अनुभव सातासमुद्रापारचे... : भारत आणि बेल्जियम...

maya deshpande
maya deshpande

बेल्जियममधल्या कोरोना संबंधित बातम्या लिहायचं टाळत होते कारण त्या फार भिववणाऱ्या आहेत. पण अनेकांनी उत्सुकता दाखवली म्हणून आज थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करते. मी जे काही लिहीत आहे त्यावरून भारत आणि बेल्जियम अशी तुलना करू नये. भौगोलिक परिस्थितीपासून लोकसंख्येपर्यंत कोणतीच गोष्ट समान नसताना ती तुलना योग्य ठरणार नाही.

दुसरं म्हणजे मी जे लिहितेय ते माझ्या लॉकडाऊनच्या काळातल्या घराबाहेरच्या मर्यादित वावरातून आणि इथली बातम्या देणारी माध्यमं जे चित्र दाखवताहेत त्या अनुभवावर आधारित आहे. डच भाषा येत असली तरी राजकारणातले इथले अंडरकरंट्स मला समजत नाहीत त्यामुळे इंग्रजी आणि डच मीडियात जे येतंय त्यातून समजलेल्या या गोष्टी.
शेवटचं, मी कोणी एक्स्पर्ट नाही तर लॉकडाऊन मध्ये अडकलेली, इथे परदेशी नागरिक असलेली सामान्य गृहिणी आहे. त्यामुळे या लेखनाकडे त्याच दृष्टीने बघितले जावे.

फेब्रुवारीमध्ये भारतात घरी गेले होते. तिथून परत आले 7 मार्चला. प्रवासात रिकामं असलेलं झुरीक आणि ब्रुसेल्सचं विमानतळ बघून काहीतरी भयंकर पुढे वाढून ठेवलं आहे याची कल्पना आली होती. त्या दिवशी स्विस मध्ये कोरोना संसर्ग झालेल्या 5 केसेस सापडल्या होत्या आणि बेल्जियम मध्ये 3 !

घरी आल्यावर नॉर्मल रूटीन सुरू झालं. दोन दिवसांनी ग्रोसरीला गेले तर तिथेही वर वर सगळं नेहमीसारखं दिसत होतं. इथं आल्यापासून कोणा स्थानिक मित्र मैत्रिणीशी बोलणं झालं नव्हतं आणि बातम्याही बघितल्या नव्हत्या. जरा वेळाने वातावरणात एक ताण जाणवू लागला.
सगळ्या लोकांच्या शॉपिंग कार्ट मध्ये नेहमीपेक्षा प्रचंड जास्त सामान दिसत होतं.
सॅनिटायजर्स, टॉयलेट पेपर, फ्रोजन सेक्शन, पास्ता आणि बटाटा खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं.
माझ्याकडून पैसे घेतल्यावर ग्रोसरने सॅनिटायझर लावून हात स्वच्छ केले.
येताना वाटेत नेहमी भेटणारे आजी-आजोबा कुत्र्याला फिरवताना भेटले. त्यांनी नेहमीप्रमाणे हात हातात न घेता शक्य तेवढ्या दूर उभं राहून आम्ही दोघी कशा आहोत, प्रवास कसा झाला वगैरे विचारलं. कुत्र्याला हात लावू दिला नाही. ते जरा विचित्रच वाटलं.
आमच्या लेकीचे खूप लाड करणारे शेजारी एवढ्या दिवसांनी भेटत असूनही लांबून बोलून गेले. आणि माझी तब्येत कशी आहे असा प्रश्न विचारला !

इथे कोणाकडे वळून बघणं नॉर्मल नाही. पण आज एका खोकत असलेल्या माणसाला लोक वळून-वळून बघत होते.

दुसऱ्या दिवशी गावातच 3 केसेस सापडल्याची बातमी आली आणि हा वणवा वेगात पेटत गेला. जेमतेम एक लाख लोकसंख्या असलेल्या आमच्या गावात खूप भीती आणि चिंता पसरली. 12 तारखेला बेल्जियन सरकारकडून लॉक डाऊनची कल्पना देण्यात आली. त्यात काय बंद होणार, काय उघडं राहणार, कोणी घरून काम करायचं आहे, कोणी कामावर ऑफिसमध्ये जायचं आहे हे सांगितलं गेलं. फिजिकल डिस्टनसिंगचे नियम स्पष्ट केले गेले. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर वावरताना कोणते नियम पाळायचे आहेत ते मोडले तर काय शिक्षा असणार आहे याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या.

युरोपियन युनियन झाल्यापासून पहिल्यांदा अंतर्गत देशांच्या सीमा सील करण्यात आल्या. परदेशातून नुकताच प्रवास करून आलेल्या लोकांना 14 दिवस घरातच रहाण्याची सूचना दिली गेली.

