पुण्यातली सदाशिव पेठ

Gautam-Naik
Gautam-Naik

जेव्हा आपण अमेरिकेचा विचार करतो तेंव्हा डोळ्या समोर काय उभे राहते? तसे म्हणजे आपण अमेरिकेचा विचार किंवा अमेरिकन आचार केंव्हा करत नाही हा उपप्रश्ण.  इथे आचार म्हणजे लोणचं नाही. आचार म्हणजे अनुकरण. प्रत्येकाच्या आयुष्यात अमेरिका किंवा अमेरिकन गोष्टींचा प्रभाव हा असतोच  ते राहू द्या. अमेरिका म्हणजे  डोळ्यासमोर येतात ते  न्यूयॉर्क शहर, स्टॅचू ऑफ लिबर्टी, मॅनहॅटन, ग्रँड कॅन्यन, वेगास, गोल्डन गेट, बे एरिया, हॉलिवूड, लॉस अँजेलिस डिस्नेलॅण्ड. आपल्या कामा-व्यवसायाकरिता आणखी पुढे गेल्यास न्यू जर्सी, सिएटल, शिकागो, डेट्रॉईट, टेक्सास, फ्लोरिडा. आपण भटके विमुक्त असाल तर नायगारा, अलास्का, हवाई पर्यंत डॉलर उडवून स्वतः विमानाने उडता. तसे तर, आपण भारतीय खूप ठिकाणी पसरलो आहोत पण मला हाडे पसरायला जागा मिळाली ती अमेरिकेतील सदाशिव पेठ म्हणजे कनेक्टिकट राज्य. मी हाडाचा सदाशिवपेठी पुणेकर असल्यामुळे असेल कदाचित.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कनेक्टिकट राज्याला अमेरिकेत लँड ऑफ स्टेडी हॅबिट्स (land of steady habits) असे म्हणतात. म्हणजे ह्या राज्यात लोक सरळमार्गी नियम पाळणारी पापभिरू असतात. मुख्य म्हणजे राजकारणातील प्रचलित विचारसरणीचे पालन करणारी असतात. गुगल ट्रान्सलेट वापरून कन्झर्वेटिव्ह ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ मराठीत पुराणमतवादी असा होतो. पण ज्या सदाशिव पेठेनी इतके सुधारक, क्रांतिकारी, नवमतवादी दिले तिला पुराणमतवादी म्हणणे चुकीचे होईल. पुराणमतवादीच्या विरुद्ध म्हणजे पुरोगामी. सदाशिव पेठी लोकांना मी पुरोगामी कधीच म्हणणार नाही कारण सद्यपरिस्थितीत ती एक उपहास किंवा चेष्टा झाली आहे. एक मात्र, आहे की आपल्या मराठी विश्वात पुण्याला जे स्थान आहे ते इथे न्यू इंग्लंड भागाला आणि जे स्थान सदाशिवपेठेला आहे ते कनेक्टिकटला. शेक्सपिअर जरी म्हणाला नावात काय तरी प्रथम नावा कडे जाऊ.  बाकी नावे ठेवण्यात आपण पुणेकर अव्वल. पण, कनेक्टिकट के एक मूळ रेड इंडियन नाव आहे. कनेक्टिकट हे  नदी चे नाव आहे. ही अतिशय महत्वाची नदी आहे अगदी मुळा मुठे सारखी. ही नदी कॅनडामध्ये उगम पावते आणि  ह्याच राज्यात लॉन्ग आयलंड साऊंड ला समुद्रात मिळते.  Quinnehtukqut हे रेड इंडियन नाव ह्याचा अर्थ एका लांब भरती आलेली नदी असा आहे.

