esakal | पाकसाठी इम्रान खान 'तारणहार' ठरणार का? (सुधीर काळे)
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan_Kid

पाकसाठी इम्रान खान 'तारणहार' ठरणार का? (सुधीर काळे)

sakal_logo
By
ताहा सिद्दिकी

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे. कारण त्यांनी आपल्या पहिल्या ५ वर्षांच्या कारकीर्दीच्या कार्यक्रमाबद्दल निवेदन करताना सर्व योग्य मुद्द्यांना हात घातला होता. त्यात पाकिस्तानी जनतेची गरीबीचे हटविणे, मोडकळीस आलेल्या अर्थव्यवस्थेला सुस्थितीत आणणे, शिक्षणाबद्दलच्या अडचणी दूर करणे असे मुद्दे होते. त्यांच्या भाषणातून त्यांना या विषयांची पुरेपूर व सखोल माहिती आहे असेच सर्वांचे मत पडले.

पण पाकिस्तानचे रूपांतर एका सामाजिक कल्याणकारी राज्यात करण्यासाठी त्यांनी दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांकडे पहाता ती सर्व राणा भीमदेव थाटात दिलेली आश्वासनेच वाटतात. इम्रान खान यांच्या आधीच्या कित्येक पंतप्रधानांनी अशीच आश्वासने दिली होती पण ती कधीच खरी झालेली नाहींत.

ते आता या आश्वासनांची पूर्तता करू शकतील कीं नाहीं हे पहाण्यासाठी आपल्याला कांहीं काळ वाट पहावी लागेल. पण खैबर पख्तूनख्वा या राज्यात इम्रान खान यांच्याच पक्षाचे सरकार या आधी गेली पाच वर्षें सत्तेवर होते. तेथील विकासाच्या निकषावर पाहिल्यास त्या सरकारने दाखविण्यासारखे कांहींच कार्य केलेले नाहीं. इम्रान खान यांच्या पक्षाच्या सरकारच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीनंतरही त्या राज्याला अद्यापही बेरोजगारी, कमकुवत आधारभूत संरचना (infrastructural weakness) आणि भ्रष्टाचार यासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागतच आहे.

पण इम्रान खान यांनी आपल्या भाषणात काय सांगितले यापेक्षा काय सांगायचे टाळले हेच जास्त महत्वाचे आहे, कारण त्यातूनच पाकिस्तानमधील गोष्टी सुधारणे कसे असंभवनीय आहे हेच उघड होते.

नवनिर्वाचित पंतप्रधानांनी देशातील वाढत्या उग्रवादाबद्दल व जहालमतवादाबद्दल तपशीलवार बोलण्याचे टाळले. तसेच त्यांचे सरकार पाकिस्तानचे परराष्ट्रविषयक व संरक्षणविषयक प्रश्न कसे हाताळेल याबद्दलची रूपरेषाही त्यांनी दिली नाहीं.

इम्रान खान यांचे धरसोडीचे राजकारण
सर्वांत आधी आपण इम्रान खान यांनी पाकिस्तानात व आसपासच्या प्रदेशात सातत्याने वाढणार्‍या उग्रवादाबद्दल आणि त्यातून उद्भवणार्‍या आतंकवादाबद्दल न बोलणे कां पसंत केले त्याचे विश्लेषण करू. हे न करण्याचे कारण आहे कीं इम्रान खान यांच्या मते या समस्या पाकिस्तानच्या अंतर्गत समस्या नाहींच आहेत किंवा त्या पाकिस्तान-निर्मित समस्या नाहींच आहेत.

