडाळी सीमा ओलांडून इराणी बलुचिस्तानमधील बलुचींमधे असंतोष निर्माण करेल अशी भीती इराणला वाटते. अफगाणिस्तानबद्दल बोलायचे तर कडवे धार्मिक व निधर्मी अफगाण्यांनी त्यांच्या कठीणाईच्या दिवसात पाकिस्तानी बलुचिस्तानमध्ये आश्रय घेतलेला आहे. जेंव्हां-जेंव्हां बलुचींनीसुद्धा लष्करी कारवायांना तोंड द्यावे लागले तेंव्हां-तेंव्हां त्यांनींही अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे. पाकिस्तानच्या तालीबानला दिलेल्या समर्थनामुळे व अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारात सातत्याने केलेल्या हस्तक्षेपामुळे अफगाणी जनता निराशाग्रस्त व वैफल्यग्रस्त होऊ लागली आहे. अफगाणी लोकांना बलुची जनतेबद्दल सहानुभूती वाटत असेलही पण ते स्वतंत्र बलुचिस्तानला अधिकृतपणे समर्थन देत नाहींत कारण असे केल्याने पाकिस्तानशी शत्रुत्व निर्माण होईल व त्याचा परिणाम म्हणजे आपल्याच देशात हिंसाचाराला व असंतोषाला आमंत्रण देण्यात होईल हे ते जाणतात!
 
प्रतीक बक्षी: आता शेवटचा प्रश्न! आपण आम्हाला बलुचिस्तानच्या संस्कृती व परंपरा, रूढी याबद्दल कृपया माहिती द्यावी!
 
मलिक: बलुचिस्तान हा वेगवेगळ्या जमातींनी बनलेला देश असला तरी ते सर्वात प्रथम एक बलुची असा स्वत:चा परिचय करून देणेच पसंत करतात, मग इतर माहिती! बलुची लोक खूप अभिमानी आहेत. आपल्या आदरातिथ्य, देशभक्ती व शौर्य या मूल्यांबद्दल त्यांना खूप स्वाभिमान व अहंभाव आहे. ते अद्याप खूप पुराणमतवादी आहेत, त्यामुळे बलुची महिला स्वत:ला शिक्षणाच्या, अर्थार्जनाच्या व पुरुषांशी तुल्यबळ समजले जाण्याच्या हक्कांसाठी अद्याप झगडत आहेत. बलुची जनता बहुसंख्येने निधर्मी राजकीय पक्षांना मतदान करतात. ते सुन्नीपंथीय असले तरी धर्म ही खासगी बाबच मानतात. वेगवेगळ्या वंशांच्या व जमातींच्या बलुची जनतेमध्ये शिक्षण, सामाजिक मोकळेपणा व सहिष्णुता असण्याची व वाढण्याची गरज आहे, कारण बलुची जनता जमातीमधील, राजकीय पक्षांमधील व पंथांमधील वैचारिक मतभिन्नता व हिंसाचार या सर्व कारणांनी पूर्णपणे विभागली गेलेली आहे!
(Courtesy: The Indian Union Debate Forum) 
 
टिपा:
[१] मोदींनी पूर्ण विचार करून हे पाऊल उचलले आहे. त्याला थोडा-फार वेळ लागणारच! जे धाडसी पाऊल उचलण्याचा विचार गेल्या ६९ वर्षांत कुठल्याही पंतप्रधानाने केला नव्हता ते पाऊल मोदींनी ३० महिन्यांत उचलून पाकिस्तानला चांगलेच अडचणीत आणले आहे!
[२] दोवल प्रणाली: श्री अजित दोवल यांनी राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर दोन भाषणे दिली होती. एक होते तंजावर येथे शास्त्र विश्वविद्यालयात फेब्रूवारी २०१४ रोजी नानी पालखीवाला यांच्या स्मृत्यर्थ दिलेले भाषण व दुसरे होते मुंबईत ऑगस्ट २०१५ रोजी ललित दोशी यांच्या स्मृत्यर्थ दिलेले भाषण. या भाषणांत त्यांनी जे विचार मांडले ते दोवल विचारप्रणालीचे मुख्य मुद्दे आहेत त्यांनाच दोवल विचारप्रणाली असे म्हटले जाते. त्या भाषणांचे दुवे आहेत:
https://www.youtube.com/watch?v=v4RaCJrT51w&feature=youtu.be आणि
https://www.youtube.com/watch?v=C-jHVxWd_Wc&feature=youtu.be
या दोन भाषणांत त्यांनी पाकिस्तानकडून होणार्‍या दहशतवादी कृत्यांविरुद्ध कशा कारवाया कराव्या याबद्दलचे आपले विचार मांडले आहेत. हीच दोवल विचारप्रणाली!
त्यांची गेल्या पाच वर्षात केलेली महत्वपूर्ण निवेदने खालीलप्रमाणे:
1.   आपली शक्ती हात राखून वापरण्याची भारताची मनोवृत्ती आहे. आपण आपली पूर्ण शक्ती न वापरण्याचे किंवा आपल्या शक्तीबाहेर प्रतिहल्ले करण्याचे धोरण बदलले पाहिजे आणि आपली शक्ती आणि त्यानुसार मारलेल्या तडाख्यांमधील जोर सुधारण्याकडे लक्ष पुरवले पाहिजे.
2.   काश्मीरमधील असंतोषाबद्दल आपण जास्त काळजी करू नये व जरूरीपेक्षा जास्त प्रतिक्रियाही देऊ नयेत. कारण हा असंतोष आपोआप शांत होईल कारण दंगा करणार्‍यांची शक्ती जास्त दिवस तग धरू शकणार नाहीं!
3.   देशाच्या सर्वोच्च हिताचे संरक्षण कुठल्याही परिस्थितीत केलेच पाहिजे.
4.   युद्ध पेटलेच तर आपला विजय होईपर्यंत ते चालवले पाहिजे!
5.   आपण जर कांहीं चिथावणीखोर कृत्य केले तर त्याची जबाबदारी अंशत: आपल्यावर असते, पण जर आपण आपल्या शक्तीचा उपयोग करू शकत नसलो तर ती शक्ती आपल्याकडे नसल्यासारखीच आहे!
6.   तुम्ही जर पुन्हा एकदा मुंबईसारखा आतंकी हल्ला घडवून आणलात तर बलुचिस्तान तुम्ही गमावून बसाल!
[३] बलुचिस्तानचा मोठा भाग पाकिस्तानात आहे. पण पश्चिमेला इराणमधील सिस्टन प्रांत व उत्तरेला अफगाणिस्तानमधील सीमेलगतचा भाग येथेही बहुसंख्य बलुची वस्ती असलेले भाग आहेत. सोबत दिलेला नकाशा पहा.

(IUDF)-