esakal | सिडनीमध्ये धुमधडाक्‍यात साजरा होतोय दीपोत्सव

बोलून बातमी शोधा

Marathi News Non Resident Marathi Community in Sydney Australia Diwali
सिडनीमध्ये धुमधडाक्‍यात साजरा होतोय दीपोत्सव
sakal_logo
By
महेंद्र महाजन

ऑस्ट्रेलियामधील सिडनीपासून 32 किलोमीटरवरील लिव्हरपूल भागातील भारतीयांची लोकवस्ती. इथे दीपोत्सव धुमधडाक्‍यात साजरा होत असून आकाशकंदील अन्‌ रोषणाईने आसमंत उजाळून निघाला आहे. नगर, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील मूळच्या रहिवाश्‍यांनी प्रकाशपर्वासाठी मराठमोळी वेशभूषेला पसंती दिलीय. फराळासाठी चकली, बुंदीचा लाडू, करंजी, शेवया, चिवडा असे मेनू घराघरांमधील गृहिणींनी केलाय.

सिडनीमध्ये रात्री नऊच्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन) लक्ष्मीपूजन विधीवत करण्यात आले. त्यानंतर रात्रीच्या भोजनासाठी बासुंदीचे बेत आखण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर मराठी कुटुंबातील कर्त्यांनी आज अन्‌ उद्या सुटी घेतली असून कुटुंबाच्या आनंदपर्वात तेही सहभागी झाले आहेत. कोपरगावचे मूळ रहिवाशी सिडनीमधील अभियंता संदीप थोरात म्हणाले, की लिव्हरपूल भागात राहणाऱ्या कुटुंबं रात्रीच्यावेळी एकत्र येऊन फटाक्‍यांचा बालगोपाळांसह आनंद घेतात. हा उत्साह पाहून आपण गावी असल्याचा "फील' प्रत्येकजण अनुभवतो. अनेक कुटुंबांमधील आजी-आजोबा गावाहून आल्याने मुलांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

पुण्यातील चंद्रकांत जगदाळे यांनी स्वतःच्या व्यवसाय सुरु केला आहे. त्यांच्या मुलांनी हुबेहुब किल्ला साकारला आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, मावळ्यांच्या, अश्‍वांच्या प्रतिकृतींनी किल्ला सजवला आहे. त्यावर रोषणाई केली आहे. सिडनीमध्ये अभियंता असलेले मूळचे पुण्याचे शैलेश ताम्हणकर, संगमनेरचे भाऊसाहेब लंके यांच्याही कुटुंबात प्रकाशपर्वाचा आनंद लुटला जात आहे. महाराष्ट्रातील परंपरेनुसार दीपोत्सवानिमित्त फराळासाठी कुटुंब एकत्र येत आहेत. उद्याच्या बलिप्रतिपदा पाडव्याच्यानिमित्ताने काही जणांनी "लॉंग ड्राईव्ह'ला कुटुंबियांसमवेत जाण्याचा बेत आखला आहे.