इम्रान खान यांना एके काळी उदारमतवादी पुरोगामी नेता समजले जाई, पण अलीकडे त्यांच्या व्यक्तिमत्वात पुराणमतवादाच्या व पराकोटीच्या राष्ट्रवादाच्या छटा दिसू लागल्या आहेत. पाकिस्तानमधील आतंकवादासाठी ते इतर देशांना, खास करून अमेरिकेला, दोष देतात व त्यांना जबाबदार मानतात. “त्यांच्याबद्दल गैरसमजूत करून घेतली गेली आहे” अशा शब्दांत हल्ली ते आतंकवादी गटांचे आग्रही समर्थन करतानाही दिसतात. खैबर पख्तूनख्वा राज्यातील त्यांच्या पक्षाच्या सरकारने तालीबानशी संबंध असलेल्या एका ’मद्रास्सा’ला आर्थिक मदत केली होती. अगदी अलीकडे त्यांनी आपल्या विरोधकांविरुद्ध-खास करून नवाज शरीफ यांच्याविरुद्ध-मुस्लिम धर्माची निंदा केल्याचे (blasphemyचे) आरोप करून पाकिस्तानातील ’उजव्या’ मतप्रणालीच्या जनतेची मते मिळविण्याचा प्रयत्नही केला होता. तसेच अलीकडे त्यांनी अल्पसंख्यांकांच्या व स्त्रियांच्या प्रश्नांची उघड-उघड उपेक्षा केलेली आहे.

पूर्णपणे सरकारच्या ताब्यात असलेल्या शाळांतील अभ्यासक्रमाद्वारे व प्रसारमाध्यमांद्वारे पसरविल्या जाणार्‍या चुकीच्या माहितीमुळे पाकिस्तानी तरुणांत ’पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय सत्तांकडून टीका करण्यात येत आहे’ अशा संकुचित मनोवृत्तीच्या कल्पना पेरण्यात आलेल्या आहेत व इम्रान खान यांच्या अनुयायांत अशा तरुणांचाच भरणा मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील तरुणांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करण्याऐवजी इम्रान खान यांनी त्यांच्या मनावर होणार्‍या अशा धोकादायक प्रचारांना समर्थन देणे चालूच ठेवले आहे. त्यांनी या कारस्थानांच्या अस्तित्वाचे समर्थन केल्यामुळे अशा तरुणांची संख्या वाढली आहे व तिच्या विचारसरणीत बदल होण्याची कांहींच आशा दिसत नाहीं, उलट तिची बौद्धिक अवनतीच होण्याची शक्यता दिसते.

आता त्यांनी परराष्ट्रविषयक व संरक्षणविषयक प्रश्नांबद्दल आपल्या भाषणात बोलायचे कां टाळले इकडे वळू. याचे उत्तर फारच सरळसोट आहे. ही दोन्ही धोरणे सर्वस्वी पाकिस्तानी लष्कराच्या वर्चस्वाखाली व नियंत्रणाखाली असून लष्कराला या बाबतीत मुलकी सरकारची लुडबूड अजीबात नको आहे. जरी पाकिस्तानसमोरच्या आजच्या बर्‍याच समस्यांचे मूळ मुलकी सरकार व लष्कर यांच्यातील अशा असमतोलामध्ये असले तरी इम्रान खान यांनी त्यावर अजीबात भाष्य करणे टाळणेच पसंत केले आहे.

त्यांचे या विषयावरील मौन फारच लक्षणीय व अर्थपूर्ण आहे कारण इम्रान खान ही लष्कराने निवडलेली ’खास व्यक्ती’ असून या निवडणूकीत लष्करानेच मोठ्या प्रमाणावर लुडबूड व गडबड करून त्यांना विजयी केले असाच  खात्रीचा समज सर्वत्र पसरलेला आहे

[१]. पाकिस्तानी लष्कराच्या हातातच लगाम आहे!
पाकिस्तानी लष्कर एकाद्या राजकीय पक्षाचा कशा तर्‍हेने लोकांना परिचय करून देते आणि मग टेकू देते ही पाकिस्तानातील सर्व लोकांना माहीत असलेली बाब आहे. अशा ’निवडक’ राजकीय पक्षाला ’राजेसाहेबांचा पक्ष’ असेच संबोधले जाते. कारण असे केल्याने लष्करच चालकाच्या खुर्चीत बसून (नावाचेच) मुलकी सरकार लष्करी पद्धतीने चालविते!

आणि सध्या इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पाकिस्तान न्यायासाठीची चळवळ) हा पक्षच ’ राजेसाहेबांचा पक्ष’ म्हणून ओळखला जात आहे. म्हणजेच हा पक्ष लष्कराने निवडलेला आहे. या लष्करानेच पाकिस्तानच्या अस्तित्वापैकी अर्धा काळ उघडपणे शासन केलेले आहे तर उरलेल्या अर्ध्या काळात त्यांनी चोरून लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या मुलकी  शासनात लुडबूड व उलथापालथ केलेली आहे. याच्या स्पष्ट खुणा इम्रान खान यांनी निवडलेल्या मंत्रिमंडळाच्या चेहेर्‍यातच दिसत आहेत. कारण यातले बहुसंख्य मंत्री शेवटचे लश्करशहा मुशर्रफ यांच्याशी जवळीक ठेवणार्‍या लोकांपैकीच आहेत.

