esakal | चीनचे सरकारी इस्पितळ आणि स्थानभ्रष्ट गर्भधारणा

बोलून बातमी शोधा

चीनचे सरकारी इस्पितळ आणि स्थानभ्रष्ट गर्भधारणा
चीनचे सरकारी इस्पितळ आणि स्थानभ्रष्ट गर्भधारणा
sakal_logo
By
देवदत्त पुजारी

शांघाय! चीनच्या नकाशावरील जणू एक मोती. गगनचुंबी इमारती, प्रशस्त व नियोजनबद्ध रस्ते, मोहरुन टाकणारी उद्याने, डोळे दीपवून टाकणारी रोषणाई, जमिनीखाली ३ तर जमिनीवर १ पदरामध्ये चालणाऱ्या मेट्रोचे विशाल जाळे, आलीशान मोटारी आणि शिस्तबद्ध वाहतूक. जगभरातून आलेल्या नागरिकांनी भरलेली जणू काही एक मोठी जत्रा. खऱ्या अर्थाने एक जागतिक आणि गेल्या १५-२० वर्षातील चीनच्या घौड़दौडीचे प्रामुख्याने प्रतिनिधित्व करणारे शहर. गेल्या अडीच वर्षातील माझे येथील वास्तव्य मला अनेक सुंदर अनुभव देऊन गेलय. पण या सर्व अनुभवांमध्ये एक अनुभव मात्र अनोखा आणि विलक्षणीय होता. तो सांगण्याकरिता हा लेखप्रपंच!

४ जून २०१५. सकाळी उठताच माझी पत्नी मधुरा हिने मला गोड बातमी सांगितली ती म्हणजे ती गरोदर असल्याची. चाचणीतून तस स्पष्ट कळत होतं. अत्यंत आनंदी मनाने मी ऑफिसला गेलो. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. ऑफिसमधून घरी येताच मधुराने कळा तीव्र झाल्याचे व रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच नजीकच्या इस्पितळात जाण्याचे ठरले.

स्थानिक इस्पितळ हे सरकारी व चीनी उपचार पद्धतीचे असल्याने भाषा आणि उपचारपद्धतीबद्दलची अनभिज्ञता अशा अनेक अडचणी होत्या. हे सोपं करुन देणारी कॅथी झँग ही माझी सहकर्मचारी मदतीला धावून आली. जणू काही तिचीच जबाबदारी असल्याप्रमाणे त्या इस्पितळातील सर्व चाचण्या, डॉक्टरचे सल्ले आणि आम्हाला पडणारे प्रश्न याचे निराकरण हे सर्व अगदी आत्मीयतेनं केलं. या इस्पितळातील चाचण्यानुसार गर्भधारणा ही गर्भाशयात नसून गर्भाशयाच्या बाहेर आहे असे सांगण्यात आले व पुढील तपासणी व उपचारांकरिता स्त्रीरोगविशेष सरकारी इस्पितळात जाण्यास सांगण्यात आले.

आतापर्यंत आम्हाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले होते. स्त्रीरोगविशेष इस्पितळामध्ये कॅथी पुन्हा मदतीला आली. आमच्या परिस्थितिबद्दल तेथील नर्सला समजावले व आमचा क्रमांक बराच मागचा असूनही तड़क डॉक्टरांसमोर नेले. सोनोग्राफी आणि रक्तचाचण्या करुन थोड्याच वेळात मधुराची गर्भधारणा ही ectopic pregnancy असल्याचे निष्पन्न झाले.

ज्या नळीमधून भ्रूण (fetus) सरकत जाऊन गर्भाशयामध्ये उतरतो, त्या नळीमध्येच (Fallopian tube मध्ये) हे भ्रूण अडकून तेथेच त्याची वाढ होण्यास सुरुवात झाली होती. अतिशय दुर्मिळ अशा या गर्भधारणेत बाळाची वाढ न होता उलट आईच्या जिवाला धोका असतो. अशा वेळी मातेला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणे अनिवार्य असते. भ्रूणाचे ठिकाण निश्चित करुन त्यास आतल्या आत इंजेक्शनद्वारे नष्ट करणे अथवा शस्त्रक्रिया करुन ते काढून टाकणे मातेच्या जीवासाठी गरजेचे बनते.

हे ऐकताच जीव अत्यंत घाबरा झाला. घरापासून इतक्या दूर, परक्या देशात जिथे भाषेचा प्रश्न आहे, तिथे उपचार कसे होतील? यातून सुखरूप घरी जाता येईल ना? इस्पितळ कसे असेल? आपल्याला परवडेल का? अशा स्थानिक प्रश्नासोबतच इथून पुढे मधुराच्या तब्येतीवर याचा काही वाईट परिणाम तर होणार नाही ना? भविष्यात आम्हाला बाळ होईल की नाही? यासारखे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले.

एकमेकांना कसाबसा धीर देत आम्ही नर्स सोबत इस्पितळाच्या ७व्या मजल्यावरील विभागात ऍडमिट होण्याकरता निघालो. वाटेत आम्हाला नर्सने पेशंटसाठी असलेल्या बेडचे दर सांगितले. स्वतंत्र खोली हवी असल्यास भारतीय रूपयाप्रमाणे एका दिवसाचे रु. १०,००० तर जनरल वॉर्ड मध्ये दिवसाचे रु. ३७०. साहजिकच, पहिला पर्याय ऐकून छातीत धस्स झाले. किती दिवस इस्पितळात रहावे लागणार याच अनुमान नसल्याने जनरल वॉर्ड कड़े वळण्यावाचून पर्याय नव्हता पण त्याच वेळी आपल्याकडील सरकारी इस्पितळाचे चित्र आठवून मी मधुराला जनरल वॉर्ड मधे कसे ऍडमिट करणार हा प्रश्न सतावू लागला.

