esakal | स्टॉकहोमचा 'बाप्पा'
sakal

बोलून बातमी शोधा

Stockholm Ganpati

स्टॉकहोमचा 'बाप्पा'

sakal_logo
By
ॐकार जोशी

मराठी मातीत वाढलेल्या, रुजलेल्या माणसासाठी "गणेश उत्सव‘ म्हणजे निव्वळ शब्दात व्यक्त न करता येणारा जिव्हाळ्याचा विषय ! लहानपणापासूनच गणपतीचे स्वागत, गावी जाण्यासाठी कितीही कष्ट झाले (विशेषतः कोकणात एसटीने जाणे) तरी तमा न बाळगणे, बाप्पाची आरास, मोदकांचा नैवेद्य आणि छोट्यांची त्यावर असलेली नजर, कुटुंब, शेजारी आणि मित्रगण ह्यांनी एकत्रितपणे टाळ्या-झांजांच्या गजरात केलेल्या बाप्पाच्या आरत्या, विसर्जनाच्या वेळी आबालवृद्धांचे जड झालेले मन (क्वचित, डोळेदेखील!) या सर्वच आठवणी म्हणजे एखाद्या नक्षीदार कुपीत असलेल्या अत्तरासारख्या. कुपी उघडावी आणि वातावरण सुगंधित व्हावे ! आता अशा या मराठी माणसाला तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी बाप्पाच्या आगमनाच्या चाहुलीनेच हुरूप येतो. परदेशात असला तरी मूर्ती मिळेल का, फुलांचे हार आणि इतर पूजेचे साहित्य कसे जमवायचे, विसर्जन कुठे करायचे, छोटे कुटुंब, सुट्ट्या जपून बाप्पाबरोबर राहायचे इत्यादी चिंतांनी त्याच्या उत्साहावर विरजण पडत नाहीच, उलट यातून मार्ग काढून जमेल तितका चांगला गणेश उत्सव झाला पाहिजे असा चंग तो बांधतो. थोडीफार अशीच कैफियत आहे स्वीडनमधल्या मराठी माणसाची, संख्येने खूप नाही पण तरीसुद्धा "आम्ही मराठी‘ या फेसबुक गटाच्या(group) झेंड्याखाली एकत्र झालेल्या अंदाजे तीनशेच्या समूहाची. त्यातल्या काही मंडळींनी एकत्र येऊन किमान एक दिवस सार्वजनिक गणपती बसवायचा असा संकल्प सोडला. दहा सप्टेंबरला गणेश उत्सवासाठी ठरविण्यात आला. 

अनेक आव्हाने समोर होती शहराच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेले सदस्य, योग्य सभागृहांची कमतरता आणि त्यांचे तासाच्या हिशेबाप्रमाणे शुल्क, किमान वर्गणी स्वीकारून त्यात काटेकोरपणे सर्व खर्च बसविणे इत्यादी. नुसतेच पूजन नव्हे तर काही सांस्कृतिक कार्यक्रम, घरच्यासारखे वातावरण आणि थोडा विरंगुळा अशीही उद्दिष्टे होतीच. सर्वात महत्वाचे होते ते म्हणजे मराठीजनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होणे. पण"विघ्नहर्ता‘आला की, पर्वता समान भासणाऱ्या समस्या ही लुप्त होतात तर या आव्हानांची कथा ती काय ! फक्त मराठीजन नाही तर इतर राज्यातील बांधवांकडून सुद्धा भरघोस प्रतिसाद लाभला, इतका की सरतेशेवटी जागा अपुरी पडू नये म्हणून नोंदणीस नम्रपणे नकार द्यावा लागला. सभागृहाच्या दालनासमोर रांगोळ्या, सुबक आणि सुटसुटीत आरास, मंद लयीतील गणेश भक्तीगीते अशा मंगल वातावरणात श्रींची स्थापना झाली. बहुतांश भाविक वेळेत उपस्थित होते. 
अनेकजण पहिल्यांदाच "आम्ही मराठी‘च्या समारंभास आले असल्याने त्यांचा परिचय करून घेण्यात आला. मग सर्वांनी एकमुखाने बाप्पाची आरती केली. साधारण भाविकांनी उत्सवास हजेरी लावली. स्वीडनमधल्या भारतीय दूतावासातर्फे कमल परवेज आणि सुप्रीत कौर यांची उपस्थिती सुध्दा उत्सवास लाभली. त्यांच्या स्वागत-मनोगत इत्यादी शिष्टाचारांनंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरवात झाली आणि पुढील सव्वा दोन तास आपण स्वीडनमध्ये आहोत की, आपल्या आळीतील गणेश मंडळाच्या कार्यक्रमात याचा उपस्थितांना विसर पडला ! चिमुरड्यांचे नाच आणि पियानो, गिटार वादन, मोठ्यांची नृत्ये, गायन आणि काव्य वाचन असा साग्रसंगीत कार्यक्रम झाला. अधुनमधून "गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया‘....ही घोषवाक्‍ये घुमत होती. काही उत्साही लहानग्यांनी मिळून सभागृहाच्या एका कोपऱ्यात "ओरीगॅमीची‘ एक छोटेखानी कार्यशाळा स्थापिली आणि त्यात बहुतेक लहान मुले दंग झाली होती. सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यावर सर्व छोट्या स्पर्धकांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. उपस्थित जनांचे आभार आणि "आम्ही मराठी‘च्या गणेश उत्सव कार्यकारी समितीची ओळख थोडक्‍यात करून सर्वांना महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेसाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
सभागृहाचे सुशोभीकरण, आसन-मांडणी, बाप्पासाठी आरास आणि मोदक, भोजन वाटप, संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन, छायाचित्रण आणि सभागृहाची स्वच्छता ही कार्ये समितीच्या आणि "आम्ही मराठी‘च्या इतर काही सदस्यांनी जोमाने पार पाडली. वाजता बाप्पा घरी परतल्यावर पसरते तशी शांतता सभागृहात पसरली. तर असा होता भाविकांसाठी एक दिवस आलेला आमचा स्टॉकहोमचा"बाप्पा‘ अर्चना प्रसाद टेंगळी, दिलीप पंडित,अविनाश डोंगरे,संदीप भावसार,मानसिंग भोर, निलेश बेळेकर, सचिन घार्गे, सचिन राव,समिर अत्तार, श्रद्धा बिराजदार - खंडागळे, प्रज्ञा पिंगळे,स्नेहा जोशी, ओंकार जोशी, वीरेंद्रकुमार घुटके यांच्या प्रेरणेने "आम्ही मराठीचा‘ उत्सवाचा सुफळ संपूर्ण झाला.