आणि तरीही लष्करानेच त्यांच्या ’पित्त्या’ची निवड करून अशा तर्‍हेने त्याला सिंहासनावर बसविले असले तरी हे मैत्रीचे संबंध फार काळ टिकलेले नाहींत!

पाकिस्तानचा राजकीय इतिहास पाकिस्तानी लष्कराने असे गादीवर ’बसविलेल्या’ व थोड्याच काळाने हाकलून दिलेल्या, हद्दपार केल्या गेलेल्या आणि कधी-कधी तर  ठारही मारलेल्या राजकीय नेत्यांनी भरलेला आहे [२].

इम्रान खानच्या नशीबात असेच कांहीं असेल काय? ही घटना इम्रान खान लष्कराला पुढे कधी आव्हान देतील कीं नाहीं यावरच अवलंबून असेल.

स्वत: नामानिराळे रहात पण लष्कराने दुसर्‍यांकडून पेटवून ठेवलेल्या लढाया बंद करावयाची आज्ञा पंतप्रधान या नात्याने इम्रान खान लष्कराला देतील काय? ते पाकिस्तानी लष्कराच्या खरेदी-विक्रीच्या किंवा उद्योगधंद्यांच्या हितसंबंधांबद्दल जाब विचारतील काय? इम्रान खान भारताबरोबर मित्रत्वपूर्ण संबध ठेवणे पसंत करतील काय व असे करून लष्करी शक्तीला अस्वस्थ करू पाहतील काय? पाकिस्तानी लष्कराला भारताबरोबर नेहमी संघर्ष हवाच असतो कारण तरच त्यांचा जनमानसावरचा रुबाब, त्यांचे मानाचे अस्तित्व टिकून राहाते व त्याद्वारे अंदाजपत्रकात लष्करासाठी मोठमोट्या रकमा राखून घेणे शक्य होते.

भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना एका पत्राद्वारे शांतता स्थापन करण्यासाठी संवाद सुरू करण्याबद्दल लिहिले आहे असे उपलब्ध वृत्तांतावरून समजते. याला इम्रान खान सकारात्मक प्रतिक्रिया पाठवतील काय? भारताबाबतच्या विषयांवर इम्रान खान लष्कराला न विचारता स्वतंत्र निर्णय घेतील काय?

एके काळी लष्करी हुकुमशाहीविरुद्ध बोलणार्‍या इम्रान खान यांनी गेल्या कैक वर्षात पाकिस्तानी लष्कराच्या राजकारणातील ’पसरलेल्या’ पाऊलखुणांविरुद्ध (लुडबुडीविरुद्ध), आतंकवादाला उत्तेजन देण्याविरुद्ध किंवा आपल्या मालकीच्या उद्योगधंद्यापायी केलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या नुकसानीविरुद्ध कधीही आवाज उठविलेला नाहीं, देशाला उद्देशून केलेल्या आपल्या पहिल्यावहिल्या जाहीर भाषणात इम्रान खान यांनी काटकसरीबद्दल व जबाबदारी स्वीकारण्याबद्दल विस्ताराने बोलण्याचा पर्याय निवडला असला तरी त्यातही त्यांनी एकदाही पाकिस्तानी लष्कराच्या पाकिस्तानी वित्तीय अंदाजपत्रकाचा मोठा हिस्सा वापररण्याविरुद्ध चकार शब्दही काढला नाहीं. या उधळपट्टीबद्दल किंवा त्यांच्या अन्य चुकांबद्दल लष्कराला आजपर्यंत एकदाही जबाबदार धरण्यात आलेले नाहीं.

आणि हेच जर भविष्यकाळातील घटनांचे द्योतक असेल तर इम्रान खान कधीही आपल्या पुरस्कर्त्याला आव्हान देणार नाहींत व या दोघांतील प्रेम प्रकरण असेच अवैधपणे चालू राहील अशीच चिन्हे सध्या दिसत आहेत.

