esakal | लष्कराच्या मदतीने इम्रान खान यांनी निवडणूक कशी जिंकली?
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan

मूळ लेखक: श्री. ताहा सिद्दीकी 
मराठी अनुवाद: सुधीरकाळे (sbkay@hotmail.com)
हा लेख ’क्विंट’वर दि. जुलै २६, २०१८ रोजी प्रसिद्ध झाला होता.

लष्कराच्या मदतीने इम्रान खान यांनी निवडणूक कशी जिंकली?

sakal_logo
By
सुधीर काळे

क्रिकेटचे नामवंत खेळाडू असलेले व आता राजकारणात उतरलेले नवनिर्वाचित खासदार इम्रान खान यांनी नुकतीच पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली[१].पाकिस्तानी निवडणूक आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रथम अहवालांनुसार इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (PTI) (म्हणजेच पाकिस्तान(ची) न्यायासाठीची चळवळ) या पक्षाला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. 
पण तरीही PTI ला इतर छोट्या राजकीय पक्षांचे समर्थन घ्यावे लागेल; कारण आतापर्यंत आलेल्या वृत्तांनुसार इम्रान खान यांच्या पक्षाला स्वबळावर सरकार बनविण्यासाठी आवश्यक असे निर्णायक बहुमत मिळालेले नाहीं.

पण इम्रान खान यांच्या विजयाला“मतपेट्यांत पडलेल्या मतांच्या संख्येवर जिंकलेला विजय”असे म्हणणे तितके सोपे नाहीं. मतदानानंतर केल्या गेलेल्या हेराफेरीबद्दल सगळीकडूनच त्यांच्यावर आरोप होत आहेत. पाकिस्तानातील जवळ-जवळ प्रत्येक पक्ष या निकालांकडे संशयी नजरेने पहात आहे. अंतिम निकाल जाहीर करण्यामधील झालेला विलंब हेच त्याचे मुख्य कारण असावे. कारण निवडणुकीचे अधिकृत निकाल मतदान संपल्यावर कांहीं तासांतच प्रसिद्ध होऊ लागतात. पण यावेळी असे निकाल बऱ्याच विलंबानंतर प्रसिद्ध होऊ लागले. तसेच यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या वेळी हजर राहू दिले नव्हते (जे पूर्वी दिले जात असे).

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने जरी हे सर्व आरोप धुडकावून टाकले असले तरी कांहीं ’तांत्रिक’ कारणे उद्भवली व त्यामुळे गोंधळ निर्माण झाला व निकाल जाहीर करण्यास विलंब झाला एवढे मान्य केलेले आहे! “पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ” या शरीफ बंधूंच्या दुसर्याी क्रमांकावर आलेल्या पक्षाने निवडणुकीचे निकाल अमान्य केलेले आहेत. येत्या कांहीं दिवसात पाकिस्तानात विनासायास सत्तापालट होऊन इम्रान खान यांचे सरकार येण्याऐवजी राजकीय अस्थिरता वाढत राहील असे दिसते. 

पाकिस्तानी निवडणुकांतील भ्रष्टाचारांच्या कथा
पण यावेळी फक्त निवडणुकीच्या दिवशीच झालेल्या भ्रष्टाचारांपुरती ही कथा मर्यादित नाहीं. इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराकडून समर्थन मिळत असल्याची स्पष्टचिन्हे २५ जुलैचा मतदानाचा दिवस यावयाच्या आधीपासूनच दिसू लागली होती. कारण लष्कराला पुन्हा नवाज शरीफ निवडून यावयास नको होते.

निवडणुकीपूर्वी पंतप्रधान असलेल्यानवाज शरीफ यांनी लष्कराच्या परराष्ट्रीय व अंतर्गत धोरणांमधीलढवळाढवळीला व दादागिरीला आव्हानच दिले होते. शरीफ यांचे लष्कराच्या उच्च पदावरील जनरल्सबरोबर अनेक बाबतीत-खास करून भारताबरोबरचे संबंध सुधारण्याच्या विचारसरणीबाबत-मतभेद होते. शरीफ यांना मुलकी सरकारचे सर्वाधिपत्य हवे होते व त्यांनी पूर्वी पाकिस्तानचे सेनाप्रमुख असलेल्या व १९९९ साली नवाज शरीफ यांचे सरकार आपल्या लष्करी दादागिरीद्वारा उलथून टाकणार्याा ज. मुशर्रफ यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटलासुद्धा दाखल केला होता[२]

