esakal | आनंदी गोपाळ : प्रेरणादायी यशोगाथा संघर्षाची
sakal

बोलून बातमी शोधा

anandi gopal marathi movie

आनंदी गोपाळ : प्रेरणादायी यशोगाथा संघर्षाची

sakal_logo
By
केदार लेले (लंडन) lele.kedar@gmail.com

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी
1865 ते 1887 या काळात आनंदीबाई घडल्या. कल्याणमध्ये जन्मलेल्या यमुना इनामदार, गोपाळराव जोशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर आनंदीबाई जोशी झाल्या. त्यांनी कल्याण. ठाणे, अलिबाग, कोल्हापूर, कोलकाता आणि अमेरिका असा प्रवास केला.

(ज्या काळात) महिलांना उंबरठा ओलांडण्याची परवानगी नव्हती, त्या काळामध्ये आनंदीबाई जोशी यांनी एकटीने परदेशी जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एमडी पदवी मिळवली आणि आनंदीबाई भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर झाल्या.

आनंदीबाई जोशी भारतात परतल्या होत्या तेव्हा त्यांना क्षयाची बाधा झाली होती.
भारतात परतल्यानंतर त्यांचा याच आजारपणात मृत्यू झाला.

कादंबरीवर आधारीत सिनेमा
प्रसिद्ध लेखक श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' याच नावाच्या कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. आनंदी गोपाळ या सिनेमाद्वारे, आनंदीबाईं आणि गोपाळराव यांच्या जीवनातील हा संपूर्ण प्रवास समीर विद्वांस यांनी मांडला आहे.

आनंदीबाईं आणि गोपाळराव यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट अमेरिकेतील कारपेंटर मावशीला आनंदीबाई जोशी लिहित असलेल्या पत्राद्वारे सुरू झालेला हा सिनेमा फ्लॅशबॅक तंत्राने उलगडत जातो. त्यांच्या निवेदनाच्या मध्ये पेरलेल्या प्रसंगांतून कथा पुढे जाते.

सिनेमा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आनंदी (छोटी- अंकिता गोस्वामी, मोठी भाग्यश्री मिलिंद) आणि गोपाळराव (ललित प्रभाकर) यांच्याबरोबर त्यांचेच सहप्रवासी म्हणून प्रेक्षकांचाही प्रवास होत राहतो.

रीति-रिवाज, परंपरा यांना तडा; लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण
आर्यसंस्कृतीच्या प्रभावाने मातृसत्ताक कुटुंबपध्दती लयास जाऊन पितृसत्ताक कुटुंबपध्दती उदयास आली. गोपाळराव जोशी आणि आनंदीबाई यांचे वडिल, पितृसत्ताक कुटुंबपध्दती मधील पुरोगामी विचारांचे दिसून येतात.

चूल आणि मूल मध्ये न अडकता गोपाळराव जोशी यांनी आनंदीबाईच्या शिक्षणावर भर दिला, तसेच त्या काळात बायकोला एक ध्येय देणं...तिचा पालक, मित्र, नवरा, गुरू बनून तिथपर्यंत घेऊन जाणं हे कमालीचं कठीण होते.

आनंदी गोपाळ - एक संघर्ष
शिक्षणासाठी धर्मांतराला विरोध करणारी निश्चयी स्त्री. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री. हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री.

भारतीय (महाराष्ट्रीय पोशाख) रीतिभाती, आपला शाकाहारी आहार परदेशात सांभाळणारी, प्रकृतीस्वास्थ्य सांभाळीत आणि इंग्रजी भाषा उत्तम आत्मसात करून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी तरुणी. या सर्वांबरोबर पती, नातेवाईक, सुहृद यांना सतत पत्र लिहून त्यांच्याशी संवाद साधणारी सर्वगुण संपन्न गृहिणी. अशा एक ना अनेक छटांचे समग्र दर्शन घडते.

आनंदी गोपाळ - एक हळुवार प्रेमकथा
गोपाळराव जोशी आणि आनंदीबाई यांच्यातील हळुवार प्रेमकथा दृष्टीक्षेपात येते. त्यांच्यातील सहृदयता, हक्क-कर्तव्यांचा समतोल, दोघांचे एकच लक्ष्य, वचनबद्धता आदी गुण दिसून येतात.

आनंदी गोपाळ हा सिनेमा का पहावा ?
आनंदी गोपाळ हा सिनेमा म्हणजे चरित्रपट किंवा डॉक्युमेंट्री नसल्यामुळे, या चित्रपटाच्या निर्मिती मध्ये लेखक-दिग्दर्शकाने योग्य आणि आवश्यक ते स्वातंत्र्य घेतलेले आहे. जे कथानक घडताना समोर दिसतंय तितकीच त्यामागची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते.  चित्रपटाची मांडणी, पटकथेची बांधणी, कलाकारांचे एकमेकांशी असलेले बंध या गोष्टी सहजपणे समोर येतात. दिग्दर्शक समीर विध्वंस ह्यांच्याकडून एका उत्तम, समाजसुधारक, व्यापक, प्रेरणादायी गोष्टीची असलेली अपेक्षा पूर्ण होते.

पुस्तक, लघुपट, एकपात्री प्रयोग यांच्या निमित्ताने आनंदीबाई प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने आनंदीबाईं यांच्या सोबत गोपाळरावांचेही समग्र दर्शन घडते हे विशेष. हे सगळे पाहिल्यावर डॉ. आनंदीबाई जोशी आणि त्यांना घडवणारे गोपाळराव जोशी किती थोर होते हीच बाब सारखी मनात निनादत राहते.

‘आनंदी गोपाळ’ - हॅरो, इल्फर्ड, लेस्टर, बर्मिंघम येथे प्रिमियर
लंडन मध्ये उत्तम आणि दर्जेदार नाटक, सिनेमे आणि शो आयोजित करणारे चारुता एंटरटेंनमेंट चे प्रस्थापक हर्षवर्धन सोमण आणि ब्राईट स्टार्स चे वैभव नाईक यांनी एकत्र येऊन या चित्रपटाचा प्रिमियर आयोजित केला आहे.   

निर्मिती संस्था : नमह पिक्चर्स, झी स्टुडियो, फ्रेश लाइम फिल्मस्
लेखन : करण श्रीकांत शर्मा
संवाद : इरावती कर्णिक
दिग्दर्शक : समीर विद्वांस
गीतकार : वैभव जोशी
संगीत : हृषीकेश दातार, सौरभ बालेराव, जसराज जोशी
कलाकार : ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, अंकिता गोस्वामी, गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, जयंत सावरकर, अथर्व फडणीस, गॅरी जॉन, सोनिया अलिबिझुरी