इम्रान खान यांची प्रसारमाध्यमांमध्ये जी सकारात्मक प्रतिमा आहे ती लष्कराच्या सहकार्याने ’जोपासणे’ असेच चालू राहील आणि त्यांनी जनतेला आश्वासनाद्वारे दिलेल्या कुठल्याही सुधारणा जरी केल्या नाहींत तरीही त्यांनी पाकिस्तानात बदल घडवून आणल्याचा दावा अतिशयोक्तीचा आधार घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे सगळ्यांच्या गळी उतरविला जाईल. हे गेल्या निवडणुकीच्या सुरुवातीलाही घडलेलेच आहे.

लष्कर इम्रान खान यांना कोंडीत पकडू पाहील?
या आधी मिळालेल्या सत्तेपायी किंवा सत्ता असल्याच्या खोट्या जाणीवेपायी लष्कराच्या अनेक पित्त्यांना पाकिस्तानी लष्कराला आव्हान देण्याला भाग पाडले आहे. आणि कागदोपत्री इम्रान खान पाकिस्तानचा सर्वेसर्वा असल्यामुळे भविष्यकाळात त्याला आपण खरोखर सर्वेसर्वा आहोत असे वाटूही लागेल.

पण पाकिस्तानी लष्कराने नेहमीच मुलकी सरकारांना जाणीव करून दिली आहे कीं त्यांनी जर लष्कराबाबत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या चुकीच्या परराष्ट्रसंबंधांबाबत व संरक्षणक्षेत्रासंबंधात तोंड उघडले तर या गोष्टी त्यांच्या ’स्वातंत्र्याच्या कक्षे’बाहेर आहेत व त्यांनी या गोष्टींवर भाष्य करू नये अशी जाणीव त्यांना लागलीच करून दिली जाते!

म्हणून जेंव्हां इम्रान खान आपले पंख पसरवायचे ठरवतील व पाकिस्तानी लष्कराने त्यांना आखून दिलेल्या लक्ष्मणरेषेपलीकडे पाऊल टाकू पहातील तेंव्हांच ते किती शक्तिशाली पंतप्रधान आहेत याची चांचणी होईल.

आणि जेंव्हां प्रसारमाध्यमांत अचानकपणे इम्रान खान यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल बातम्या येऊ लागतील तेंव्हां समजावयाचे इम्रान खान यांचा लष्कराबरोबरचा मधुचंद्र आटोपला आहे.

राजकीय नेत्यांच्या हातून घडलेल्या किंवा त्यांनी केलेल्या प्रमादांवर लष्कराचे बारीक व पूर्ण लक्ष असते व गरजेनुसारा त्या चुकांचा उपयोग करून व त्या उघडकीस आणून मुलकी सरकारला नमविण्याची क्लृप्ती ते वापरतातच. एकाएकी पाकिस्तानी जनतेला न्यायसंस्थेला इम्रान खान यांच्याविरुद्ध कार्यान्वित केल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे दिसून येऊ लागेल. आणि मग शेवटी त्यांचाही शेवट या आधी लष्कराला आव्हान दिलेल्या मुलकी नेत्यांप्रमाणेच होईल-म्हणजेच त्यांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांना पदच्युत करून घरी पाठविले जाईल!

(“Can Pakistan PM Imran Khan Keep Promises With Army Watching Over?” या मूळ लेखाचे लेखक ताहा सिद्दिकी हे एक पाकिस्तानी अन्वेषक पत्रकार असून सध्या पॅरिस येथे राजकीय आश्रयाखाली रहात आहेत. १० जाने. १८ रोजी लंडनला जाण्यासाठी विमानतळावर जात असताना त्यांचे (बहुदा पाकिस्तानी लष्कराकडून) अपहरण करण्यात आले होते पण ते अयशस्वी झाल्यामुळे ते घरी परत आले व १३ फेब्रू.१८ रोजी पॅरिसला निघून गेले. त्या आधी त्यावेळी सत्तेवर असलेल्या मुलकी सरकारने त्यांना लष्कराची माफी मागण्याचा सल्ला दिला होता पण तो न मानता त्यांनी देश सोडण्याचा पर्याय स्वीकारला. त्यांचा ’गुन्हा’ हाच होता कीं ते पाकिस्तानी लष्करावर टीका करत व म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला होता.