पाकिस्तानातील निवडणुकांपैकी सर्वात जास्त भानगडयुक्त निवडणूकम्हणून ओळखल्या जाणार्यान यंदाच्या निवडणुकीत पाकिस्तानी लष्कराने इम्रान खान यांना विजयी करण्यासाठी मदत कशी केली? लोकशाहीत तिसरा स्तंभ समजल्या जाणार्या  न्यायसंस्थेला सर्वात प्रथम शरीफ यांच्याविरुद्ध भडकवून आणि एक अतिशय थातुर-मातुर पुरावा असलेला लुटपुटीचा खटला त्यांच्याविरुद्ध चालवून त्यांना आधी पंतप्रधानपदावर रहाण्यास अपात्र ठरविले व शेवटी नवाज शरीफ व त्यांची कन्या मरयम नवाज (जिला नवाज शरीफ यांची PML-N च्या प्रमुखपदाची वारसदार मानले जाते) या दोघाना तुरुंगात डांबून टाकले.

त्याच वेळी नवाज शरीफ यांच्या पक्षातील अनेक उमेदवारांना धमक्या देऊन त्यांना पक्ष सोडावयासभाग पाडले. त्याच बरोबर निवडणुकीच्या आधीच्या काळात लष्कराने केलेल्या लांड्यालबाड्यांबद्दल प्रसारमाध्यमांमध्येकुठलीही बातमीच प्रसिद्ध होऊ नये म्हणून स्थानीय प्रसारमाध्यमांना गप्प करण्यात आले.

एवढेच नाहीं तर कांहीं प्रसारमाध्यमांना इम्रान खान यांच्याबद्दल सक्तीने सकारात्मक प्रसिद्धी करावयला भाग पाडले आणि नवाज शरीफ यांच्याबद्दल चकार शब्दही सकारात्मक प्रसिद्ध न करण्याची व जमेल तितक्या नकारात्मक बातम्या प्रसिद्ध करायची जबरदस्ती केली गेली असे प्रसारमाध्यमांबाबतच्या हाती आलेल्या माहितीवरून कळले.

इम्रान खान: विकासाकडून मध्ययुगाकडे वाटचाल?
वर सांगितल्यानुसार प्रसारमाध्यमांशी केलेल्या संगनमताद्वारा इम्रान खान यांची लोकप्रियता खात्रीनेवाढावीम्हणूनवर लिहिलेल्या बर्याीच कारवाया केल्या गेल्याआणि त्यातून त्यांची ’नवा पाकिस्तान’ निर्माण करण्याबद्दलची घोषणा पाकिस्तानी जनतेत घुमू लागेल अशी काळजी घेण्यात आली. पण या मार्गावर चालताना आपला निवडणुकीतील विजय नक्की करण्यासाठी इम्रान खान यांनी बऱ्याच तडजोडी केल्या.

खरे तर सुरुवातीला त्यांची मूळ प्रतिमा एक उदारमतवादी व पुरोगामी नेता अशी होती पण अलीकडे त्यांनी आपली प्रतिमा बदलली व आता ते लोकप्रिय पुराणमतवाद्याच्या भूमिकेत वावरू लागलेव ईश्वरनिंदेविरोधी (anti-blasphemy) कायद्याचे समर्थनही करू लागले.

याशिवाय आसपासच्या अफगाणिस्तानमध्ये व काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या उग्रवाद्यांच्या व अतिरेक्यांच्या बाजूनेही इम्रान खान बोलू लागले व त्यांच्या भाडोत्री लढ्यांचेसमर्थनकरणार्याघ पाकिस्तानी लष्कराच्या निंद्य भूमिका सर्वांसमोर उघड करण्याऐवजी त्या लढ्यांचा सनदशीर म्हणून प्रचारही करू लागले.

तसेच पाकिस्तानला अस्थिर करू पाहणाऱ्या आंतरदेशीय शक्तींच्या कारस्थानांना पाकिस्तान कसा बळी पडत आहे या विचारसरणीचे ते समर्थन करू लागले आणि त्याद्वारे पाकिस्तानी जनता ज्या सदोष प्रचाराला बळी पडत आहे त्या प्रचाराची पुष्टीही करू लागले.यामुळे पाकिस्तानी युवकांमधील बौद्धिक गैरसमज वाढीस लागले आहेत.

इम्रान खान यांच्या अशा तात्विक तडजोडींमुळे पाकिस्तानी लष्कराच्या प्रत्येक भूमिकेला ते आता होकारच देत गेले व त्यायोगे त्यांनाखात्रीने विजयी करणे लष्कराला सोपे गेले. या ’होयबा’ वृत्तीद्वारे पाकिस्तानी लष्कराच्या मुलकी कारभारातील वरचष्म्यापुढे ते नतमस्तकच झाल्याचे दिसू लागले.

