esakal | पहिल्या भेटीत; अमेरिकेच्या प्रेमात... 

बोलून बातमी शोधा

hemant-kulkarni
पहिल्या भेटीत; अमेरिकेच्या प्रेमात... 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सहावी-सातवीत असताना आम्ही सांगलीतील गावभागातून विश्रामबागला राहायला गेलो. वडिलांनी गुंठेवारीत घर बांधलं. त्यासाठी सावकारी कर्ज घेतलं. तिथे त्याकाळी वीज कनेक्‍शनही मिळालं नाही. त्यामुळे आम्हा तीन भावंडांना चार पाच वर्षे रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करावा लागला. शिकायचं या ठाम निर्धाराने आम्ही तिघेही इंजिनिअर झालो. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडलो तेव्हाही जग खुलं आहे असं वाटलं नव्हतं. मात्र मुंबई गाठली आणि जगाचे दरवाजे खुले झाले. आता नोकरी आणि व्यवसाय असं दोन्ही करीत अमेरिकेत स्थायिक झालेले हेमंत कुलकर्णी सांगताहेत अमेरिकेतील आपल्या अनुभवाबद्दल.... 
 

वालचंद म्हणून बाहेर पडलो. सांगलीत फारसा स्कोप नसल्यानं बाहेर पडलो. तेव्हा पुण्याचं मोठं आकर्षण होतं. साधारण एक-दीड वर्षातच लक्षात आलं की मुंबई शिवाय पर्याय नाही. मुंबईबद्दल भीती होती. टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेसमध्ये नोकरी मिळाली आणि माझा जगाचा प्रवास सुरू झाला. अमेरिका आणि जपानला भेटी दिल्या. पहिल्याच भेटीतच अमेरिकेची भुरळ पडली. तेव्हाच ठरवलं की कायमचं अमेरिकेला यायचं... 

सन 1996 जूनमध्ये "वर्क परमिट' घेऊन अमेरिकेला आलो आणि आता इथंच स्थायिक झालो. कामासाठी अमेरिकन कंपनीकडून मी आजवर इंग्लंड, चीन, जपान आणि भारतातसुद्धा जात असतो. अमेरिका आणि भारतामध्ये मला खूप साम्य वाटते.. एक अतिशय जुनी लोकशाही आणि भारत सर्वात मोठी लोकशाही. भारत माझी जन्मभूमी आणि अमेरिका कर्मभूमी. 

अमेरिकेत सर्वजण एकमेकांना अतिशय आदराने वागवतात. नियम आणि कायदे अतिशय कटाक्षाने पाळले जातात. कोणतेही काम असो त्याला सारखंच महत्त्व आहे. अमेरिकेमध्ये स्वतःचा व्यवसाय करणे अतिशय सोपं आहे. रोजच्या जीवनामध्ये सामान्य माणसाला फारशा अडचणी येत नाहीत. जपान आणि इंग्लंडमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. परंतु या सर्व देशांमध्ये मूलभूत आरोग्य सेवा अतिशय महाग आहे. त्यामानाने भारतात ती सहज आणि स्वस्त आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षण प्रगत देशांमध्ये भारतापेक्षा महाग आहे. 

अमेरिकेत भारतीय लोक सचोटी, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप यश मिळवत आहेत. सध्या मी सेपीएंट या कंपनीत नोकरीत आहे आणि डिजिटल टेक्‍नॉलॉजी क्षेत्रामध्ये माझे काम आहे. माझी पत्नी राधिका सांगली-कोल्हापूरची आहे. दोघांचा पूर्ण वेळ नोकरीशिवाय, आमचा एक छोटासा व्यवसाय आहे. पार्सीप्पानी, न्यू जर्सी शहरात आम्ही एक शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास केंद्र चालवतो. त्याचे नाव " AgradeAhead " ( " http://agradeahead.com/parsippany/ " ) , इथं बालवाडीपासून ते बारावीपर्यंत मुलं शाळेव्यतिरिक्त जास्तीचं काही तरी शिकायला येतात. आमच्या भागातील खूप मुले या केंद्राचा फायदा घेतात. मला या क्षेत्रात खूप काही करायचे आहे. हे सारे संकल्प कसे पूर्ण होतात हे बघुया.... 

(शब्दांकन - बलराज पवार)