esakal | भारत आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत केली दिवाळी साजरी
sakal

बोलून बातमी शोधा

भारत आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत केली दिवाळी साजरी

-आयर्लंडमध्ये दिवाळी धमाका
-बलीन बिझनेस स्कूलमध्ये दिवाळीचा लखलखाट
-औरंगाबादच्या प्रिया राजपूतचा पुढाकार 
-सांस्कृतिक कार्यक्रमांतून भारत दर्शन 

भारत आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत केली दिवाळी साजरी

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : आकाश कंदील, पणत्या, फराळ, रांगोळी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक रोषणाई म्हणजेच भारतातील दिवाळी. यंदा मात्र हीच दिवाळी आयर्लंडची राजधानी डबलीनमध्ये धूमधडाक्‍यात साजरी झाली. 

आयर्लंडमधील डबलीन बिझनेस स्कूलमध्ये, भारत आणि पाकिस्तानच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अगदी धमाकेदार आणि अस्सल भारतीय पद्धतीने बुधवारी (ता. सात) दिवाळी साजरी केली. तीन वर्षांपूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनी येथे देशी सोसायटीची स्थापना केली. पाकिस्तानची मेहक नजीम ही विद्यार्थिनी विद्यमान अध्यक्ष; तर औरंगाबादची प्रिया राजपूत उपाध्यक्ष आहे. त्यामुळेच यंदा ही दिवाळी अनोख्यापद्धतीने धूमधडाक्‍यात साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्याला डबलीन बिझनेस स्कूलनेही मंजुरी दिली. त्याचप्रमाणे खर्च म्हणून 200 युरोही दिल्याचे प्रियाने सांगितले.

असा झाला कार्यक्रम
सायंकाळी चार वाजता कार्यक्रमाची सुरवात गणेश वंदनेने झाली. विशेष म्हणजे गणेश वंदना नॉर्वे येथील ऍडम क्रोटर आणि सेजली मेडिलीन यांनी केली. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ यांसह भारतातील वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती व्यासपीठावर गाणे, नृत्य अथवा नाटकाच्या माध्यमातून दाखविण्यात आली. बंगळुरूच्या धन्या राय हिच्या लावणीला टाळ्यांच्या गडगडाटासह वन्स मोअरचा प्रतिसाद मिळाला.

डबलीन बिझनेस स्कूचा प्रतिसाद
दिवाळीच्या या कार्यक्रमाला देशी सोसायटीच्या सदस्यांसह डबलीन, अमेरिका, आफ्रिका आणि आयरीश येथील विद्यार्थी उपस्थित होते. डबलीन बिझनेस स्कूलच्या कर्मचारी आणि प्राध्यापकांनीही या दिवाळी फेस्टिव्हलचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या सर्वांत शेवटी उपस्थितांनी बॉलिवूडसह हिंदी, इंग्लिश आणि मराठी गाण्यांवर ठेका धरला. त्यानंतर सर्वांनी भारतीय पद्धतीचे जेवण केले. यासाठी सुमंत वरगले आणि ज्योतपाल सिंग यांनी परिश्रम घेतले.

डबलीन येथे भारत आणि पाकिस्तानातून आलेल्या विद्यार्थ्यांना ऐन सणासुदीच्या काळात होम सिकनेसचा त्रास होतो. त्यातून विरंगुळा म्हणून सर्वजण एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने सण साजरे करतात. त्यासाठी डबलीन बिझनेस स्कूलचेही मोठे सहकार्य मिळते. - प्रिया राजपूत, उपाध्यक्ष, देशी सोसायटी, डबलीन बिझनेस स्कूल