ऑफशोअर रीगपर्यंतही पोहचला 'ग्रंथ तुमच्या दारी'चा विस्तार

ग्रंथ तुमच्या दारी
ग्रंथ तुमच्या दारी

दुबई: कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या वाचन चळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे; पण भारताव्यतिरिक्त जगाच्या विविध देशातही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यत पोहोचवण्याचं काम या संस्थेने केले आहे. यूएईतील मराठी माणसांत ही योजना फार लोकप्रिय झाली असून दुबई, शारजा, अजमान, आबू धाबी, फुजैरा आणि रास अल खैमा या महत्त्वाच्या अमिरातमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी वाचक वर्ग निर्माण झाला आहे.

आता तर या योजनेचा विस्तार आखाती समुद्रात जिथं तेलाचे उत्पादन होते अशा ऑफशोअर प्लॅटफॉर्मपर्यंत पोहचला आहे. 'ग्रंथ तुमच्या दारी' शारजा येथील समन्वयिका सौ. नंदा शारंगपाणी याचे पती श्री जगदीश शारंगपाणी हे ऑफशोअर कंपनीत कार्यरत असून या कंपनीत अनेक मराठी भाषक इंजिनियर व टेक्निशियन काम करतात.

एकदा ऑफशोअर गेल्यावर साधारणपणे दोन तीन महिने सुट्टी नसते. अशा वेळी हे लोक विरंगुळा व ज्ञानवर्धनाचे साधन म्हणून मराठी ग्रंथ वाचनाचा आस्वाद घेतात. वाचन झाल्यावर ग्रंथ आपापसात बदलतात, दोन महिन्यांनी परत नवीन ग्रंथ प्लॅटफॉर्मवर घेऊन जातात. यातील एक वाचक तर अझरबैजान या देशातही असून दर महिन्याला ते नवनवीन ग्रंथ वाचण्यासाठी नेतात, असे सौ. नंदा शारंगपाणी यांनी सांगितले. निमित्त होते 'ग्रंथ तुमच्या दारी' यूएईची त्रैमासिक बैठक. ही बैठक आजमान येथे दिनांक २१ एप्रिलला मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

बैठकीच्या सुरवातीला समन्वयिका विशाखा पंडित यांचे वडील वि. भा. देशपांडे यांना एक मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी नाट्यकोशकार व प्रसिद्ध नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र  तथा वि. भा. देशपांडे यांचे गेल्या महिन्यात ९ मार्चला पुण्यात निधन झाले. यावेळी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

बैठकीस मुख्य समन्वयिका सौ. सुजाता भिंगे यांनी प्रारंभ करून प्रत्येक ग्रंथ पेटी मागे किती वाचक आहेत याचा आढावा घेतला व अजून नवीन वाचक कसे या योजनेत जोडले जातील यासाठी सर्व समन्वयकांनी प्रयत्न करावेत यावर त्यांनी भर दिला. दुबई विभागात आता एकुण २८ पेट्या आणि १९ समन्वयकांचे मिळून जवळपास २०० वाचक झाले आहेत. ग्रंथ परिवारात दाखल झालेल्या समन्वयिका श्वेता पोरवाळ आणि प्रचिती तलाठी गांधी यांनी आपला परिचय करून दिला.

आबूधाबी या राजधानीच्या शहरात मराठी माणसांची संख्या भरपूर असूनही दुबई सारखा तिथं ग्रंथचा प्रसार झाला नाही, अशी खंत आबूधाबीच्या समन्वयिका नीलिमा वाडेकर यांनी व्यक्त केली. तिथं ग्रंथचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवीन समन्वयक शोधने आणि जमल्यास गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दुबईत झालेल्या वाचक मेळाव्याच्या धर्तीवर असाच एखाद्या मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे; जेणेकरून आबूधाबीतील वाचक वर्गापर्यंत ग्रंथची ओळख पोहचेल. सध्या आबूधाबीत केवळ एकच ग्रंथ पेटी आहे.

बाल ग्रंथ पेट्या फार लोकप्रिय होत असून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागण्यात यावे जेणेकरुन विविध उपनगरातील बाल वाचकांना या बाल साहित्याचा आस्वाद घेता येईल. द गार्डन्स विभागात नेहा अग्निहोत्री यांच्याकडे देण्यात आलेल्या ग्रंथ पेटीच्या महिला वाचक आठवड्यातून एकदा एकत्र जमून ग्रंथ अभिवाचन सारखा स्तुत्य उपक्रम राबवतात. तसेच भारतातून सुट्टीवर आलेले काही ज्येष्ठ नागरिकही ग्रंथांचे वाचक होत आहेत असे नेहा आग्नीहोत्री म्हणाल्या.  

ग्रंथ तुमच्या दारी, दुबई विभाग सोशल मिडीयाच्या वापरात जरा मागे पडला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवीन वाचकापर्यंत पोहचणे शक्य आहे त्यामुळे ग्रंथचे फेसबुक पेज नियमित अपडेट करण्यात यावे असाही ठराव संमत करण्यात आला. समन्वयिका विशाखा पंडित व प्रचिती गांधी मिळून ग्रंथ तुमच्या दारी यूएई ची नवीन वेबसाईट तयार करत असून, त्यात ग्रंथची सर्व माहिती अपलोड करण्यात येईल. सर्व समन्वयकांची माहिती, उपलब्ध ग्रंथ, आत्तापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांची माहिती यासारख्या गोष्टी अपलोड करण्यात येणार आहेत. वेगवेगळे समन्वयक यात लेख लिहीणार आहेत. समन्वयक गणेश पोटफोडे हे युट्यूबवर नवीन वाहिनी चालू करत असून त्यासाठी लागणार्या गोष्टीसाठी स्वप्निल जावळे यांचे सहकार्य लाभत आहे. या वाहिनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरील ग्रंथचे परीक्षण, ओळख व चर्चा करण्यात येणार आहे.

प्रत्येक समन्वयकाने आपापल्या वाचकांसाठी काव्यसंमेलने, ग्रंथ अभिवाचन असे कार्यक्रम आयोजित करावेत अशी सूचना किशोर मुंढे यांनी मांडली. 

आजमानचे समन्वयक वीरभद्र कारेगांवकर आणि मनिषा कारेगांवकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले.

कार्यक्रमाला सुजाता व घनःशाम भिंगे, नीलिमा वाडेकर, समिश्का व स्वप्निल जावळे, धनश्री व कमलेश पाटील, विशाखा पंडित, नेमिका जोशी, प्रचिती तलाठी गांधी, नंदा शारंगपाणी, अपर्णा पैठणकर, श्वेता व इंद्रनील करंदीकर, किशोर मुंढे, मनिषा व वीरभद्र कारेगांवकर, नेहा व हरी अग्नीहोत्री, श्वेता व सचिन पोरवाळ आणि गणेश पोटफोडे हे उपस्थित होते.

ग्रंथची पुढील बैठक उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर थेट सप्टेंबर महिन्यात होईल अशी माहिती विशाखा पंडित व सुजाता भिंगे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com