कनेक्टिकटच्या इतिहासात आणि पुण्याच्या इतिहासात बरेच साम्य आहे. पण, इतिहासाच्या तासाच्या आधी आपण चितळे मास्तरांप्रमाणे भूगोलात शिरू. त्यासाठी शाळेतल्या हरक्यूल्सला नकाशा आणायला  पाठवू . सध्या गूगल मॅप्स मुळे तेही करायची गरज नाही. कनेक्टिकट पुण्यातल्या सदाशिव पेठे  प्रमाणे मोक्या च्या ठिकाणी वसला आहे. न्यू यॉर्क न्यू जर्सी आणि कनेक्टिकट ह्या तीन राज्यांना ट्राय स्टेट म्हणतात . न्यू यॉर्क शहरच्या ईशान्येला आणि  बोस्टन शहरच्या साधारणपणे नैऋत्ये ला हे राज्य आहे.

पश्चिमेला अपस्टेट  न्यूयॉर्क, ईशान्य आणि उत्तरेस मॅसाच्युसेट, पूर्वेस ऱ्होड आयलंड आणि दक्षिणेस लॉन्ग आयलंड साउंड हा समुद्रचा पट्टा. क्षेत्रफळाने साधारणपणे पुणे जिल्ह्या एवढाच. हे आणि एक साम्य (5543 sq mtr). थोडा लहान. न्यू इंग्लंड म्हणजे मॅसाच्युसेट्स, मेन, ऱ्होड आयलंड, कनेक्टिकट, न्यू हॅम्पशायर आणि वेरमॉण्ट ही राज्ये. इथला उन्हाळा 'पूर्वीच्या' पुण्या प्रमाणे सौम्य असला तरी दमटपणा असतो हा फार निसर्ग सुंदर भाग आहे. फॉल म्हणजे गोठवणाऱ्या थंडी च्या आधी जेंव्हा हा हिरवा प्रदेश पानांचे  रंग बदलून (फॉल कलर्स ) पाने  झडतो तेव्हा ते रंग आणि आकाशाचे वेगळे रंग मिळून एक सुंदर चित्र तयार होते. त्यातून सुंदर टुमदार, आखीव रेखीव श्रीमंत गावे शहरे दिमाखदार दिसतात. मधून मधून छोट्या टेकड्या, तळी, जंगले, नद्या, पूल नयनरम्य दिसतात. त्यावेळी स्वर्ग म्हणजे म्हणतात तो हाच का असे वाटते. पण आपल्या  मावळमनाला पावसाळ्यातला रांगडा सह्याद्री आणि ढग जास्त सुंदर वाटतात हे नक्की.

आता इतिहासाचा तास. ज्यावेळी पुण्यात शिवाजी महाराज लाल महालात वाढत होते (१६३० ते ४०)त्याच सुमारास कनेक्टिकट वसले. सर्व प्रथम डच न्यू यॉर्क भागातून आले. नंतर  इंग्लंड  मधून आलेले पिलग्रिम्स आणि नंतर प्युरिटन्स न्यू इंग्लंड भागात  वसले. इथे पूर्वी ह्या इंडियन जमाती राहत होत्या. आता हे पिलग्रिम्स कोण आणि प्युरिटन्स कोण ह्याची उत्तरे इंग्लंड च्या इतिहासात मिळतील. तो वेगळे विषय पण थोडक्यात पिलग्रिम्स हे नव्या संधी किंवा नव्या आयुष्या करिता इंग्लंड मधून न्यू इंग्लंड म्हणजे अमेरिकेत आले. प्युरिटन्स हे समाजातील विस्कटलेली घडी बसवण्याकरिता थोडे उशिरा  आले . ते थोडे सधन किंवा ज्याला नवमाध्यम वर्ग म्हणता येईल अशे होते. इंग्लिश समाज ह्रास पावत आहे असे त्यांना वाटत असे. सदाशिव पेठ पण कर्मचाऱ्यांचे आयुष्य सुरळीत करण्याकरिता वसली. प्रथम न्यू इंग्लंड च्या बोस्टन भागात प्युरिटन्स वसले आणि मग १६३० नंतर हार्टफर्ड आणि न्यू हेवन कॉलनी स्थापन केल्या. बराच काळ म्हणजे अमेरिकन स्वातंत्य्रनंतर ह्या दोन्ही राज्याच्या संयुक्त राजधान्या होत्या. १८१४ साली हार्टफर्ड एकमेव राजधानी झाली. न्यू हेवन, मिडिलटाउन, वॉटरबरी, स्टॅमफर्ड, ब्रिजेफोर्ड, न्यू लंडन ही प्रमुख शहरे. न्यूयॉर्क जवळील फेअर फिल्ड काउंटी आणि त्यातले ग्रीनिच गाव हे सगळ्या उच्चभ्रू लोकांचे निवासस्थान. मॅनहॅटन मध्ये काम करणारे फायनान्स बँकिंग क्षेत्राततील दिग्गज इथे राहतात. दुसय्रा महायुद्धा नंतर आणि कोल्ड वॉर संपण्याच्या काळात हे राज्य न्यूक्लीअर   एनर्जी , सबमरीन , हेलिकॉफ्टर , ह्या सर्व क्षेत्रात आघडीचे होते. ह्या राज्याने  जगाला पहिल्यांदा टाईपरायटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, कुत्रिम हृदय , फ्रिसबी, डिक्शनरी , शिवणयंत्र, हेलिकॉफ्टर, सबमरीन  ह्या गोष्टी दिल्या . कोल्ड वॉर नंतर हे उद्योग बंद पडले. फायनान्स आणि इन्शुरन्स मात्र अजूनही जोरात आहेत. हार्टफर्ड हि इन्शुरन्स ची जागतिक राजधानी. सगळ्यात जास्त टॅक्स रेट  असेलेले राज्य झाले. पश्चिम गोलार्धातीळ सगळ्यात मोठे कॅसिनो इथे उभे राहिले .

