MI मराठी - आपलं अधिवेशन

सुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन) 
गुरुवार, 9 मार्च 2017

अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे 18 वे अधिवेशन डेट्रॉईट येथे सात ते नऊ जुलैदरम्यान होत आहे. कार्यक्रमाच्या आखणीपासून ते अंमलबजावणीपर्यंतची जबाबदारी अमेरिकास्थित मराठी मंडळी वेळात वेळ काढून मनापासून सांभाळतात. यंदाच्या अधिवेशनात कोण कोणते कार्यक्रम आयोजित केले आहेत, याबद्दल डेट्रॉईटहून लिहिताहेत सुशांत खोपकर.

नमस्कार मंडळी!
कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे, की आपल्या अधिवेशनाचे कार्यक्रम आता जवळपास निश्चित झाले आहेत! काही कार्यक्रमांचे करार होणे अजून बाकी आहे. पण कार्यक्रमांचं वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यावर ते बघून आपल्याला जेवढा आनंद होईल तेवढीच "कुठला कार्यक्रम बघू आणि कुठला नको!" अशी आपली अवस्था व्हायची दाट शक्यता आहे! ह्याचं कारण असं, की भारतातून दर्जेदार कार्यक्रम तर आपण आणतोच आहोत, पण उत्तर अमेरिकेतल्या विविध प्रांतातील उत्तमोत्तम कार्यक्रम सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. या अधिवेशनात कार्यक्रमांच्या एकूण संख्येपैकी ६०-६५% कार्यक्रम हे उत्तर अमेरिकेतल्या गुणी कलाकारांनी सादर केलेले असणार आहेत.

नॉर्थ अमेरिकेतल्या कार्यक्रमांची थोडक्यात झलक द्यायची झाली, तर कॅलिफोर्नियातल्या बे एरियातलं 'रामायण' नावाचं नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे. अभिनयाबरोबरच गदिमा आणि सुधीर फडकेंच्या 'गीत रामायण' मधल्या अजरामर गाण्यांचं थेट गायन आणि त्यावर सादर केलेलं नृत्य आपल्याला बघायला मिळेल. जवळपास ६० कलाकारांची फौज असलेल्या या कार्यक्रमात त्यांनी LED स्क्रीनचा वापर केला आहे. तंत्रज्ञानाने परिपूर्ण असं हे नव्या रुपातलं रामायण आपल्या सगळ्यांना तर आवडेलच, पण विशेष करून नव्या पिढीसाठी हा कार्यक्रम मनोरंजबरोबरच माहितीपूर्ण ठरू शकेल.

राले, नॉर्थ कॅरोलायनाचा ग्रुप जेष्ठ नाटककार, पद्मभूषण विजय तेंडुलकरांचं 'घाशीराम कोतवाल' हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. भारतीय नाटकांमध्ये सर्वाधिक प्रयोगसंख्येचा उच्चांक असलेले हे नाटक. आजवर या नाटकाचे जागतिक रंगभूमींवर अनेक भाषांमध्ये सहा हजारहून अधिक प्रयोग झालेले आहेत. अभिनयाबरोबरच संगीत व नृत्य यांच्या माध्यमातून या नाटकाची कथा उलगडत जाते. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे सुपुत्र डॉ. आनंद लागू यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे.

न्यू जर्सीचा 'Theatrix' ग्रुप 'अग्निदिव्य' नावाचं एक आजच्या काळातलं नाटक घेऊन येत आहे. जेष्ठ लेखक प्र. ल. मयेकर यांचं सशक्त लेखन, रहस्यकथा आणि वास्तववादी सेट ही या नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. स्त्रीशक्तीवर आधारित 'शक्तिरूपेण' नावाची एक नृत्यनाटिका कॅलिफोर्नियाच्या निर्मल गोसावी आपल्यासाठी घेऊन येत आहेत. आयुष्यात कधी नैसर्गिक, तर कधी सभोवतालच्या परिस्थितीमुळे स्त्रीला घ्याव्या लागणाऱ्या निरनिराळ्या रूपांची ओळख हा सुंदर कार्यक्रम आपल्याला नृत्याच्या माध्यमातून करून देईल. 'आम्हांला “पन” जमतं!' नावाचा उपहासात्मक विडंबन असलेला एक सांगीतिक विनोदी कार्यक्रम आयोवा राज्यातून येणार आहे. नितीन करंदीकर यांनी या कार्यक्रमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तरुणांसाठी सुप्रसिद्ध विनोदवीर राजीव सत्याल ह्यांचा एक "स्टॅन्ड अप कॉमेडी" कार्यक्रम असणार आहे. "तरुणांसाठी" असला तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेऊ शकतील.

त्याचबरोबर 'नमन नटवारा' हा नाट्यसंगीतावर आधारित असलेला कार्यक्रम सिॲटल, वॉशिंग्टन इथून येणार आहे. फिलाडेल्फियातून मीना नेरुरकरांचा ग्रुप 'वग वॉशिंग्टनचा' हा विनोदी कार्यक्रम आणणार आहेत. टोरांटो, कॅनडावरून नरेंद्र दातार 'भक्तिरंग' नावाचा भक्तिसंगीत आणि भावगीतांचा कार्यक्रम घेऊन येत आहेत. "सा रे ग म प" स्पर्धेचे पूर्वीचे विजेते आणि उपविजेते एक गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच शिकागोचं मंडळ 'माऊली' नावाचा संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यावर आधारित कार्यक्रम घेऊन येणार आहे. या सगळ्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आपणास (bmm.2017.org हया संकेतस्थळावर आणि फेसबुक पेजवर (facebook.com/bmm2017)  उपलब्ध होईल. 

या व्यतिरिक्त योग सूत्रावर आधारित एक कार्यक्रम आहे, वेदांचा अर्थ सांगणारा एक कार्यक्रम आहे, एक निरूपण आहे. तसेच लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. थोड्यक्यात काय, तर प्रत्येकाला आवडतील असे कार्यक्रम घ्यायचा आपण प्रयत्न केला आहे. नॉर्थ अमेरिकेतल्या विविध प्रांतातून कार्यक्रम घ्यायचा आपण प्रयत्न केला आहे. ज्या प्रमाणे प्रथितयश कलाकारांचे कार्यक्रम आपण निवडले आहेत, त्याचप्रमाणे नवोदित कलाकारांनाही अधिवेशनाचा रंगमंच उपलब्ध करून देऊन त्यांचे गुण दाखवायची संधी आपण त्यांना देऊ केली आहे. हे झाले नॉर्थ अमेरिकेतले कार्यक्रम. लवकरच आपण भारतातून येणाऱ्या नवीन कार्यक्रमांची घोषणा करू! या सगळ्या कार्यक्रमांच्या निवडीमागे बऱ्याच लोकांचे भरपूर कष्ट आहेत. आपल्या सगळ्यांना अधिवेशनाचा मनसोक्त आनंद घेता यावा, आपल्या अधिवेशनाचा 'दिस गोड व्हावा' याचसाठी आहे हा अट्टाहास!

पूर्वप्रकाशित : बृहन्महाराष्ट्र वृत्त मार्च २०१७: (अधिक माहिती bmmonline.org) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMM Convention in Detroit