पण हे सौहार्दपूर्ण संबंध फार काळ टिकणार नाहींत आणि संसदेचे नेतृत्व करतेवेळी त्यांच्या राजनैतिक विरोधकांना पूर्वी ज्या समस्येला तोंड द्यावे लागले होते त्याच समस्येला तोंड देण्याची वेळ त्यांच्यावरही येणार आहे.

आश्वासलेला ’सरस’ पाकिस्तान कुठेच दिसत नाहींय्!
जेंव्हां-जेंव्हां पाकिस्तानी लष्कर नवे राजकीय नेतृत्व पुढे आणते तेंव्हां-तेंव्हांते पाकिस्तानचा पंतप्रधान होणारी व्यक्ती काय काय करू शकते व काय काय करू शकत नाहीं याबद्दलचे नियम त्याला सांगते. पाकिस्तानी लष्कर असे गेली ४० वर्षें करत आले आहे. पण पंतप्रधानपदावर आरूढ झालेले कळसूत्री सरकार जेंव्हां कांहीं काळानंतर आपले पंख पसरू पहाते तेंव्हां या कळसूत्री सरकारचे पंख लष्कराकडून छाटले जातात व मग खडाजंगीला सुरुवात होते असा आजवरचा इतिहास आहे. 

इम्रान खान यांच्या मतदारांना व समर्थकांना या नेहमी येणार्याो धक्क्याला तोंड द्यावेच लागणार आहे कारण या सर्व मतदारांनी इम्रान खान यांना ते एक सरस पाकिस्तान आणतील या अपेक्षेने मतदान केलेले आहे.

पण त्यांनी जर मुलकी सरकार व पाकिस्तानी लष्कर यांच्यामधील असमतोलाच्या मुख्य मुद्द्याला हात घातला नाहीं आणि लष्कराच्या प्रस्थापित हितसंबंधांपासून स्वतंत्र असे धोरण आखले नाहीं तर पाकिस्तानच्या परिस्थितीत कांहींच बदल होणार नाहीं. आणि जर त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या परिस्थितीत कांहींच बदल झाला नाहीं तर ते आपले सरकार सुरळीतपणे चालवू शकणार नाहींत आणि पंतप्रधानपदावर फार काळ टिकू शकणार नाहींत.

थोडक्यात म्हणजे या निवडणुकीत पाकिस्तानी लष्करच विजयी ठरले आहे कारण त्याने या वेळीही आपल्या प्रस्थापित हितसंबंधांना बाधा न आणणारे नेतृत्व निवडून आणण्याची खबरदारी घेतलेली आहे. जोवर इम्रान खान यांचे सरकार लष्कराचे हितसंबंध सांभाळेल तोवरच ते सुरळीतपणे चालेल. पण ज्या क्षणी ते लष्कराला आव्हान देऊ पहातील त्याक्षणी शरीफ आणि त्याआधी भुत्तोंच्या नशीबी एके काळी जे आले तेच यांच्याही नशीबीही येईल.

...............................................................................

या लेखाचे लेखक श्री. ताहा सिद्दीकी हे एक पाकिस्तानी अन्वेषक पत्रकार असून सध्या पॅरिस येथे राजकीय आश्रयाखाली रहात आहेत. १० जाने. १८ रोजी लंडनला जाण्यासाठी विमानतळावर जात असताना त्यांचे (बहुदा पाकिस्तानी लष्कराकडून) अपहरण करण्यात आले होते; पण ते अयशस्वी झाल्यामुळे ते घरी परत आले व १३ फेब्रुवारी १८ रोजी पॅरिसला निघून गेले. त्या आधी त्यावेळी सत्तेवर असलेल्या मुलकी सरकारने त्यांना लष्कराची माफी मागण्याचा सल्ला दिला होता; पण तो न मानता त्यांनी देश सोडण्याचा पर्याय स्वीकारला. त्यांचा ’गुन्हा’ हाच होता कीं ते पाकिस्तानी लष्करावर टीका करत व म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला होता.

त्यांचे लिखाण न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, फ्रान्स २४ सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांसह पाकिस्तानी व भारतीय आलेले आहे. स्वत:ला आलेल्या यातनादायक अनुभवापोटी त्यांनी ३ मे २०१८ रोजी (जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्यदिन)च्या दिवशी खास दक्षिण आशियासाठी SAFENEWSROOMS.org या संस्थळाची स्थापना केली आहे.

टिपा:
[१] इम्रान खान यांनी १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तर हा लेख त्या पूर्वीचा (२५ जुलैला प्रकाशित झालेला) आहे.
[२] या खटल्याचे काम न्यायालयात सुरू असताना मुशर्रफ बर्यालचदाप्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन गैरहजरच राहात असत. नंतर कुठले तरीफुसके कारण देऊन ते दुबईला पसार झाले व सध्या ते तिथेच असतात.