त्यांचे लिखाण न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, फ्रान्स२४ सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांसह पाकिस्तानी व भारतीय आलेले आहे. स्वत:ला आलेल्या यातनादायक अनुभवापोटी त्यांनी ३ मे २०१८ रोजी (जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्यदिन)च्या दिवशी खास दक्षिण आशियासाठी SAFENEWSROOMS.org या संस्थळाची स्थापना केली आहे. ते @TahaSSiddiqui या नांवाने ट्विटरवर लिहितात.)

टिपा:
[१] भारतापेक्षा वेगळी अशी स्थिती जी माझ्या लक्षात आली ती इतर वाचकांच्याही लक्षात आलीच असेल. आपल्याकडे निवडणुकांचे निकाल जेंव्हां ’त्रिशंकू’ स्थितीत लागतात त्यावेळी जो पक्ष सर्वात जास्त जागा मिळवितो त्याला पूर्ण बहुमत प्रस्थापित करण्यासाठी ठरावीक वेळ दिला जातो व त्या काळात जर या पक्षाला बहुमत प्रस्थापित करता आले नाहीं तर इतर पक्षांना संधी दिली जाते. चरणसिंग यांच्यापासून चंद्रशेखर, विश्वनाथ प्रताप सिंग, देवेगौडा, गुजराल यांची डळमळीत सरकारे आपल्याला माहीत आहेतच. सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे अटल-जींचे १३ दिवसांचे व ११ महिन्यांचे सरकार. थोडक्यात काय कीं मतमोजणीनंतर जर त्रिशंकू अवस्था दिसत असेल तर कुणीही ’मी सरकार स्थापेन’ असे छातीठोकपणे सांगून अभिभाषण देत नाहीं. पण इम्रान खान यांना आजपर्यंत कधीही निर्णायक बहुमत मिळालेले नसूनसुद्धा त्यांनी “मी पंतप्रधान होणार” अशी जी घोषणा लगेच केली त्यामागे पाकिस्तानी लष्कराचा त्यांना असलेला पाठिंबा होता हेच एकमेव कारण असण्याची दाट शक्यता दिसलीच होती!

[२] पाकिस्तानमधील हत्या करण्यात आलेल्या राष्ट्राध्यक्षांची/पंतप्रधानांची नांवे http://www.letsstartthinking.org/Pakistan/assassinations-in-pakistan.php या दुव्यावर मिळतील.

पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान नवाबजादा लियाकत अली खान यांची १५ ऑक्टोबर १९५१ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

लोकांवर जबरदस्त छाप पाडणार्‍या व सर्वात जास्त लोकप्रिय नेत्यांपैकी एक असलेल्या झुल्फिकार अली भुत्तो यांना न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेनुसार ४ एप्रिल १९८१ रोजी फाशी देण्यात आले, पण हा खटला खूपच विवादग्रस्त व राजकीय हेतूंनी प्रेरित समजला जातो.

ज. झिया उल हक या लष्करशहाचा व पुढे राष्ट्राध्यक्ष झालेल्या नेत्याचा एका रहस्यमय विमान अपघातात अनेक इतर लष्करी अधिकार्‍यांसह मृत्यू झाला. आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यावरून तो अपघात होता असे वाटत नाहीं. अफगाणिस्तानच्या युद्धातील रशियावरील विजयानंतर त्यांची उपयुक्तता सरल्यानंतर व सत्तेचे नवे समीकरण प्रस्थापित करण्यासाठी कदाचित् त्यांचा हेतुत: वध करण्यात आला असावा असा सार्वत्रिक समज आहे.

दोन वेळा पंतप्रधानपद भूषविलेल्या बेनझीर भुत्तो यांचा २७ डिसेंबर २००७ रोजी त्या २००८च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारसभेनंतर परत येत असताना गोळ्या घालून वध करण्यात आला. त्यांच्या वधाबद्दलही अनेक रहस्ये अद्याप उजेडात आलेली नाहींत.

याखेरीज बलोचिस्तानचे मुख्यमंत्री व जनजातीचे नेते (tribal leader) असलेल्या नवाब अकबर खान बुगटी यांना एका लष्करी मोहिमेत २६ ऑगस्ट २००६ रोजी ठार मारण्यात आले होते.