 "हा आमचा जनरल वॉर्ड आणि ही तुमची खोली. तुम्हाला चालेल का?" असे नर्सने विचारले आणि आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. केवळ ३ रुग्णांची एक अशी स्वच्छ वातानुकूलित खोली. अद्ययावत पलंग, भरपूर प्रकाश, वैक्यूम आणि ऑक्सीजन प्लग करण्याची सोय, प्रत्येक रुग्णाचा स्वतंत्र फोन व privacy साठी पडदा तसेच स्वच्छ सुसज्ज अटैच्ड बाथरूम. 

हे पाहून आमची अर्धी काळजी दूर झाली व पुढील उपचारांकरिता हुरुप आला. या व्यतिरिक्त एक विशेष गोष्ट म्हणजे ही दोन्ही इस्पितळे सरकारी असून देखील हे सर्व अत्यंत कमी वेळात आणि हल्लीच्या भाषेत स्मार्ट पद्धतीने करुन देणारी व्यवस्था. दोन्ही इस्पितळांमध्ये गरीबांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच नागरिक मोठ्या संख्येने होते यावरून सर्व वर्गांतील लोकांचा सरकारी इस्पितळावर असणारा विश्वास दिसून येत होता. त्याचबरोबर या सर्व लोकांना सहज सामावून घेता येईल अशी क्षमता,  शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि आत्मीयता.

इस्पितळात गेल्याबरोबर मधुराच्या नावाने हेल्थ कार्ड देण्यात आले. क्रेडिट कार्ड प्रमाणे या कार्डामध्ये एका ATM सारख्या मशीन मधून उपचाराकरिता लागणारे पैसे टाकता येतात. त्यामध्ये डॉक्टर पुढील चाचण्यांच्या सूचना तसेच औषधे लिहून देतात. कॅशियरने हे कार्ड swipe करताच झालेल्या बिलाचे पैसे दिसतात. पेशंटच्या सर्व पूर्व चाचण्या, त्याचे रिपोर्ट व दिलेल्या औषधांचा इतिहास पुढील डॉक्टर एका swipe वर पाहू शकतात. चाचण्यांच्या रिपोर्टच्या हव्या तितक्या प्रति आपण त्या ATM सारख्या मशीन मधून आपल्या वेळेच्या सोईनुसार प्राप्त करू शकतो.

"मधुराला उजव्या बाजूच्या नळीमध्ये (right side Fallopian tube मध्ये) गर्भधारणा झाली आहे" डॉक्टरांनी सांगितले. त्याचबरोबर उपचारांची रूपरेषा, त्यात असणारे संभावित धोके याची संपूर्ण माहिती डॉक्टरांनी आम्हाला सांगितली. हे कामहि त्यांच्याकरिता सोपे नव्हते. इंग्रजीचे ज्ञान तोडके मोडके असूनही ७-८ डॉक्टर मोबाईलवरील दुभाषकाचा वापर करुन अत्यंत कष्टपूर्वकपद्धतीने आम्हाला सर्व समजावून सांगत होते. आम्हाला सर्व समजले आहे व या उपचारपद्धतीला आमची संमती आहे हे सांगितल्यावरच डॉक्टरांनी आमच्याकडून संमतीपत्रावर स्वाक्षरी घेतली. याचवेळी हे सर्व योग्य दिशेने चालले असल्याबद्दलची खात्री पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. पराग बिनिवाले व डॉ. सौ.वैशाली बिनीवाले तसेच चन्द्रपूर येथील डॉ. सौ.वाडेकर हे तिघे करुन देत होते. आपल्या व्यस्त कार्यक्रमातही, कोणत्याही क्षणी आम्हास पडणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यास तिघांनीही आपले फोन उपलब्ध ठेवले.

सर्वप्रथम केमोथेरपीच्या कमी ताकदीच्या ४ इंजेक्शनचा कोर्स झाला. परंतु तरीही भ्रूणाची वाढ न थांबल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. यावेळीही डॉक्टरांनी संपूर्ण कल्पना देउनच संमतीपत्रावर स्वाक्षरी घेतली. भुलतज्ञास इंग्रजी अजिबात येत नसल्याने त्याने इंग्रजी कॉलेजात शिकणाऱ्या स्वतःच्या मुलास घरून बोलावून घेतले व सर्व गोष्टी आम्हास समजावून मगच  संमतीपत्रावर स्वाक्षरी घेतली.

दीड तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर भ्रूण fallopian tube मधून बाहेर काढण्यात यश आले. या tube ला वाचवण्यातही डॉक्टरांना यश आले. यामुळे पुढील प्रयत्नात यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढण्यास मदत झाली.

आज एक वर्षानंतर मधुराने एका गोड आणि सुदृढ़ बालकाला जन्म दिलाय. हा आनंद साजरा करताना मागील वर्षीच्या प्रसंगातील सर्व डॉक्टरांबद्दल, सरकारी इस्पितळातील व्यवस्थेबद्दलचे ऋण मनात दाटुन येत आहेत.

या लेखाद्वारे भारतातील वैद्यकक्षमतेला कुठेही कमी लेखण्याचा माझा हेतु नाही. तथापि, सरकारी इस्पितळांची भारतातील व्यवस्था अधिकाधिक रुग्णाभिमुख होण्यास तसेच चीनमधील सामान्य लोकांबद्दल काहींच्या मनात असणारा आकस, तुच्छतेची भावना कमी होण्यास मदत होईल अशी आशा आहे.