15 तारखेला लॉकडाऊन सुरू. गावातले सगळे रस्ते ओस पडले. आमचं घर एका कालव्याच्या काठावर आहे. तिथला रस्ता चालणाऱ्या लोकांसाठी खुला होता. पण रोज कालव्यातून होणारी बोटींची ये-जा खूप कमी झाली. एकेकटे नाविक तर बंदच झाले. समोरच्या काठावरून दिवसातून 6 वेळा जाणारी बस आता तीन वेळाच दिसू लागली. लोकांनी एकत्र गर्दी करू नये म्हणून पोलिसांची गस्त सुरू झाली.

ग्रोसरी स्टोअर्समध्ये जेष्ठ नागरिक, विशेष गरजा असलेले आणि फ्रंट लाईनर्स (वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, ग्रोसरी स्टोअर्स, स्वच्छता कर्मचारी, बँक पोस्ट यात काम करणारे आणि शाळेत काम करणारे) यांच्यासाठी वेगळी वेळ, वेगळी रांग ठरवून दिली. एका दुकानात जागेच्या प्रमाणात एका वेळी किती लोक जाऊ शकतात हे ठरवलं आणि जास्तीत जास्त 30 मिनिटे ही मर्यादा सूचना म्हणून दुकानाबाहेर लिहिली गेली. शॉपिंग कार्ट स्वच्छ करायला एक कर्मचारी नेमून प्रत्येक कार्ट स्वच्छ होऊनच ग्राहकाच्या हातात जाईल ही काळजी घेतली.

एवढं असूनही कुठेही गर्दी गडबड दिसली नाही. पण लोक मात्र पॅनिक होऊन साठेबाजी करतच होतेच. दुकानांमध्ये नेहमी खचाखच भरून असलेलं सामान भराभर संपत होतं. मग सगळ्यांना सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळतील, कोणतीही टंचाई भासणार नाही, असं सरकारने सांगितल्यावर 8 दिवसांनी कमी झालं !

पुढचे दिवस रोज सकाळी कोरोना केसेस वाढल्याच्या बातम्या बघायच्या आणि कामाला लागायचं असं रूटीन झालं. इथे जेष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येत जास्त आहे. त्यातही एकटे राहणारे लोक खूप. एक दिवस एक पत्रक टपालात आलं. आमच्या मेयरने लिहिलेलं पत्र होतं ते. त्यात या संकटात आपण सगळे सोबत आहोत, असे लिहून धीर देणारे चार शब्द होते. एकट्या राहणाऱ्या वृद्ध लोकांसाठी गप्पा मारायला, मन मोकळं करायला हेल्पलाईन सुरू केली असं कळलं. लहान मुलांना यासंदर्भात जे प्रश्न पडतील त्यांना उत्तरं द्यायला वेगळी हेल्पलाईन केली. तुम्ही कोणत्या प्रकारची मदत कुठे करू शकाल त्याची माहिती दिली होती. ज्यांना घराबाहेर जाणं शक्य नाही त्यांना घरपोच अन्न देणारी संस्था कामाला लागली त्यांचे नंबर्स होते.

एकूणच देशभरात स्थलांतरित, होमलेस आणि राजकीय शरणार्थी यांच्यासाठी वेगळी सोय केली होती. त्यांच्यासाठी काही ngo मदत गोळा करत आहेत. व्यायाम म्हणून चालणं पळायला जाणं, कुत्रे फिरवणे याला परवानगी आहे. सायकलिंग पण चालू आहे. फ्रंट लाइनर्स च्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी शाळांनी घेतली आहे. फक्त यांची मुलं शाळेत जातात आणि दिवसभर तिथेच थांबतात. बाकीच्या मुलांची ऑनलाईन शाळा सुरू झाली. विद्यापिठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 महिन्यांचं भाडं माफ केलं. बाहेरच्या देशात अडकलेल्या बेल्जियन नागरिकांना आणायची प्रोसेस सुरू झाली. आणि रोज संध्याकाळी 8 वाजता आपल्या दारात येऊन फ्रंट लाइनर्ससाठी प्रोत्साहन, कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवण्याची विनंती केली होती. जे एक दिवसही खंड न पडता आजही सुरू आहे. दिवसभरात घरचे सोडून इतर माणसं दिसण्याची, एकमेकांना अभिवादन करून एकत्र टाळ्या वाजवण्याची ही 5 मिनिटांची कृती लोकांचं मनोधैर्य नक्कीच उंचावते आहे. इथे चर्चचा पगडा आहे. त्यांनी प्रार्थना म्हणून घरासमोर पांढरी कापडं लावा, असं सांगितल्याने कधी नव्हे ते घरासमोर पांढऱ्या चादरी, टॉवेल, पडदे लटकवलेले दिसताहेत. मुलांसाठी त्यांना ताण येऊ नये म्हणून नव्या नव्या गोष्टी केल्या जात आहेत.