कनेक्टिकट ला नटमेग स्टेट म्हणले जाते. ह्याचे कारण म्हणजे इथे जे पहिल्यांदा स्थायिक झाले त्यांची खूप हुशार आणि चतुर होती की लाकडांपासून बनवलेला जायफळ देखील ते दुसऱ्याला खपवू शकतात अशी त्यांची ख्याती होती. आपल्याकडे सदाशिव पेठ मधील लोकांना हेच म्हणतात. कनेक्टिकट ला कॉन्स्टिट्यूशन स्टेट म्हणजे संविधान राज्य असे पण म्हणले जाते. अमेरिकेतली सर्व प्रथम राहण्याची नयमावली म्हणजे ऑर्डर ऑफ स्टेट १६३८ च्या सुमारास इथल्या वसाहतींमध्ये लागू झाले. नियम बनवणाऱ्यात सदाशिव पेठी आणि पुणेकर कायमच पहिले असतात. आमच्या पाट्या बघा. शिक्षणात अग्रगण्य असणे हे पुण्याचे आणि न्यू इंग्लंडचे साम्यच. हार्वर्ड, एमआयटी, येल ह्या युनिव्व्हर्सिट्या इथल्याच. १७०५ साली जेंव्हा पेठ वसल्या त्यावेळी इथे येल सुरु झाले. पुण्याप्रमाणे इथेही खाद्य संस्कृतीत आहे. लॉबस्टर रोल आणि बर्गर अक्ख्या अमेरिकेत पहिल्यांदा इथेच बनवला आणि खाल्ला गेला. न्यू हेवनचा पिझ्झा चांगला की न्यूयॉर्कचा ह्याबाबत अनेक वाद आहेत. रोजच्या समाजात रूढी आणि परंपरा यांना पुण्यात जेवढे महत्व आहे तेवढे इथे कनेक्टिकट मध्ये. आमचे गाव म्हंजे रॉकी हिल हे त्यातील अर्क आहे. सर्व लोक एकमेकांना ओळखतात. कुटुंब, टाउन हॉल, लायब्ररी, कम्युनिटी याला फार महत्व आहे. अगदी आपल्या सदाशिव पेठे सारखे. सुनीताबाईंनी क्षमा मागून म्हणतो आहे मनोहारी तरी पुण्याची सर नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com