परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर

संजीव साखरकर
Wednesday, 8 May 2019

।।लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
​धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

आक्रा- घाना(वेस्ट अफ्रीका) : परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर करणारया 'महाराष्ट्र मंडळ घाना' तर्फे साजरा करण्यात आला 'महाराष्ट्र दिन' रविवार (ता. ६) आक्रा- घाना, वेस्ट अफ्रीका मध्ये सलग ५ व्या वर्षी प्रमुख पाहुणे उच्च आयुक्त भारतीय दूतावास वीरेंद्रसिंग यादव यांचे उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमास येथील मराठी परिवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

इंडियन असोशिएशन घाना चे अध्यक्ष श्री राजेश ठक्कर आणि येथील इतर भारतीय प्रादेशिक संस्थानचे पदाधिकारी आणि प्रेक्षक यांनी सुद्धा चांगला सहभाग दर्शविला. कार्यक्रमास ६०० च्या आसपास उपस्थिती लाभली. यानिमित्ताने विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र गौरव समूह गान, भारतीय सैन्यावर प्रेरित होऊन लहान मुलांनी सादर केलेला अतिशय हृदयस्पर्शी कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली. इतरही सांस्कृतिक आणि करमणुकीचे बहारदार कार्यक्रम मंडळाच्या सभासदांनी सादर केले. कार्यक्रमाचे अतिशय नेत्रदिपक आयोजन करण्यात आल्यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अरुण पाटिल, सचिव, सहसचिव अनुक्रमे अभिनीत अधिकारी, आतिश श्रृंगारपवार, व्यवस्थापक सचिन,खजिनदार गणेश फडाळे आणि मंडळाच्या पदाधिकारयानी खुप मेहनत घेतली. त्यांना होतकरु सभासदांची मोलाची साथ लाभली. सर्व सहभागी कलाकारांचे, कोरियोग्राफर्स, कार्यक्रमाचे प्रायोजक आणि इतर सहाय्यक व्यक्तिनचे कौतुक आणि जाहिर आभार.

नोकरी आणि धंद्या निमित्त आपल्या जन्मभूमीपासून लांब कर्मभूमीत स्थायिक झालेल्या येथील 300 च्या आसपास मराठी लोकांना काही केल्या आपल्या मातृभूमीची आठवण आल्या शिवाय राहत नाही. म्हणून परदेशातही संस्कृती जपण्यासाठी मंडळा तर्फे महाराष्ट्र दिना बरोबरच मकरसंक्रात, होळी, आणि गणेशोत्सव यांसारखे सण साजरे करुन महाराष्ट्रीयन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या प्रयत्न केला जातो.

पुढील पिढीलादेखील संस्कृतीची ओळख आणि येथील वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांचे आपसातले ऋणानुबंध वाढवण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे हे मंडळाचे उद्दिष्ट आहे.

।।लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

हे मराठी अभिमान गीत तंतोतंत लागू पडते ते महाराष्ट्र मंडळ घानाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi culture Programme In West Africa by Maharashtra Mandal Ghana