या सगळ्यात काहीच वाईट घडत नव्हतं असं नाही. सगळ्यात वाईट होतं वैद्यकीय उपचारासाठी जागा आणि साधनं कमी असणं. कोणतीही फ्लू सदृश लक्षणे दिसली की फॅमिली डॉक्टराना फोन करायचा. ते म्हणाले तर टेस्टला जायचं नाहीतर घरीच थांबायचं. कोरोना पोजिटिव्ह रिपोर्ट्स आले पण अगदी अत्यवस्थ नसाल तरी घरीच ताप आणि खोकला यावरची औषधे घेत स्वतःला विलग करून रहायचं. अगदीच अस्वस्थ वाटत असेल म्हणजे श्वासच घेता येत नसेल तर आणि तरच दवाखान्यात या अन्यथा घरीच वेगळे रहा अशा सूचना होत्या. त्या आधी डॉक्टर फोनवरून बोलत होते.
टेस्ट करण्यासाठी नेमके काय निकष आहेत हे सर्वसामान्य लोकांना माहीतच नव्हतं. केअर सेंटरमध्ये राहणाऱ्या वृद्धांना भेटायची परवानगी नाकारावी लागत होती कारण कोरोना संसर्ग त्यांना व्हायची भीती!
गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या अंगावर थुंकणे, चोऱ्या करणे, 300 लोक जमवून लॉकडाऊन पार्ट्या करणे, पोलिसांची वाहनं जाळणे,तोडफोड हे सगळं कुठे कुठे चालूच आहे. लोकांनी पार्कमध्ये जमून खेळायला सुरुवात केली. ते ऐकेनात तेव्हा पार्क बंद केले. शेतकऱ्यांचं, उद्योगजगताचं आणि पर्यटन क्षेत्राचं नुकसान हे प्रचंड फ्रस्ट्रेट करणारं आहे. असं सगळं काळं पांढरं चालू आहे.

आता मात्र केसेस आटोक्यात आल्यात. एकूण 50781 लोक कोरोना पोजिटिव्ह, 8415 लोक मृत्युमुखी पडले, ऍडमिट होऊन ट्रीटमेंट घेऊन (?) बरे झाले 12980 लोक ! ट्रीटमेंट न घेता आपोआपच बरे झाल्याच्या केसेसही अनेक आहेत. या आजारावर औषध नाही आणि डॉक्टर म्हणजे देव नाही हे इथे सहज स्वीकारलेले सत्य आहे.
 
4 मार्चपासून लोकडाऊन उठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात आधी घर दुरुस्ती, शेती बांधकाम यासाठी लागणाऱ्या साधनांची दुकानं उघडली. आता लॉक डाऊन उठवण्याच्या दुसऱ्या टप्प्यात काय होणार ते आज कळलं आहे. त्यानुसार सोमवारी बाकी सगळी दुकानं उघडतील. रांगेचे नियम जशास तसे राहतील. मास्क अनिवार्य ! रेस्टॉरंट, कॅफे, बार आणि स्पोर्टक्लब उघडणार नाहीत. आठवडे बाजार बंदच राहील. कोणतेही मोठे समारंभ होणार नाहीत. सार्वजनिक वाहनातून जाताना मास्क अनिवार्य असेल. ते मास्क रेल्वे स्टेशनवर वेंडिंग मशीन मधून मिळताहेत व एका मास्क ची किंमत 15 युरो एवढी जास्त आहे! हा मास्क 500 वेळा वापरता येईल, असे म्हणतात. स्वस्त दरातल्या पुनर्वापर करता येणाऱ्या मास्कची लोक वाट बघत आहेत.

घरासमोर कालव्यात होड्या पुन्हा दिसू लागल्यात.
फिरायला येणाऱ्या लोकांमध्ये उत्साह दिसतोय.
सायकलिंग करणारे लोक जास्त दिसत आहेत.
काल पार्क पण उघडे होते आणि विशेष गर्दी नव्हती.

आम्हाला ब्रुसेल्स किंवा अँटवर्पवरून भारतीय किराणा मागवावा लागतो. गेले दोन महिने ते आणून देणारा दुकानदार येत्या रविवारी येऊ शकणार आहे.
प्राथमिक शाळा आता थेट सप्टेंबर मध्ये उघडणार आहेत. अजूनही शक्य त्या लोकांनी घरी बसूनच काम करायचं आहे. आम्ही राहतो तिथे जवळपास भारतीय लोक जास्त नाहीत. दीड किलोमीटरवर राहणाऱ्या आमच्या मित्रांना भेटून दोन महिने होतील. आजच एका मैत्रिणीची हार्ट सर्जरी झाली. ती जवळच्या गावात एकटी राहते. तिच्या सोबत कोणी जाऊ शकलो नाही. कदाचित ती हॉस्पिटलमधून घरी आल्यावर पुढच्या आठवड्यात तिला मदत म्हणून जाता येईल.

सध्या एकाच कुटुंबातील 4 लोक दुसर्याकडे भेटायला जाऊ शकतात. पण त्यांनी घर ते घर प्रवास करावा इतर कुठेही जाऊ नये अशा सूचना आहेत. हे सगळं सांगून पंतप्रधान म्हणतात, "तुम्ही हे नियम पाळत आहात की नाही हे बघायला आम्ही येऊ शकणार नाहीत. पण तुमच्या विवेकबुद्धीवर आमचा (सरकारचा) विश्वास आहे!"
अशा प्रकारे आता आम्ही "नवीन नॉर्मल" जग उघडण्याची वाट बघत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com