esakal | अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी तिरंगाही झळकणार!

बोलून बातमी शोधा

अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी तिरंगाही झळकणार!

अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 4 जुलै रोजी होणाऱ्या उत्सवामध्ये 'ऍन हार्बर मराठी मंडळ' (ए2एमएम) सहभागी होणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, अशा प्रकारच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली ही पहिलीच भारतीय संस्था आहे.

अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी तिरंगाही झळकणार!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ऍन हार्बर (मिशिगन) : अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 4 जुलै रोजी होणाऱ्या उत्सवामध्ये 'ऍन हार्बर मराठी मंडळ' (ए2एमएम) सहभागी होणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे, अशा प्रकारच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली ही पहिलीच भारतीय संस्था आहे. पारंपरिक वेशभुषेसह अंदाजे 100 भारतीय नागरिक या सोहळ्यात सहभागी होतील. 'शिव शार्दुल' पथकातर्फे ढोल, ताशा, लेझीम यांची धमाल हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. 

'मराठी संस्कृती वृद्धिंगत व्हावी, देशापासून दूर असूनही चालीरिती, सण-उत्सव, भाषा यांची ओळख नव्या पिढीला व्हावी', या हेतूने 'ए2एमएम' ही संस्था 2006 मध्ये स्थापन झाली. या संस्थेद्वारे 2014 मध्ये एक मराठी शाळाही सुरू करण्यात आली. या शाळेला मिशिगन शिक्षण विभागाकडून 'सील ऑफ बायलिटरसी'ही मिळाले आहे. 

'दोन्ही संस्कृतींचा सुरेख संगम पाहण्याची ही सुवर्णसंधी आहे. एकाच वेळी, एकाच ठिकाणी दोन्ही संस्कृतींचे दर्शन घडविणे हा या सोहळ्याचा उद्देश असेल', असे 'ए2एमएम'चे संस्थापक भूषण कुलकर्णी यांनी म्हटले. 'अमेरिकन दिनासारख्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यासपीठावर भारताचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे', अशी भावना संस्थेचे अध्यक्ष अमित मांढरे यांनी व्यक्त केली.